आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुसावळ आगाराने केली 80 लाख रुपयांची इंधन बचत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- फेब्रुवारीत इंधन दर लीटरमागे 10 रुपयांनी वाढल्याने राज्य परिवहन महामंडळासमोर आर्थिक संकट उभे राहिले होते. या मुळे महामंडळाने आगारातील पंप बंद करून खासगी पंपांचा आधार घेतला. या माध्यमातून भुसावळ आगाराची दरमहा सरासरी 12 लाख रुपयांची बचत झाली. फेब्रुवारीपासून बचत झालेल्या रकमेचा आकडा मात्र तब्बल 80 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे.

आधीच राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तोट्यात धावतात. हे कमी म्हणून की काय फेब्रुवारी महिन्यात इंधन कंपन्यांनी खासगी पंपांच्या तुलनेत महामंडळाच्या इंधनदरात 10.73 पैशांनी वाढ केली होती. परिणामी महामंडळासमोर प्रवाशी भाड्यात दरवाढ करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या मुळे महामंडळाला पुन्हा प्रवाशांच्या नाराजीसह आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागले असते. यावर उपाय म्हणून महामंडळाने खासगी पेट्रोल पंपाचा आधार घेतला. इतरांच्या तुलनेत डिझेल 10 रूपये कमी दराने मिळत असल्याने खासगी पंपांवरून इंधन भरण्याचा निर्णय घेतला.

या निर्णयाचा भुसावळ आगाराला फायदा झाला आहे. आगाराला दरमहा 11 लाख 50 हजार रुपयांची बचत या माध्यमातून करता आली. मात्र, इंधन भरण्यासाठी आगाराच्या 50 पैकी 45 बसेसला दररोज शहराबाहेर महामार्गावरील खासगी पेट्रोल पंपांवर पाच किलोमीटरचे अंतर कापावे लागते. या मुळे केवळ प्रवाशांचा वेळ वाया जात नाही, तर किरकोळ वाद नित्याचे झाले आहेत.

अतिरिक्त इंधनाचा भार
भुसावळ आगारातील 45 बसेस दररोज, तर पाच बसेस एक दिवसाआड पाच किलोमीटरचे अंतर कापून डिझेल भरण्यासाठी जातात. या प्रवासात प्रत्येक बसला किमान चार लीटर डिझेल लागते. एकीकडे डिझेलचे भाव वाढल्याने काटकसरीचे धोरण तर दुसरीकडे विनाकारण होणारा इंधनावरील खर्च अशी विरोधाभासी स्थिती आहे.

दररोज होईल 200 लीटरची बचत
वाहतुकीच्या मार्गावरून इंधन भरल्यास दिवसाकाठी 50 बसेसचे प्रत्येकी चार लीटरप्रमाणे 200 लीटर डिझेल वाचवता येईल. या मुळे आगाराला दिवसाला किमान 11 हजार रूपयांची बचत करता येईल.प्रवाशांचा वाया जाणार्‍या वेळेचा प्रश्नही मार्गी लागण्यास मदत होईल.

महामंडळाची इंधनाच्या बाबतीत बचत होत असली तरी, त्याचा अपेक्षित फायदा भुसावळ आगाराला होत नाही. प्रवाशी संख्या रोडावली आहे.
-ताराचंद पाटील, आगारप्रमुख, भुसावळ