आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From 6 August Nomination Application Filling Starts

ऑगस्ट 6 पासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास होणार प्रारंभ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून प्रशासन व राजकीय पक्षांच्या धामधुमीला सुरुवात झाली आहे. मतदान 1 सप्टेंबर रोजी असले तरी 6 ऑगस्टपासून नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. यामुळे खर्‍या अर्थाने मंगळवारपासून पंधरा दिवसांनी इच्छुकांच्या दृष्टीने हालचालींना गती येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी दुपारी निवडणूक कार्यक्रमांची घोषणा केली. याबाबतचा फॅक्स आयुक्त संजय कापडणीस यांच्या दालनात येताच महापालिकेतील वातावरणात वेगळ्या प्रकारचा उत्साह जाणवू लागला होता. पालिकेच्या संपूर्ण क्षेत्रात निवडणूक आचारसंहिता लागू झाली असून तंतोतंत पालन करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच आचारसंहितेचा भंग होत असेल तर कायदेशीर कारवाई तत्काळ करावी, असे आदेश दिले आहेत.

गुन्ह्यांची माहिती नोंदवावी लागणार
उमेदवार अथवा त्यांच्यावर अवलंबून असणार्‍या व्यक्तींकडे किती संपत्ती आहे. उमेदवारावर कुठला अपराध केल्याचा आरोप आहे का, त्याची शैक्षणिक पात्रता याबाबत शपथपत्रात देणे बंधनकारक आहे. आरक्षित जागांवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी नामनिर्देशपत्रासोबत जातीचे प्रमाणपत्र तसेच जातीचे वैधता प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.

पदाधिकार्‍यांच्या गाड्या जमा
उपमहापौर मिलिंद सपकाळे, विरोधीपक्षनेत्या प्रतिभा देशमुख, पाणीपुरवठा सभापती नितीन बरडे, महिला बाल कल्याण सभापती लता भोईटे, शिक्षण मंडळ सभापती विजय वाणी, सभागृह नेते राजकुमार अडवाणी यांच्या ताब्यातील वाहने रात्री उशिरापर्यंत प्रशासनाच्या ताब्यात घेण्यात आल्याचे प्रकल्प प्रमुख शशिकांत बोरोले यांनी सांगितले. महापौर किशोर पाटील व स्थायी समिती सभापती रमेश जैन हे पालिकेचे वाहन वापरत नसल्याचे सांगण्यात आले. खासगी वाहनावरील लाल दिवा काढणार असल्याचे किशोर पाटील यांनी सांगितले.


प्रारूप मतदार याद्यांवरून उद्भवला वाद
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे प्रारूप मतदार याद्या महापालिकेच्या 14व्या मजल्यावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत; मात्र 37 प्रभागांसाठी प्रतिपान 5 रुपये आकारले जात असल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यादी घेण्याकरिता अर्ज करून फी भरल्यानंतर यादी उपलब्ध करून दिली जात आहे. सोमवारी पहिलाच दिवस असल्याने सुमारे 70 जणांनी यादी खरेदी केल्याचे सांगण्यात आले. तसेच याद्यांबाबत दोन हरकती प्राप्त झाल्या आहेत. त्यातील एक हरकत विशाल त्रिपाठी यांची प्रभाग क्रमांक 21संदर्भात आहे, तर दुसर्‍या हरकतीत अन्य प्रभागात नाव असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, मतदार याद्यांतील घोळासंदर्भात भाजपच्या पदाधिकार्‍यांनी आयुक्त संजय कापडणीस यांना भेटून आपली कैफियत मांडली. त्यात फोटो नसलेली अनेक नावे दाखल असून, बहुतांश नावे दुसर्‍याच प्रभागात असल्याचे सांगितले. याशिवाय प्रभाग क्रमांक 7मध्ये प्रभाग क्रमांक 21मधील नावे असल्याचे आणि मेहरूणच्या यादीत एमआयडीसी व अयोध्यानगरातील नावांचा समावेश असल्याचे तोंडी तक्रारीत सांगण्यात आले. शिवाजीनगरातील मतदारांची नावे एम.जे.कॉलेज परिसरातील यादीत सापडले.

बॅनर, होर्डिंग काढण्याचे आदेश
आयुक्त संजय कापडणीस यांनी अधिकार्‍यांची बैठक घेऊन आचारसंहितेचे काटेकोर पालन झाले पाहिजे, अशा सक्त सूचना दिल्या. मंगळवारी शहरातील पक्षांचे होर्डिंग्स, बॅनर व झेंडे काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे येणार्‍या 43 दिवसांत जळगाव शहर मोकळा श्वास घेईल यात शंका नाही. महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आयुक्त कापडणीस यांनी उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांच्यासह पालिकेच्या सर्वच विभागातील अधिकारी व निवडणुकीशी निगडीत कर्मचार्‍यांची दुसर्‍या मजल्यावरील सभागृहात बैठक घेतली. या वेळी मतदार याद्यांसंदर्भात येणार्‍या हरकतींची काळजीपूर्वक छाननी करून जबाबदारीने हाताळावे. मक्तेदारामार्फत सुरू असलेली कामे सुरूच राहतील पण वर्क ऑर्डर दिलेली आहेत पण कामे सुरू झालेली नाहीत त्यांचा शुभारंभ करता येणार नसल्याचे आयुक्त म्हणाले.

क्लोजचा शिक्का
पाणीपुरवठा, वीज, बांधकाम, आरोग्य विभाग व प्रभाग समित्यांच्या वर्क ऑर्डर रजिस्टवर नवीन कामांची नोंद करण्यात येऊ नये. या रजिस्टरवर क्लोजचा शिक्का मारण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आचारसंहिता काळात एकही कामाची ऑर्डर देता येणार नाही.