आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हॉट्सअॅप मेसेजमुळे सट्टा बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - गेल्या सहा-आठ महिन्यांपासून जळगाव शहरात गल्लोगल्ली फोफावलेल्या सट्टापेढ्या गुरुवारपासून अचानक बंद पडल्या आहेत. पोलिस दलाच्या वेगवेगळ्या व्हाट्सअॅप ग्रुपवरून फिरलेल्या एका मेसेजमुळे हा चमत्कार झाला असल्याचे बोलले जात आहे.
शहरातील अनेक उच्चभ्रू परिसरांमध्ये सट्टापेढ्या सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी संबंधित पाेलिस ठाण्यांमध्ये केल्या होत्या. मात्र, त्यावर काहीएक हरकत घेतली जात नव्हती. स्थानिक पोलिस नागरिकांच्या या तक्रारीची दखलच घेत नसल्यामुळे मुंबईच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तक्रार केली आहे. त्यांचे पथक जळगावात येऊन सट्टापेढ्यांवर कारवाई करणार आहे. या आशयाचा एक मेसेज मंगळवारी आणि बुधवारी व्हाट्सअॅपच्या काही ग्रुपवर धडकला. पाहता-पाहता हा मेसेज पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलपर्यंतही पोहोचला. बुधवारी रात्रीपासून सट्टापेढ्या अचानकच बंद झाल्या. त्यामुळे दोन दिवसांपासून सामान्यांपासून पोलिसांपर्यंत सट्टाबंदची चर्चा चांगलीच रंगली आहे. प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही प्रमाणात सट्टापेढ्या आहेत.

अनेक सट्टापेढ्यांमध्ये शहरातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते भागीदार आहेत. त्यामुळे विनाधिक्कत सट्टापेढ्या चालवल्या जातात. निर्जनस्थळी, आडोशाला सट्टा घेणारी व्यक्ती आढळून येत होती, तर चांगल्या रहिवासी भागांमध्येही कापडी शेड उभारून पेढ्या सुरू करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपासून सट्टापेढ्या बंद असल्या तरी कापडी शेड मात्र तसेच उभे आहेत. दरम्यान, रहिवासी भागांमध्ये शाळकरी, महाविद्यालयीन मुले, युवती, महिलांचा वावर असतो. अशा भागात सट्टापेढी सुरू झाल्यामुळे सामान्य नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागते. या सर्व प्रकारांमुळे नागरिकांच्या तक्रारीही वाढल्या होत्या.

नागरिकांच्या तक्रारींमुळे कारवाई : पोलिस अधीक्षक
पोलिसअधीक्षक डॉ.जालिंदर सुपेकर यांच्याशी संपर्क साधला असता, नागरिकांच्या तक्रारी असल्यामुळे सक्त कारवाई केल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

सट्टापेढ्यांची ठिकाणे
आंबेडकरमार्केट, दाणाबाजार परिसर, जैनाबाद, वाल्मीकनगराचा भाग, मेहरूण परिसर, एमआयडीसी परिसर, रेल्वेस्थानक परिसर, शिवाजीनगर, हुडको, महात्मा गांधी मार्केट