आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fund For Subway Near Bhusaval Railway Station Sanctioned

60 हजार नागरिकांना मिळणार दिलासा, रेल्‍वेच्‍या तिसर्‍या बोगद्यासाठी अडीच कोटी मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- दगडी पुलाच्या पलीकडील लोकांना शहरात येण्यासाठी तीन किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. मात्र, आराधना कॉलनी परिसर ते टिंबर मार्केटला जोडणार्‍या रेल्वे बोगद्यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाल्याने, हा त्रास आता वाचणार आहे. निधी मंजूर होताच पालकमंत्री संजय सावकारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि नगरसेवकांसह मंगळवारी प्रस्तावित कामाच्या ठिकाणी पाहणी केली.

शहरातील प्रभाग क्रमांक चार आणि पाचच्या मधून रेल्वे लाइन गेलेली आहे. या मुळे दोन्ही प्रभागातील नागरिकांना इकडून तिकडे जाण्यासाठी तब्बल तीन किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. यावर उपाय म्हणून खाचणे हॉल परिसरातील स्वामी सर्मथ केंद्राजवळ तिसर्‍या रेल्वे बोगद्याची मागणी पुढे आली होती. चार वर्षांपासून या प्रयत्नांना वेग आला होता. मध्यंतरी पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर स्वत: संजय सावकारे यांनी बोगद्यासाठी जोरदार प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि खासदार हरिभाऊ जावळे यांच्यासह राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. बोगदा तयार झाल्यास 60 हजार नागरिकांचा दररोजचा त्रास कमी होईल, असा आग्रह धरला. शहराची गरज लक्षात घेता भुजबळ यांनी अडीच कोटी रुपये खर्चास तत्त्वत: मान्यता दिली होती. आता हा निधी प्राप्त झाला असून नव्या वर्षात काम सुरू होण्याची शक्यता आहे.

असे होतील फायदे

3 बोगदा तयार झाल्यावर प्रभाग पाचमधून जळगाव रोडवर जाण्यासाठी तीन किलोमीटरऐवजी केवळ 300 मीटर अंतर चालावे लागेल.

3 अंतर्गत दळणवळण सोईचे होईल. प्रभाग चारमधील रहिवाशांना अवघ्या पाच मिनिटांत बाजारपेठ गाठता येईल. रहदारीतून वाट तुडवावी लागणार नाही.

3 शाळेत लवकर पोहोचता यावे, म्हणून विद्यार्थी जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडतात. नवीन बोगदा झाल्यास ही कसरत टाळता येईल.

उत्तर भागाला दिलासा

सध्या उत्तर भागातील नागरिकांना दक्षिण भागात येण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. कारण रेल्वे लाइनच्या दक्षिणेकडील भागात बाजारपेठ, दवाखाने आणि शाळा, महाविद्यालये आहेत. परिणामी तीन किलोमीटरचा फेरा घालावा लागतो. खाचणे हॉल परिसरात होणार्‍या तिसर्‍या बोगद्यामुळे हा त्रास वाचणार आहे.

जागा निश्चितीसाठी चर्चा

पालकमंत्री संजय सावकारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक युवराज लोणारी, भाजपचे शहराध्यक्ष रमण भोळे, वसंत पाटील, पुरुषोत्तम नारखेडे, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र नाटकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यू.एम.कुरेशी यांनी मंगळवारी बोगद्याच्या प्रस्तावित जागेवर जाऊन पाहणी केली.