आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँक खाते न उघडल्याने गणवेशाची प्रतीक्षाच, बँकांच्‍या अाडमुठेपणामुळे निधी पडून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - सर्व शिक्षा अभियानात मोफत गणवेश दिले जातात. मात्र, यंदापासून शासनाने गणवेशाची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केली. मात्र निम्मे शैक्षणिक वर्ष संपत आले तरी जिल्ह्यातील ५७ हजार विद्यार्थ्यांचे बँक खातेच उघडलेले नाही, अशी धक्कादायक माहिती हाती अाली अाहे. त्यामुळे हे विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत.

सर्वशिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या सर्व मुली अनुसूचित जाती-जमाती, भटक्या जमाती, इतर मागास प्रवर्गातील मुलांना मोफत गणवेश दिले जातात. आतापर्यंत गणवेशासाठी शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून कापड खरेदी करून गणवेश वितरित करण्यात येत होते. मात्र, शासनाने सरळ लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर गणवेशाची रक्कम वर्ग करण्याचा निर्णय घेतला.

त्यामुळे गणवेशाची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा हाेत आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आई अथवा वडिलांसोबत राष्ट्रीयीकृत बॅँकेत संयुक्त खाते उघडणे बंधनकारक आहे. विद्यार्थ्यांचे झीरो बॅलन्सवर बँकेत खाते उघडण्याचे आदेश सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात आलेले आहेत. मात्र खाते उघडताना बँकांकडून अडवणूक हाेत अाहे. परिणामी अद्याप बहुतांश विद्यार्थ्यांचे बँक खातेच उघडण्यात आलेले नाही. ही संख्या ५७ हजार इतकी आहे. जोपर्यंत विद्यार्थ्यांचे खाते उघडले जात नाही, तोपर्यंत त्यांच्या नावावर गणवेशाची रक्कम जमा होणार नाही. जिल्ह्यातील ५७ हजार विद्यार्थी गणवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर शाळेत यावे लागत आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना गणवेशाच्या अनुदानाची रक्कम मिळाली त्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी गणवेश खरेदी केले. मात्र सर्व विद्यार्थ्यांच्या गणवेशात सुसूत्रता नाही. परिणामी गणवेश असून अडचण आणि नसून खोळंबा अशी अवस्था निर्माण झाली आहे.
 
गणवेशासाठी शासनातर्फे दोन टप्प्यात तीन कोटी ५४ लाख ६०४ रुपये मुख्याध्यापकांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले.विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांकडे गणवेश खरेदी केल्यानंतर पावत्या सादर करणे बंधनकारक आहे. ज्यांनी पावत्या सादर केल्या, त्यांच्याच खात्यावर ४०० रुपये वर्ग करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली.
 
८८ हजार विद्यार्थी
जिल्ह्यात मोफत गणवेश लाभार्थी विद्यार्थ्यांची संख्या ८८ हजार ५१६ इतकी आहे. त्यात १९ सप्टेंबर अखेरपर्यंत २९ हजार १३० विद्यार्थ्यांचे बॅँक खाते उघडण्यात आले आहे. मात्र उर्वरित ५७ हजार ३८६ विद्यार्थ्यांनी अद्यापही बॅँकेत खाते उघडलेले नाही. परिणामी एवढे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...