आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासात्मक : चारमजली बांधकामांना मिळेल शासन परवानगी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरात चारमजली बांधकामांना शासनाची परवानगी मिळणार आहे. त्यासाठी अ वर्ग महापालिकेची बांधकाम नियमावली लागू करण्यात येणार आहे. अ वर्गाची सुधारित नियमावली लागू करण्यासाठी तसा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवावा, अशी सूचना राज्यमंत्री उदय सामंत यांनी केली आहे. नवीन नियमामुळे शहरात चार ते पाच मजली बांधकाम करण्याचा मार्ग नागरिकांसाठी मोकळा होणार आहे.

महापालिकेला नवीन बांधकाम नियमावली लागू करावी यासाठी मंगळवारी मंत्रालयात मंत्री उदय सामंत यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. या वेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर जयश्री अहिरराव, स्थायी समिती सभापती चंद्रकांत केले, आस्थापनाप्रमुख नारायण सोनार, कनिष्ठ अभियंता सुभाष विसपुते उपस्थित होते. बैठकीत ड वर्ग महापालिकेच्या बांधकामासाठी स्वतंत्र नियमावली मंजूर करण्यात यावी, यासाठी प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात आला आहे. तो प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहे. राज्यातील सर्व ड वर्ग महापालिकांसाठी स्वतंत्रपणे विकास नियमावली बनविण्यात येत आहे. ती मंजूर झाल्यावर सर्व ड वर्ग महापालिकांना लागू करण्यात येणार आहे. ते काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे तोपर्यंत अ वर्ग महापालिकेची सुधारित बांधकाम नियमावली मंजूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाने तसा महासभेत ठराव करून तो प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठविण्यात यावा, अशी सूचना या वेळी राज्यमंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आली आहे.

एफएसआयची अट निघणार
महापालिकेला अ वर्ग महापालिका बांधकामाची सुधारित नियमावली लागू झाल्यास त्यात एफएसआयची अट राहणार नाही. जुन्या नियमावलीत किती मीटर रस्त्यावर किती बांधकाम करावे याचे नियम आहेत. तर आता नवीन नियमावलीप्रमाणे मजल्यांची अट राहणार नसून, चार, पाच मजले वाढवता येणार आहेत. मात्र, त्यात उंचीची मर्यादा राहणार आहे. त्याची नियमावली राहणार आहे.

जुन्या नियमावलीचा आधार
महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकामाला जुन्या नियमाप्रमाणे परवानगी देण्यात येत आहे. त्यात एक एफएसआय बांधकामाची परवानगी देण्यात येत आहे. त्याप्रमाणे जेवढ्या बांधकामाला परवानगी आहे. तेवढेच बांधकाम वरील मजल्याचे करता येते. तेही केवळ दोन मजल्यांचेच आहे.
बांधकामाचे असे आहेत नियम
राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रमुख मार्गासमोरील रस्त्यावर 450 चौरस मीटरचाच प्लॉट घेता येतो. तेथे दोन मजल्यापर्यंत बांधकामाची मंजुरी आहे. त्याचप्रमाणे 18 मीटर रुंदीच्या रस्त्यालगत 450 चौरस फूट प्लॉट पाडले जातात. 18 मीटर पुढील रस्त्याला कमीत कमी 300 चौरस मीटरचा प्लॉट असतो. येथे एक मजल्याचे बांधकाम करण्यात येते.

मर्यादांमुळे वाढताहेत किमती
सध्या एक एफएसआय बांधकामाची मंजुरी आहे. त्याप्रमाणे तळमजला आणि त्यावर दोन मजले बांधकामाला मंजुरी आहे. अशाप्रकारे केवळ दोनच मजले बांधकाम करण्यात येत असल्याने त्यात दहा ते पंधरा प्लॉट येतात. नवीन बांधकाम करण्यासाठी पुन्हा नवीन प्लॉट विकत घेऊन त्यावर बांधकाम करावे लागते. त्यामुळे प्लॅटच्या किमती वाढत आहे.
फोटो - डमी पिक