आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मित्रांसह जिहादसाठी गेलेला मुलगा अद्याप परतलाच नाही, काश्मीर येथे गेला होता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- माझा मुलगा बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रनिकेतनच्या तृतीय वर्षाला होता. २००० मध्ये तोशुल्क भरण्यासाठी १० हजार रुपये घेऊन गेला. मात्र, त्याने परीक्षाही दिली नाही आणि प्रवेशही घेतला नाही. त्याच्या पाच मित्रांसोबत तो काश्मीर येथे जिहादसाठी गेला होता. मात्र, तो आजपर्यंत परत आला नाही, अशी साक्ष सिमी प्रकरणातील संशयित आसिफ शेख याचे वडील शेख सुपडू शेख साहेबू यांनी गुरूवारी न्यायालयात दिली.
न्यायाधीश ए. के. पटनी यांच्या न्यायालयात तीन साक्षी झाल्या. यात संशयित असिफचे वडील शेख सुपडू यांची महत्त्वाची साक्ष झाली. यात त्यांनी असिफचे मित्र रिजवान सिद्धिकी, शकील हन्नान, परवेज रियाजोद्दीन खान, जुनेद ऊर्फ आसिन खान अब्दुल्ला बशीर खान यांच्यासोबत सिमीच्या बैठका घेत होते. त्यांच्या सांगण्यावरूनच आसिफ काश्मिरात गेला होता. तो परत आलाच नाही.
आसिफ हा बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालयात तंत्रनिकेतनच्या इलेक्ट्रॉनिक्सच्या तृतीय वर्षात होता. त्याच्याविषयी पोलिसांना विचारणा केली. मात्र, त्यांनाही काही माहित नव्हते. तर त्याच्या मित्रांना विचारले तर जास्त विचारू नका नाही तर तुमच्या मुलाला धोका होईल, असे सांगितल्याचे शेख सुपडू यांनी सांगितले. सरकारी वकील टी. डी. पाटील यांनी परवेज आणि आसिफ खानला ओळखता काय? असा प्रश्न विचारल्यानंतर त्यांनी परवेज न्यायालयात बसलेला असल्याचे सांगून आसिफ मुंबईतील ऑर्थररोड कारागृहात असल्याचे सांगितले. तसेच सिमीसंदर्भात काहीच माहित नसल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
या प्रकरणातील दुसरा साक्षीदार शेख इक्बाल शेख रसूल यांचा पूर्वीचा जबाबच ग्राह्य धरण्याचे दोन्ही पक्षातर्फे विनंती केली. या प्रकरणातील तिसरा साक्षीदार सुभाष रमेश पाटील याचीही साक्ष झाली. यात त्यांनी आसिफ खान हा १९ जून १९९७ ला सिमी संघटनेचा जिल्हाध्यक्ष होता. त्यांनी अक्सा मशिदीत बैठका घेण्याच्या परवानगीसाठी १० अर्ज केले होते. तसेच १९९८ ला परवेज हा सिमी संघटनेचा सचिव होता. त्यानेही अर्ज दिले असल्याची कबुली दिली. अक्सा मशिदीचे तत्कालीन अध्यक्ष शेख फारूक शेख अब्दुल्ला यांनी बैठका घेण्यासाठी परवानगी दिल्याची साक्ष दिली.

२१ ऑक्‍टोबरला सुनावणी
पुढीलसुनावणी २१ ऑक्‍टोबरला होणार आहे. त्या दिवशी नार्का टेस्ट करणाऱ्या बंगळूरू येथील डॉ. मालिनी, तपासाधिकारी ए. डी. ठाकरे, सुभाष पटेल यांची साक्ष होणार आहे. सरकारपक्षातर्फे अॅड. टी. डी. पाटील यांनी तर आरोपीतर्फे अॅड. ए. ए. खान, अॅड. सुनील चौधरी यांनी काम पाहिले.