आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहरगावच पोलिसपाटील निघाला चारचाकीचोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- कमी किमतीत चारचाकी विक्री करणारा मेहरगावचा (ता.अमळनेर) पोलिस पाटील किशोर पिरन पाटील याला रविवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून पोलिसांनी एकाच दिवसात चक्क 15 चोरीच्या चारचाकी जप्त केल्या आहेत. किशोरसह त्याचा चुलत भाऊ भूषण भीमराव पाटील यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दोन दिवसांपूर्वी किशोर चोरीची वाहने कमी किमतीत विकत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथक तयार करून पोलिसांनी किशोरवर नजर ठेवली. रविवारी रात्री किशोर भडगावहून चाळीसगाव येथे एमएच 15 डीएम 8479 या चारचाकीने जात होता. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रभाकर रायते, उपनिरीक्षक गिरधर निकम, सुरेश पवार, उत्तमसिंग पाटील, बापुराव भोसले, संजय पाटील, दिलीप येवले, लिलाकांत महाले, विनय देसले, रवींद्र चौधरी, रवींद्र पाटील व सुशील पाटील यांनी दोन पथके तयार करून किशोरचा पाठलाग केला. तांदलवाडी फाट्याजवळ पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली. तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या चारचाकी चोरीच्या गुन्ह्यात किशोरला अटक करण्यात आली आहे.
व्हाया मुंबई प्रवास
जप्त केलेल्या चारचाकींपैकी निम्म्यापेक्षा जास्त मुंबई तसेच मुंबईतल्या उपनगरांतूून चोरी केल्या आहेत. किशोरला ज्या चारचाकीसह पकडले तिचा मूळ क्रमांक एमएच 04 ईएस 9386 हा आहे. भिवंडी येथील मारुती पाटील यांच्या मालकीची ती गाडी आहे. 16 जून 2014 रोजी ती चोरी झाली. या प्रकरणी मेघवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
पथकाने या गाड्या केल्या जप्त
तवेरा कंपनीच्या एमएच 15 डीएम 8794, एमएच 15 डीएम 8579, एमएएच 04 एफजे 3472, एमएच 15 डीजे 6403, एमएच 06 एएफ 3809, एमएच 15 डीएम 4306, इनोव्हा कंपनीच्या एमएच 04 डीजे 2798, एमएच 04 8114, इंडिका कंपनीच्या एमएच 28 व्ही 793, बोलेरो एमएच 04 ईडब्ल्यू 5623, मारुती स्वीफ्ट एमएच 04 इडी 2433 तर दोन विनाक्रमांकाच्या चारचाकी आहेत. हे क्रमांक बनावटदेखील असू शकतात.
बनावट कागदपत्रे तयार करून गाड्यांची विक्री
किशोरने दिलेल्या माहितीनुसार पोलिस कामाला लागले. जागेवरच पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली. किशोर आणि भूषण यांना वेगवेगळ्या पथकांसोबत देऊन रविवारच्या रात्रीतच जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, रावेर, यावल, जळगाव येथून 15 चारचाकी जप्त केल्या. या सर्व चारचाकी आपण चोरी करून तिचे बनावट कागदपत्रे तयार करून विक्री केल्याचे किशोरने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी खरेदी करणार्‍यांकडून वाहने जप्त केली आहेत.
दीड वर्षांपासून व्यवसाय
दोन वर्षांपूर्वी किशोर गावचा पोलिस पाटील झाला. राजकीय पाठबळ असलेल्या किशोरने दीड वर्षांपासून टुर्स अँण्ड ट्रॅव्हल्स तसेच चारचाकी खरेदी-विक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे भासवले. प्रत्यक्षात मात्र तो चोरी आणि चोरीच्या वाहनांची खरेदी-विक्री करीत होता.
मुंबई, धुळ्यात कनेक्शन?
जप्त केलेली चारचाकी वाहने मुंबईतली आहेत. मुंबईतील एक मोरक्या हे रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांचा संशय आहे. मोरक्यानेच किशोरला स्वतंत्र मोबाइल आणि सिमकार्ड दिले आहे. या सिमकार्डहून कोडवर्ड मध्येच त्यांचे बोलने होत होते. धुळ्यातही त्यांचे धागेदोरे आहेत.