आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गज-याच्या सुगंधाने दरवळ ; प्रथा अजून टिकून

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - प्रत्येक महिलेला हव्याहव्याशा वाटणा-या गज-याला बाजारात चांगलीच मागणी वाढलेली आहे. संक्रांतीच्या सणाला महिला व तरुणींमध्ये गजरा लावण्याची क्रेझ आहे. एकवेळ महिलेला नवीन साडी घेऊन दिली नाही तरी चालेल; परंतु संक्रांतीला गजरा आवश्यकच असतो. संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर फुलांची बाजारपेठ गज-यांनी बहरलेली आहे. संक्रांतीला गज-याचे महत्त्व असून, पूर्वीच्या काळी प्रत्येक सणाला आणि घरातील कार्यक्रमांप्रसंगी महिला गजरा लावायच्या; मात्र बदलत्या जीवनशैलीमुळे घरात त्या प्रकारचे छोटे कार्यक्रम आणि सणदेखील साजरे करणे शक्य होत नाही; परंतु संक्रांत हा महिलांचा सण असल्याने अजूनही ती प्रथा कायम आहे.
अबोलीच्या गज-यांना मुकणार!
शहरात अनेक ठिकाणी संक्रांतीला महिला मंडळांतील महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणावर जाणवतो. अनेक जागी हळदी-कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. या कार्यक्रमांमध्ये विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि त्यासोबत गजरा दिला जातो. निशिगंधा, कुंदा, अबोली, शेवंतीच्या फुलांचे गजरे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात; परंतु या वर्षी थंडीचे प्रमाण जास्त असल्याने अबोलीची फुले जास्त उमलली नाही. त्यामुळे आपल्या आवडत्या अबोलीच्या गज-यांना या वेळेला महिला-तरुणींना मुकावे लागणार आहे.
चार दिवसआधीच ऑर्डर
गजरा घेण्यासाठी साधारणत: चार ते पाच दिवसआधी फूलविक्रेत्यांना ऑर्डर द्यावी लागते. एक महिला 15 ते 20 गजरे घेते. त्याचप्रमाणे 40 ते 50 रुपये डझनप्रमाणेही गजरे विकले जातात.
संक्रांतीला गज-यांना जास्त मागणी असते. त्यामुळे मी साधारणत: संक्रांतीच्या 15 दिवसआधीपासूनच तयारीला लागते. कुंदाचे 10 किलो, निशिगंधाचे 20 किलो आणि शेवंतीचे 30 ते 40 किलो फुलांचे गजरे विकते.
शोभा बारी, गजरे विक्रेती