आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खान्देशात चार शेतक-यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणामुळेच संपवली जीवनयात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारोळा/ चाळीसगाव - गारपीट, अवकाळी पावसामुळे हादरलेल्या शेतक-यांचे आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. रविवारी खान्देशातील चार शेतक-यांनी जीवनयात्रा संपवली. त्यात पारोळा, चाळीसगाव, अमळनेर आणि धुळे तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.

पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथील देविदास कौतिक पाटील (वय ३५) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले व मुलगी असा परिवार आहे. देविदास यांच्याकडे ६० आर जमीन आहे. त्यांच्यावर सोसायटीचे ५७ हजार व उसनवारीने दीड लाख कर्ज घेतले होते. मात्र, गेल्या वर्षभरात दोन वेळा गारपीट व अवकाळी पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. या आर्थिक वैफल्यातून त्यांनी मृत्यूला कवटाळले.

चाळीसगावमधील लक्ष्मण कहारू चौधरी (वय ५२) यांनी विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्याकडे अडीच एकर शेती आहे. सोसायटीचे ४० हजार, सावकाराचे ५० हजारांचे कर्ज त्यांच्यावर हाेते. तसेच ६० हजाराचे वीज बिलही थकीत होते. हे कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली. लक्ष्मण यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, वडील असा परिवार आहे. अमळनेर तालुक्यातील सडावण येथील परशुराम राघो पाटील (६४) या शेतक-यानेही शनिवारी रात्री विष घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, पत्नी असा परिवार आहे. चार एकर शेती असलेल्या परशुराम यांच्यावर साेसायटी व खासगी सावकाराचे कर्ज होते.

शेतात गळफास घेतला
मांडळ (ता. धुळे) येथील शेतकरी राजाराम राघो कोळी (४०) यांनी रविवारी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी ते शेतात गेले होते. बराच वेळ परत न आल्यामुळे कुटुंबीयांनी शेतात शाेध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलिसांना देण्यात आली. राजाराम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. याबाबत त्यांचे भाऊ प्रताप राघो कोळी यांनी दिलेल्या माहितीवरून दोंडाईचा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उपनिरीक्षक सी. ए. ठाकूर, वाय. के. कोळी तपास करीत आहेत.