आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग.स. सभेतून सत्ताधार्‍यांचे पलायन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - ग.स.सोसायटीची सभा रविवारी सुरू होताच संपली. यंदा सभासदांना देण्यात आलेला 2 टक्के लाभांश हा या वेळी कळीचा मुद्दा ठरला. सभासदांचे रौद्र रूप पाहून केवळ चार मिनिटांत सर्व अकरा विषय मंजूर करत सत्ताधारी सहकार गटाच्या संचालकांनी नेत्यांसह व्यासपीठावरून मागच्या दरवाजाने पळ काढला.

जळगाव जिल्हा सरकारी नोकरांच्या सहकारी सोसायटी (ग.स.)तील सत्ताधारी सहकार गटाला मिळालेले हे बोनस वर्ष मानले जात आहे. लवकरच निवडणूक जाहीर होणार असल्याने विरोधकांनी आधीपासूनच दंड थोपटलेले होते. त्यामुळे सभा वादळी ठरणार यात कोणतीही शंका नव्हती. नेमके तसेच झाले. गतवर्षी अंड्यांचा मार खाल्लेले सत्ताधारी यंदा कशाचा सामना करतात, याकडे सगळ्यांचेच लक्ष होते. यंदा आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी लाभांश देण्याचा भावनिक मुद्दा विरोधकांनी उचलला. सकाळी 11 वाजता नूतन मराठा महाविद्यालयातील सभागृहात सभा सुरू होताच सभासदांनी लाभांशाच्या मुद्यावर अध्यक्ष सुनील सूर्यवंशी यांना जाब विचारायला सुरुवात केली आणि गोंधळाला सुरुवात झाली. याबाबतची पूर्वकल्पना असल्याने पोलिस बंदोबस्त मागवण्यात आला होता.

संचालक अजबसिंग पाटील यांनी सूत्रसंचालनास सुरुवात करून अध्यक्षांना प्रास्ताविकासाठी आमंत्रित करताच संचालक एस.टी.पाटील यांनी व्यासपीठ गाठले. आधी सभासदांच्या भावना मांडण्याची मागणी करत त्यांनी माइक घेण्याचा प्रयत्न केला; परंतु अध्यक्ष सूर्यवंशी यांनी माइकवरील ताबा न सोडता गोंधळातच प्रास्ताविक पूर्ण केले. याच मुद्द्यावरून माइकच्या अवतीभोवती प्रचंड गर्दी होऊन धक्काबुक्कीला सुरुवात झाली.

चार मिनिटांत 11 विषय मंजूर
सभासदांनी व्यासपीठावर गर्दी करताच अध्यक्षांनी 1 ते 11 विषय मंजूर असल्याची घोषणा करत चार मिनिटांत सभा आटोपल्याचे जाहीर केले. तसेच या वेळी सभासदांचा संताप लक्षात घेता राष्ट्रगीतही न म्हणता सहकार गटाचे संचालक व मागे खुर्च्यांवर बसलेले गटाचे ज्येष्ठ नेते मागच्या दरवाजाने निसटले.
विरोधकांनी साधला संवाद
सत्ताधारी गेल्यानंतर लोकमान्य गटाचे मगन पाटील, शरद पाटील, वाल्मीक पाटील, लोकशाही गटाचे एस.टी.पाटील व प्रगती गटाच्या नेत्यांनी सभासदांशी संवाद साधला, तर ‘जुटो’ संघटनेचे माजी अध्यक्ष श्याम पाटील, संचालक विलास पाटील, भडगावचे रवींद्र सोनवणे व राज्य स्थापत्य अभियांत्रिकी सहायक संघटनेचे अध्यक्ष एच.एम.चव्हाण यांनी निषेध केला.
काय म्हणतो कायदा?
जनरल सभेत राष्ट्रगीत म्हटलेच पाहिजे, अशी तरतूद सहकार कायद्यात नाही; अजेंड्यावरील प्रत्येक विषयावर चर्चा करून सभासदांचे म्हणणे ऐकणे हा सभासदांचा हक्क असतो. कोणी असे करत नसेल तर तो अधिकारांचा गैरवापर म्हणता येईल. सभासदांनी मत मांडण्यासाठीच सभा होते. याबाबत कोणी न्यायालयात आव्हान देऊन पुराव्यानिशी सिद्ध केल्यास ती सभा रद्द होऊ शकते.
अ‍ॅड.प्रमोद एम पाटील, कायदेतज्ज्ञ
सभेबाबत कोण काय म्हणाले ?
सभेच्या सुरूवातीला काही विरोधकांनी वाद घातला. त्या व्यतिरिक्त सभा शांततेत झाली.
- सुनील सूर्यवंशी, अध्यक्ष, ग.स.

निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही. सभासद हिताचे निर्णय न घेऊ शकल्यामुळे माफी मागतो.
- नवल पाटील, उपाध्यक्ष, ग.स.

सभासदांच्या भावना मांडण्याचा प्रयत्न केला.बोलू दिले नाही. डिव्हीडंड फसवा आहे.
- एस.टी.पाटील, लोकशाही गट

लोकमान्य गटाच्या संचालकांना बसण्याची व्यवस्था नव्हती. कोणालाही बोलू दिले नाही.
- मगन पाटील, लोकमान्य गट

आवाज दाबण्याचा प्रयत्न केला गेला. पळ काढणे व्यासपीठाचा अपमान आहे.
- रवींद्र सोनवणे, प्रगती गट

गोंधळ घालणे म्हणजे न्याय मिळवून देणे, हा अर्थ चुकीचा आहे.
- अजबसिंग पाटील, संचालक, सहकार गट

इतिहासातील सगळ्यात कमी लाभांश आहे. कर्ज न घेतलेल्यावर अन्याय आहे.
- अरुण पाटील, प्राथमिक शिक्षक समिती

उत्तर देणे सत्ताधार्‍यांचे काम होते; परंतु तसे न करता सभा गुंडाळणे व पलायन करणे योग्य नाही.
- किशोर पाटील