आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जैन इरिगेशन’ची भूमिका सकारात्मकच;वेळेनुसार वाहतूक सुविधा द्यायला तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- इंधन बचतीच्या माध्यमातून ‘देश वाचवू’ अभियान स्वागतार्ह असून जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड या अभियानात सहभागी होऊन इंधनासाठी परकीय चलनावर होणारा खर्च कमी करण्यात या पुढेही हातभार लावत राहील, असे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी म्हटले आहे.

इंधन वाचवून देश वाचविण्याचे आवाहन करणारे आणि त्यासाठी उपाय सुचविणारे अभियान ‘दिव्य मराठी’च्या वतीने राबविण्यात येत आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. 5828 कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असलेल्या जैन इरिगेशनतर्फेही या अभियानाला प्रतिसाद देण्यात आला आहे. कंपनीतर्फे आजही इंधन बचतीचे मार्ग अवलंबले जात असून सार्वजनिक वाहतूकसेवेचाही कंपनीने प्राधान्यक्रमाने विचार केला आहे. कंपनीच्या वेळेनुसार बससेवा देण्यासाठी कोणतीही कंपनी तयार असेल तर जैन इरिगेशन त्या कंपनीशी करार करण्यास तयार आहे. यासाठी सहकार्य करणार्‍यांना कंपनीतर्फे काही अंशी सबसिडी देण्याचाही विचार प्राधान्याने केला जाईल, असेही अशोक जैन यांनी म्हटले आहे.

या संदर्भात जैन इरिगेशनच्यावतीने कंपनीची सविस्तर भूमिकाही जाहीर करण्यात आली आहे. कंपनीचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख पी.एस. नाईक यांनी दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहराव्यतिरिक्त हे सहकारी शिरसोली, कडोली, वैजनाथ, पाळधी, टाकरखेडा, बांभोरी, म्हसावद, वावडदा, रवंजा, खडके, मोहाडी, रोटवद, जळके, विटनेर, धोबी वराड, लोणवाडी, मोहाडी, रोटवद, कळमसरा, लोहारा, धानोरा, दापोरा आदी परिसरातील लहानमोठय़ा गावांतून कंपनीच्या बसेसद्वारेच येतात. कंपनीने नियोजन केल्याप्रमाणे सामूहिक वाहतूक योजनेत आम्हाला पूर्णत: यश आले नाही. काही उपाययोजनांना जळगाव शहरातील सहकार्‍यांच्या वैयक्तीक अडचणींमुळे यश प्राप्त झाले नाही. उदा. उन्हाळ्यात उन्हाच्या त्रासामुळे घरापासून बसथांब्यापर्यंत पायी ये-जा करणे मोठे आव्हानात्मक आहे. घरापासून बसथांब्यापर्यंतचे अंतर हे प्रत्येक सहकार्‍यागणीक सुमारे एक ते अडीच किमी असल्याचे पाहणीत आढळून आले. याबाबत सहकार्‍यांशी प्रत्यक्ष चर्चा केली तेव्हा सहकार्‍यांनी आपल्या अडचणी स्पष्ट केल्या. पावसाळ्यातही सहकार्‍यांना बसने यावयाचे झाल्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. वेळेच्या नियोजनानुसार सहकार्‍यांनीच वरील अडचणींमुळे स्वत:च्या वाहनांना प्राधान्य दिले.

एका दुचाकीवर दोघे सहकारी
असे जरी असले तरी सहकार्‍यांनीही आपापल्यापरीने इंधन बचतीसाठी आपापला सहभाग उचलला आहे. कंपनीत आज दुचाकीवर येणारे 60 ते 70 टक्के सहकारी हे शेअरिंग तत्त्वाने कंपनीत येतात. याबाबत सहकार्‍यांमध्ये जागृती असून व्यवस्थापनातर्फे ही आणखी प्रय} केले जातील. पूर्वीपासूनच कंपनीने स्वत:च्या बससेवेबाबतही विचार केलेला होता. तथापि यासाठी लागणारी गुंतवणूक, बसेसची निगा, कंपनीच्या शिफ्टनुसार वेळेचे नियोजन करणे व त्याचे पालन करणे कठीण आहे. एकवेळ आस्थापना व व्यवस्थापन विभागातील सहकार्‍यांच्या कार्यालयीन वेळेत 5-10 मिनिटांचे होणारे अंतर समजण्यासारखे आहे. परंतु प्रत्येक निर्मिती व इतर विभागात वेळेचे पालन हेच वेळेवर उत्पादनाचे सूत्र असते. इतर खर्च लक्षात घेता आजच्या आर्थिक अनिश्चिततेच्या वातावरणात हे धाडसच ठरेल.

सहकार्‍यांनी त्यांच्या वेळेचे केलेले नियोजन लक्षात घेता त्यांना इंधन बचतीबाबत मार्गदर्शन करता येईल. परंतु जबरदस्ती करणे उचित होणार नाही. आजच्या घडीला जैन इरिगेशनमधील एकूण सहकार्‍यांपैकी 2262 सहकारी स्वत:च्या दुचाकीवरून कंपनीत येतात. सार्वजनिक वाहतुकीने कंपनीत प्रवास करणारे सहकारी 2844 आहेत. चारचाकी वाहनांची संख्या जैन हिल्स व प्लास्टिक पार्क लक्षात घेता सुमारे 151 आहे. सहकार्‍यांचे गट चारचाकी वाहनातून ठरवून ठरवून मिळून येतात. सायकलने येणार्‍या सहकार्‍यांची संख्या 500 आहे.

वेळेचे नियोजन, कर्मचारी आणि अधिकार्‍यांची सोय लक्षात घेऊन इंधन बचतीबाबत आणखी काय करता येईल, याचा व्यवस्थापन नक्कीच विचार करते आहे, असेही कंपनीतर्फे कळविण्यात आले आहे.

सहकारी ने-आण करण्यासाठी कंपनीच्या 10 बसेस कार्यरत
पर्यावरण, शाश्वत विकास, सौरऊर्जा, ग्रीन एनर्जी आदी क्षेत्रांमध्ये जैन इरिगेशनने आजवर बजावलेली भूमिका आणि जपलेली बांधिलकी याचे सर्वच साक्षीदार आहेत. जैन इरिगेशनचे जळगावमध्ये विविध ठिकाणी असलेले कार्यक्षेत्र आणि या ठिकाणांवर असलेले मनुष्यबळ लक्षात घेता सामूहिक वाहतुकीच्या दृष्टीने आम्ही यापूर्वीच नियोजन करून वेळोवेळी उपाययोजना केल्या आहेत. सध्या कंपनीचे बांभोरी येथे प्लास्टिक पार्क, टाकरखेडा येथे टिश्युकल्चर पार्क, शिरसोली रोडवर अँग्रीपार्क, फूडपार्क, एनर्जीपार्क या ठिकाणांवर सहकारी ने-आण करण्यासाठी कंपनीच्या 10 बसेस कार्यरत आहेत. शहराच्या आजूबाजूच्या खेडर्य़ातून हे कंपनीतील सहकारी कंपनीत येतात, असे मानव संसाधन विभागाचे प्रमुख पी.एस. नाईक यांनी म्हटले आहे.