आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

350 रुपयांमध्ये कार, 600 मध्ये फ्लॅट; गुजरातच्या मार्केटिंगचा फंडा, जळगावकरांना कोटींचा गंडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गायत्री मार्केटिंगने ग्राहकांना दिलेले पावती बुकलेट. - Divya Marathi
गायत्री मार्केटिंगने ग्राहकांना दिलेले पावती बुकलेट.
जळगाव- फ्लॅट, महागड्या चारचाकी गाड्या, दुचाकींसह सुमारे २८० वस्तू हमखास देणारी योजना राबवणाऱ्या गुजरातमधील गायत्री मार्केटिंग कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून शहरातून गाशा गुंडाळला आहे. गायत्री मार्केटिंगच्या एका एजंटानेच दिलेल्या तक्रारीमुळे हा नवा घोटाळा शुक्रवारी चव्हाट्यावर आला. गायत्री मार्केटिंगच्या मायाजालमध्ये शहरातील सुमारे शंभरावर ग्राहक अडकले आहेत आणि एकट्या जळगाव जिल्ह्यात त्यांच्या ग्राहकांची संख्या शेकडोवर आहे. कंपनीच्या ब्रोशरवर १० ‘आयोजकांची नावे आहेत. याशिवाय कस्टमर केअर नंबरही दिला आहे. मात्र, कस्टमर केअरवरच्या फोनवर आता प्रतिसादही मिळत नाही. 

शहरातील नवीन बी. जे. मार्केटमध्ये पहिल्या मजल्यावर दुकान क्रमांक ‘१८ बी’मध्ये गायत्री मार्केटिंगने कार्यालय थाटले होते. शुक्रवारी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधी आणि छायाचित्रकाराने तिथे फेरफटका मारला असता, कार्यालयास टाळे होते आणि गायत्री मार्केटिंगचा बोर्डही त्यावर नव्हता. गुजरातमधील वापी येथे मार्केटिंग फर्मची नोंदणी असल्याचे त्यांच्या ब्रोशर वर नमूद करण्यात आले आहे. शिवाय ८ हजार ८८८ सभासद असल्याचा दावाही करण्यात आला आहे. अत्यंत आकर्षक माहिती पुस्तिका छापून त्यावर योजनेत सहभागी झाल्यास ग्राहकांना कसा फायदा होईल हे दर्शवण्यात आले आहे. अगदी २ लाखांच्या कारपासून ते अलीशान एसयूव्ही कार,फ्लॅटचे आमिष दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे समृद्धी,मैत्रेय यासारख्या योजनांमध्ये हात पोळल्याचा अनेकांचा अनुभव असूनही गायत्री मार्केटिंगच्या भुलभुलैयामध्ये शेकडो ग्राहक अडकले. 

काम करणाऱ्याला मारहाण 
गायत्री मार्केटिंगचे आयोजक पैसे घेऊन फरार झाल्यानंतर नियमित पैसे भरणाऱ्े सभासद कमालीचे हैराण झाले आहेत. त्यामुळे या मार्केटिंगसाठी काम करणाऱ्यांकडे सभासदांनी पैसे किंवा वस्तू देण्यासाठी तगादा लावला आहे. या कार्यालयात काम करून सभासदांकडून पैसे जमा करणाऱ्या विक्रम जगन सोनवणे (रा.समतानगर) यांच्याकडे भेटवस्तूंसाठी सभासदांनी तगादा लावला आहे. त्यांना काही सभासदांनी मारहाणही केली होती. त्यानंतर त्यांनी जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा तपास गिरधर निकम करीत आहेत. 

१७ प्रकारच्या ठेवल्या अटी 
कंपनीने १७ अटी-शर्ती ठेवल्या होत्या. त्यात भरलेले पैसे परत मिळणार नाहीत. सर्व हप्ते वेळेवर भरल्यानंतर भेटवस्तू दिली जाईल. चुकीमुळे एखाद्या सभासदाचा क्रमांक निघाला नाही तर त्याला २५ हजार रोख देण्याचेही आमिष दिले होते. १ डिसेंबर २०१५ पासून ही योजना सुरू झाली होती. ११ फेब्रुवारी २०१७ रोजी शेवटची सोडत काढण्याचे नियोजित होते. आयोजकांनी प्रारंभी सभासदांना दुचाकी, कार, टी.व्ही., दुचाकी आदी भेटवस्तू दिल्या. मात्र, मार्चपासून शेकडो सभासदांकडून लाखो रुपये उकळून फरार झाले आहेत. 

योजना १४ चे गौडबंगाल 
योजना क्रमांक १४ च्या माध्यमातून ८ हजार ८८८ सभासदांसाठी प्रत्येकाला हमखास एक प्रोत्साहन भेटवस्तू, १ लाख रुपयांचा अपघात विमा, नैसर्गिक मृत्यू गंभीर आजारालाही १ लाख रुपयांची आर्थिक मदत तसेच १५ सोडतीतून सभासदांना विशेष २८० भेटवस्तू देण्याचे आमिष दिले होते. त्यामध्ये महागड्या कार, फ्लॅट, दुचाकींचा समावेश होता. या भेटवस्तू घ्यायच्या नसल्यास रोख ९ लाख ९९९ रुपये देण्याचीही तयारी दर्शवण्यात आली होती. यासाठी सभासदांकडून ३५०, ५५०, ६०० रुपयांप्रमाणे १५ हप्ते घेण्यात आले. त्याबाबत पावत्याही दिल्या होत्या. 
 
हे आहेत संशयित 
गायत्रीमार्केटिंगमध्ये तुषार दिलीप चौधरी, विनोद छबुराव आबक, राजू आहिर, नरेश भारंबे, दीपक चौधरी, अल्ताफ सोरठिया, भिला कोळी, विमल परमार, अप्पू अन्सारी, रईस चौधरी हे १० जण या योजनेचे आयोजक होते. यात काही जण गुजरात आणि जळगाव येथील आहेत. 

असे आहे अर्थकारण 
- १५ महिन्यांची योजना 
- दरमहा सोडत, यो बाईकपासून ते कारपर्यंत हमखास बक्षीस 
- योजनेत नाममात्र शुल्क 
- दरमहा ३५० रुपये × १५ महिने = ५२५० 
- ५५० × १५ = ८२५० 
- ६०० × १५ = ९००० 
बातम्या आणखी आहेत...