आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावचे ‘हवामान’ खराब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा दौरा रद्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी सायंकाळी आपला जळगाव दौरा रद्द केला. दौरा रद्द होण्यामागे जळगावचे ‘हवामान’ खराब असल्याचे कारण सांगण्यात आले. गडकरी वाजता जळगाव विमानतळावर येणार होते. परंतु त्या वेळी आकाशात काळ्या ढगांनी गर्दी केल्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त होत होती. त्यामुळे दौरा रद्द करण्यात आला. मात्र, पावसाच्या शक्यतेसोबतच जळगावातही ‘राजकीय दबावाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे गडकरींनी दौरा टाळणेच पसंत केले असावे.
नऊ महिन्यांपूर्वी एकनाथ खडसे महसूलमंत्री असताना गडकरींच्या दौऱ्यात १८ हजार ५०० कोटींच्या घोषणांचा जोरदार ‘बार ’उडवून देण्यात आला होता. खडसेंच्या राजीनाम्यानंतर जळगाव जिल्ह्यात आयोजित भाजपचे राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर रद्द करण्यात आले होते. खडसे समर्थक उघडपणे नाराजी व्यक्त करण्याचा अंदाज असल्याने हे शिबिर रद्द करण्यात आले होते. शुक्रवारी कांताई सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक संघ साधक मुकूंदराव पळशीकर यांच्या स्मृती ग्रंथाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमास उपस्थित राहण्यासाठी गडकरी यांंचा शुक्रवारी जळगावात मुक्कामी दौरा होता. जिल्हा माहिती कार्यालयाने दोन दिवसांपूर्वीच त्यांच्या दौऱ्याचे वेळापत्रकही पाठवले होते. मात्र, जून महिन्यात खडसे पायउतार झाल्यानंतर गडकरींचा हा पहिलाच दौरा असल्याने नाराज खडसे समर्थक अाणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे समर्थक त्यांची भेट घेणार होते.

गडकरींच्या स्वागतासाठी विमानतळावर जय्यत तयारी आणि मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. झेड प्लस सुरक्षेच्या दृष्टीने उपविभागीय पोलिस अधीक्षक, निरीक्षक, ५० पेक्षा अधिक पोलिस यासह १५ प्रशासकीय वाहनांचा ताफा विमानतळावर तयार होता. गडकरींच्या मानवंदनेची तयारीही पोलिसांनी केली होती. मात्र, सायंकाळी दौरा रद्द झाल्याचा निरोप मिळाला. त्यानंतर ही तब्बल अर्धा तास सर्व यंत्रणा विमानतळावर थांबून होती. दौरा रद्द झाल्याचे निश्चित होताच पोलिसांनी रायफल खांद्यावर टाकून विमानतळावरून काढता पाय घेतला.
बातम्या आणखी आहेत...