आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता ठेक्यात आयुक्तांना 30, आरोग्य अधिकाऱ्यास 20 हजार हप्ता; नगरसेविकेचा सनसनाटी अारोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- प्रभागातील साफसफाईच्या ठेकेदाराशी ‘आर्थिक सेटलमेंट’ करून घ्या अस्वच्छतेच्या तक्रारी करू नका, असा निरोप पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवला होता. स्वच्छतेच्या ठेक्यात तत्कालीन मनपा आयुक्तांना ३०, तर आरोग्याधिकाऱ्यास दरमहा २० हजार रुपये हप्ता दिला जातो, असा खळबळजनक आरोप नगरसेविका अश्विनी देशमुख त्यांचे पती विनोद देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. माझी पैशांची कधीच मागणी नव्हती. म्हणूनच आरोग्य अधिकारी डॉ.विकास पाटील, स्थायी समितीच्या माजी सभापती ज्योती चव्हाण यांच्या घरी ‘सेटलमेंट’संदर्भात झालेल्या बैठकांचे स्टिंग ऑपरेशन केले असल्याचे सांगत देशमुख यांनी पत्रकार परिषदेतच त्या व्हिडिअाे क्लिप्स जाहीर केल्या. 

शहर स्वच्छतेमधील भ्रष्टाचार प्रकरणी आता पालिकेचे तत्कालीन आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, आरोग्य अधिकारी डाॅ.विकास पाटील, आरोग्य निरीक्षक सोनवाल किरंगे यांच्याविरुद्ध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पोर्टलच्या माध्यमातून तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ठेकेदार, त्यांचे प्रतिनिधी नितीन सपके पिंटू जाधव यांनी धमक्या दिल्या म्हणून त्यांच्याविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार देणार असून, नगरसेविका ज्योती चव्हाण यांना अपात्र ठरवण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली आहे. 

पालिकेच्या प्रभाग क्रमांक ३६साठी सहजीवन स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला स्वच्छतेचा ठेका देण्यात आला आहे. अश्विनी देशमुख या प्रभागाच्या नगरसेविका आहेत. प्रभागात स्वच्छता व्यवस्थित होत नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारींनुसार आपण वेळोवेळी पालिका प्रशासनाकडे संबंधितांच्या तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्यावर उपाययोजना करता उलट आम्हालाच ‘आर्थिक सेटलमेंट’ करून घेण्याचे सल्ले देण्यात आले. आम्ही पैसे घेण्यास नकार देत असल्याचे पुरावे गोळा करण्यासाठी जानेवारी महिन्यात स्टिंग ऑपरेशन करून संबंधितांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पालिकेचे आर्थिक नुकसान करण्यात ठेकेदारांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी साखळी पद्धतीने आपले खिसे भरले आहेत, असे आरोप देशमुख दांपत्याने पत्रकार परिषदेत केले. 

१५ हजार रुपये महिना देण्याचे आमिष
नगरसेविका चव्हाण त्यांचे पती बाळासाहेब चव्हाण यांच्या घरी एक बैठक झाली. या बैठकीत त्यांनी तक्रारी करण्यापोटी १० हजारांवरून १५ हजार रुपये देण्याचे कबूल केेले. आरोग्य अधिकारी डॉ.पाटील यांनी या बैठकीत पुढाकार घेतला. हेदेखील त्या ठेक्यात पार्टनर आहेत. प्रत्येक बैठकीच्या वेळी उपस्थितांचे मोबाइल बंद करून डॉ.पाटील हे स्वत: जवळ ठेवून घेत होते. प्रभागातील अारोग्यदूतांनादेखील पैसे देण्याचे आमिष देण्यात आले. या बैठकीतदेखील आम्ही पैसे घेण्यास नकार दिला आहे. अशीच एक बैठक डॉ.पाटील यांच्या घरीही झाली. या वेळी आरोग्यदूत मुविकोराज कोल्हे यालादेखील पैशांचे आमिष दाखवले गेले. 

काय म्हणतात व्हिडिओ क्लिप्स? 
देशमुख यांनी जाहीर केलेल्या वेगवेगळ्या व्हिडिओ क्लिप्समध्ये आरोग्य अधिकारी डॉ.पाटील, नगरसेविका चव्हाण, त्यांचे पती तथा मनपा कर्मचारी बाळासाहेब चव्हाण हे पैसे देण्याची ऑफर देत असताना दिसून येत आहेत. ‘येणाऱ्या काळात निवडणूक आहे. तेव्हा पैसे लागतीलच. पैसे कमावून घ्या’ असा सल्ला वजा ऑफर देशमुख यांना दिली गेली आहे. एका क्लिपमध्ये डॉ.पाटील हे आरोग्यदूत कोल्हेंना पैसे देण्याचे आमिष दाखवत आहेत. सुमारे ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळेच्या या क्लिप्स अाहेत. 

राजीनामा देण्याची तयारी 
अस्वच्छतेच्या तक्रारींमुळे आमच्यासह मुलांचा जीव धोक्यात आला आहे. संबंधितांकडून धमक्या येत आहेत. राजकारण एवढ्या खालच्या थराला जात असेल तर मी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. तसेच सभागृहात जाण्याचा निर्णय मी घेतला आहे. 
- अश्विनी देशमुख, नगरसेविका 

पोलिसांत गुन्हा दाखल करणार 
देशमुख दांपत्याने माझ्या घरी येऊन व्हिडिओ क्लिप्स तयार केल्या आहेत. हा प्रकार चुकीचा असून त्याच्या चौकशीसाठी पोलिसांत गुन्हा दाखल करणार आहे. तसेच त्या क्लिप्सही खोट्या आहेत. देशमुख यांनी पैशांची मागणी केली असल्याचे मला माहिती झाले होते. दरम्यान, त्यांच्या प्रभागातील मक्त्याशी माझा काहीएक संबंध नसल्यामुळे माझ्या घरी येऊन त्यांनी केलेला हा प्रकार चुकीचा आहे. त्यांनी पैसे मागितल्याच्या ऑडिओ क्लिप्स काही दिवसांपूर्वी व्हाॅट्सअॅपवर व्हायरल झाल्या होत्या. त्यामुळे द्वेषभावनेतून देशमुख हा प्रकार करत आहेत. 
- ज्योती चव्हाण, नगरसेविका 

खाेटे अाणि बिनबुडाचे अाराेप 
माझ्यावर करण्यात अालेले अाराेप हे धादांत खाेटे बिनबुडाचे अाहेत. सफाई मक्त्याच्या माध्यमातून मला एक रुपयांचाही लाभ हाेत नाही. या वाॅर्डात काम व्हायला पाहिजे नागरिकांच्या समस्या दूर व्हायला हव्यात. 
- डाॅ.विकास पाटील, अाराेग्याधिकारी, महानगरपालिका 

मक्तेदारास दरमहा लाख रुपयांचा फायदा 
शहरातील सर्व सफाईच्या ठेक्यांमध्ये आयुक्तांना दरमहा ३० हजार, उपायुक्त २५ हजार, आरोग्य अधिकारी २० हजार, आरोग्य निरीक्षक यांना १५ हजार रुपयांचे पाकीट ठेकेदारांमार्फत दिले जाते. सफाईसाठी लाख रुपयांच्या आत खर्च केला जातो. उर्वरित रक्कम साखळी पद्धतीने वाटून घेत मक्तेदाराला एक लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेचा फायदा दरमहा होतो आहे. या ठेक्यांची एसीबीमार्फत चौकशी झाली पाहिजे. 

आमच्या तक्रारींवरून ठेकेदाराला दंड झाले, असे सांगण्यात आले; पण प्रत्यक्षात फक्त दाखवण्यापुरते दंड आकारण्यात आले आहेत. प्रत्यक्षात केलेल्या चुकांचे दंड लाखोंच्या घरात असताना काही हजारांचे दंड करून पालिका प्रशासनाने ठेकेदारांना पाठीशी घातले आहे,असा आरोप देशमुख यांनी केला. 

१,५०० तक्रारी गहाळ
अस्वच्छतेच्या बाबतीत वेळोवेळी सुमारे हजार ५०० तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी हजार ५०० तक्रारी पालिका प्रशासनाने गहाळ केल्या. मात्र, ई-मेलद्वारे त्याचे रेकॉर्ड आमच्याकडे उपलब्ध आहे. 

एका दिवसात ठेका सुरू
प्रभागात नियमित स्वच्छता होत नसल्यामुळे जून २०१७ रोजी ठेका रद्द करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा ठेका पुन्हा सुरू करण्याचेही आदेश देण्यात आले. 

समितीसमाेर पुरावे सादर करा 
माझ्यावरील आरोप हे धादांत खोटे आहेत. मी कुणालाही पाठीशी घातलेले नाही. देशमुख यांच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महासभेने चौकशी समिती नेमली आहे. त्या समितीसमोर त्यांनी सर्व पुरावे सादर करणे अपेक्षित आहे. त्यानंतर चौकशी अधिकारी वस्तुस्थिती काय आहे, हे ठरवतील. 
- जीवन सोनवणे, निवृत्त आयुक्त

जिल्हाधिकाऱ्यांकडे मागण्या 
- तत्कालीन आयुक्त सोनवणे यांचे निवृत्तिवेतन तत्काळ रोखावे. 
- उपायुक्त कहार, आरोग्य अधिकारी डॉ.पाटील यांना निलंबित करा. 
- दंडापोटी पालिकेचे झालेले नुकसान संबंधित कर्मचाऱ्यांकडून वसूल करा. 
- नगरसेविका ज्योती चव्हाण यांना अपात्र करण्यासाठी निवडणूक आयोगाला माहिती द्या. 
- धमक्या दिल्या म्हणून ठेकेदार त्यांच्या प्रतिनिधींवर त्वरित गुन्हे दाखल करा.
बातम्या आणखी आहेत...