आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फ्रेशर्स पार्टीतील पैसे वाचवून मित्रास मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - फ्रेशर्स पार्टीत होणाऱ्या खर्चात कपात करून ते पैसे गरीब विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा अभिनव उपक्रम आयएमआर महाविद्यालयातील द्वितीय वर्षाच्या ई-कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी हाती घेतला.

आयएमआर महाविद्यालयातील ई-कॉमर्सच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना फ्रेशर्स पार्टी दिली. त्यात इतर महाविद्यालयांप्रमाणे या विद्यार्थ्यांनीही उत्तम व्यवस्था करण्याचे नियोजन केले होते. मात्र, या विद्यार्थ्यांनी पार्टीत बडेजाव करता खर्चात कपात करून वाचलेले पैसे आपल्याच वर्गातील विशाल दिनकर भंगाळे या आपत्तीग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलाच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचा निर्णय घेतला. आठ दिवसांपूर्वी सर्वांनी मिळून घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद ठरला. शनिवारी फ्रेशर्स पार्टीच्या खर्चात कपात करण्यासाठी उद्घाटनप्रसंगी कुणाचेही स्वागत वा सत्कार करण्यात आला नाही. त्यामुळे फुले, बुके यांचे पैसे वाचले. तसेच जेवणात केवळ पोळी, भाजी आणि भात असे तीनच मेन्यू ठेवल्याने जेवणातूनही पैसे शिल्लक राहिले. अशा प्रकारे एकूण खर्चाच्या सुमारे ३० टक्के खर्च कपात करण्यात विद्यार्थ्यांना यश आले, अशी माहिती ई-कॉमर्सच्या द्वितीय वर्षाचा सोशल मीडिया समन्वयक योगेश सूर्यवंशी याने ‘दिव्य मराठी’ला दिली.

पाच हजार रुपयांची गरज
विशाललाफी व्यतिरिक्त इतर शैक्षणिक खर्चासाठी पाच हजार रुपयांची गरज आहे. त्यासाठी सोमवारपासून पुन्हा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून स्वेच्छेने मदत घेतली जाणार आहे. या पैशांतून विशालचे पुढील दोन वर्षांचे शिक्षण पूर्ण होणार आहे.

भंगाळेच्या शेतीचे नुकसान
विशालभंगाळे हा मूळ कानळदा येथील रहिवासी आहे. गेल्या महिन्यात झालेल्या वादळी पावसामुळे त्याच्या केळीच्या बागेचे प्रचंड नुकसान झाले. हाताशी आलेले उत्पन्न हिरावले गेल्याने भंगाळे कुटुंबीयांवर वाईट प्रसंग ओढवला. त्यामुळे विशालवर शिक्षण सोडण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत वर्गमित्रांनी त्याच्यासाठी मदतीचा हात पुढे करत फ्रेशर्स पार्टीच्या खर्चात कपातीचा निर्णय घेतला होता. या पैशांमधून विशालची वार्षिक फी भरून शैक्षणिक साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. त्याला महाविद्यालयातील कमवा शिका योजनेतूनही काम देण्यात आले आहे.