आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चारचाकी चोरांच्या म्होरक्याने दिला एलसीबी पोलिसांना गुंगारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- मुंबई, पुणे, ठाणे यासारख्या मेट्रो सिटीत पॉश चारचाकी चोरून विक्री करणारा अट्टल चोरटा राज परब याला अटक करण्यासाठी बुधवारी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचला. राज ठरलेल्या ठिकाणावरही आला. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच काही सेकंदात तो आपल्या कारने सुसाट वेगात पळून जाण्यात यशस्वी ठरला. धुळे-मालेगाव महामार्गावर टोलनाक्यानजीक पहाटे 5 वाजेच्या सुमारास चोर-पोलिसांतला हा फिल्मी स्टाइल थरार झाला.

दोन दिवसांपूर्वी जळगाव एलसीबीने अमळनेर तालुक्यातील मेहरगावचा पोलिसपाटील किशोर पाटील आणि त्याचा चुलत भाऊ भूषण भीमराव पाटील यांना चारचाकी चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. या दोघांनी दोन दिवसांत 26 चारचाकी चोरी केल्याची कबुली दिली असून पोलिसांनी या सर्व गाड्या जमा केल्या आहेत. पोलिसांना या रॅकेटचा म्होरक्या हवा होता. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी रात्री किशोरला विश्वासात घेऊन मुंबईतील त्यांचा म्होरक्या राज परब याच्याशी संपर्क साधण्याचे सांगितले. या वेळी किशोरला राजला चारचाकीसाठी ग्राहक आला असून गाडी हवी असल्याचे सांगण्यास सांगितले. दोघांच्या संभाषणानंतर ठरलेल्या वेळेत राज स्पॉटवर पोहोचला होता. मात्र, पोलिस त्याला ताब्यात घेण्यापूर्वीच तो पसार झाला. हा सापळा यशस्वी करण्यासाठी किशोरलाही सोबत ठेवले होते.
मुंबईत छापे
किशोरने एकदा परबच्या ठाणे येथील अँक्सिस बॅँकेच्या अकाउंटमध्ये पैसे टाकले होते. हे अकाउंट मल्हारी एन्टरप्रायजेस नावाने होते. त्यानुसार बुधवारी मुंबई पोलिसांनी ठाण्यातील परबचे घर, ऑफीसची झडती घेतली.
पूर्वी केला होता गोळीबार
मुंबई पोलिसांनी परबला पकडण्यासाठी गेल्या वर्षी अशाच प्रकारचा सापळा रचला होता. त्या वेळी त्याने मुलुंड परिसरात पोलिस कर्मचार्‍यांवर गोळीबार करून पळ काढला होता. राज चारचाकी वाहन अतिशय वेगात चालवण्यात माहीर आहे. शिवाय सोबत रिव्हॉल्वर, हत्यारे तो नेहमी बाळगतो, अशी माहिती मुंबई पोलिसांकडून जळगाव एलसीबीला मिळाली आहे.
गाडी डिलिव्हरीसाठी धुळ्याचा स्पॉट फिक्स
राज आणि किशोर यांचा गाडी डिलिव्हरीसाठी धुळे-मालेगाव महामार्गावरील टोलनाक्यापासून चार किलोमीटर अंतरावरील एक स्पॉट फिक्स होता. ही माहिती किशोरने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून राजला बोलावले होते. मंगळवारी रात्री 12 वाजता राज मुंबईतील गोरेगाव भागात होता. त्याच्याकडे मारुती कंपनीची व्हर्ना ही चारचाकी होती. हीच गाडी विक्री करण्याच्या उद्देशाने तो त्याच गाडीने अवघ्या पाच तासांत म्हणजेच पहाटे 5.10 मिनिटांनी धुळ्यात आला होता.