आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सापडलेली दीड तोळ्याची सोन्याची साखळी शेजारच्यांकडून परत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अंगणात झाडू मारताना सापडलेली दीड तोळ्याची सोनसाखळी परत करून श्रीकृष्ण कॉलनीतील कुटुंबीयांनी प्रामाणिकपणा दाखवला. भाऊबिजेच्या निमित्ताने शेजारी अालेल्या एका बालकाच्या गळ्यातून ही साखळी पडली होती.

श्रीकृष्ण कॉलनीतील रहिवासी दत्तात्रय साळुंखे यांच्या घरी भाऊबिजेच्या निमित्ताने त्यांचे जावई संजय शिंदे, मुलगी डॉ.कल्पना नातू प्रसन्न हे धुळ्याहून शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता आले होते. त्यांनी साळुंखे यांच्या शेजारी राहणाऱ्या गेणुबा सणस यांच्या अंगणात आपली चारचाकी उभी केली होती. चारचाकीतून उतरत असताना प्रसन्नच्या गळ्यात असलेली दीड तोळे वजनाची सोनसाखळी पडली होती. सणाच्या गडबडीत शुक्रवारी ही गोष्ट कोणाच्याच लक्षात आली नाही. शनिवारी सकाळी ८.३० वाजता प्रसन्नच्या गळ्यातील साखळी गहाळ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर साळुंखे कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. ही शोधमोहीम पाहिल्यानंतर शेजारी राहणाऱ्या गेणुबा सणस यांच्या पत्नी रंजना यांनी साळुंखे कुटुंबीयांना विचारपूस केली. हरवलेली साखळी आपणास सकाळी वाजता झाडू मारत असताना सापडल्याचे सांगून त्यांनी साखळी परत केली. ही साखळी मिळाल्याचे पाहून सर्वांनाच सुखद धक्का बसला. साखळी परत मिळाल्याचे समाधान रंजना सणस यांच्या चेहऱ्यावर उमटले होते. शेजारधर्म पाळून प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या सणस कुटुंबीयांचे संपूर्ण परिसरात कौतुकही झाले.