आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मतदार यादी बनली 'घोळांची मतदार यादी'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- लोकसभा निवडणुकीसाठी लवकरच आचारसंहिता लागू होणार असून, त्यादृष्टीने प्रशासन कामाला लागले आहे; परंतु नुकत्याच जाहीर झालेल्या मतदार याद्यांमध्ये ‘मागचे पाढे पन्नास’ याप्रमाणे चुकांचा सिलसिला काही थांबलेला दिसत नाही. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवाढीची वल्गना करणारे प्रशासन खरेच किती गंभीर आहे, हे या प्रकारातून दिसत आहे.

सध्या देशभरात सर्वत्र निवडणुकांचा माहोल तयार झाला असून, राजकीय पक्षांनी आपापल्या पद्धतीने कामाला सुरुवातही केली आहे. राज्यातही 31 जानेवारी रोजी मतदारांच्या अंतिम याद्या जाहीर करण्यात आल्या. त्यापूर्वी प्रशासनाच्या ‘बूथ लेव्हल ऑफिसर’ (बीएलओ) यांनी प्रत्येक बूथमध्ये जाऊन घरोघरी असलेल्या मतदारांची माहिती संकलित केली; मात्र याद्या जाहीर झाल्यानंतर प्रशासकीय कामातील एकेक चमत्कार पाहायला मिळू लागला आहे. निवडणूक आली की, राजकीय कार्यकर्ते आपल्या हक्काच्या मतदारांची नावे शोधण्याची मोहीम सुरू करतात आणि या कार्यक्रमालाही आता सुरुवात झाली आहे. प्रभाग व वॉर्डनिहाय मतदार याद्या कार्यकर्त्यांकडे रवाना होऊ लागल्या असून, चुका उघड होत आहेत.

टक्केवारी कशी वाढेल? : आधीच मतदानाचा दिवस म्हणजे सुटीचा दिवस म्हणून उपभोगला जातो. त्यामुळे बरेच जण मतदानासाठी घरातून बाहेर पडत नाहीत. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी शासनावर आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम हाती घेतले जातात; परंतु मतदार याद्यांमध्ये बर्‍याचदा नाव बरोबर तर फोटो चुकीचा, ओळखपत्र आहे; पण आडनाव चुकीचे अशा मोठय़ा व किरकोळ चुकांमुळे मतदाराला मतदानाचा अधिकार बजावता येत नाही. वरील प्रकारच्या असंख्य चुका आता समोर येऊ लागल्या असून, परिस्थिती अशीच राहिल्यास शासनाचे मतदान टक्केवाढीचे उद्दिष्ट खरेच पूर्ण होईल का?
असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

नागरिकांसाठी सोय : भाजपा महानगर आघाडीच्या वतीने दुपारी 4 ते 6 या वेळेत मतदार याद्या उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच नागरिकांनी नावात अथवा वयात बदल करावयाचा असल्यास दुरुस्ती फॉर्म कार्यालयात उपलब्ध आहेत, असे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सरचिटणीस दीपक फालक व अमित भाटिया यांनी कळवले आहे.

काय आहेत नव्या मतदार यादीतील गमतीजमती ?
दुरुस्ती अर्जाचा पर्याय
मतदार याद्या जाहीर झाल्या असून, त्यात काही चुका असल्यास त्यांच्या दुरुस्तीसाठी तहसील कार्यालयात दुरुस्ती फॉर्म उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी ते भरून द्यावेत. तसेच मतदारांच्या मदतीसाठी केंद्रेही सुरू करण्यात आली आहेत. मतदानापूर्वी त्या चुकांच्या दुरुस्तीचा प्रय} राहणार आहे. गोविंद शिंदे, तहसीलदार

एका यादीत तीन वेळा नावे
मतदार यादी क्रमांक 163मध्ये ‘किरण साळवी’ या मतदाराचे नाव तब्बल तीन वेळा आले आहे. तीनपैकी एका ठिकाणी ‘डिलिटेड’ असा शिक्का आहे. त्यामुळे नेमके कोणते नाव ग्राह्य धरावे, यावरून वाद उद्भवू शकतो.

पिंप्राळा परिसरातील कार्यकर्त्यांनी शोधलेल्या चुकांमध्ये एका नावाची व्यक्ती असून, त्यांच्या पत्‍नीसह आणखी दोन महिलांच्या नावांसमोर पतीचे नाव चुकीचे छापून आले आहे. प्रत्यक्षात पहिले नाव बरोबर असले तरी, पतीचे नाव चुकीचे असल्याने संबंधिताला मतदानाचा अधिकार मिळू शकणार नाही.

पत्‍नीच्या नावासमोर पतीचा फोटो
‘मुंगड’ आडनाव असताना पती व पत्‍नीच्या नावापुढे ‘मुंगडा’ असे लिहिले आहे. पत्‍नीच्या नावासमोर पतीचा फोटो देण्यात आला आहे. ओळखपत्रावरील नाव आणि यादीतील नावात फरक असल्यामुळे मतदानास जाऊनही हक्क न बजावता परतण्याची वेळ मतदारांवर येईल.

पत्‍नी 10 वर्षांनी मोठी
जळगाव शहराच्या मतदार यादी क्रमांक 132मध्ये ‘तिवारी’ आडनाव असलेल्या कुटुंबात पत्‍नीचे वय 54, तर पतीचे 44 वर्षे नमूद आहे. त्यात पतीपेक्षा पत्‍नी तब्बल 10 वर्षांनी मोठी दाखवली आहे.