आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाप्पामुळे रस्त्यांना "अच्छे दिन'!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - पालिकेच्या सभागृहात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शहरातील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची शनिवारी बैठक झाली. त्यात पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, पूर्ण वेळ वीज उपलब्ध व्हावी यासह मंडळांना परवानगीच्या प्रक्रियेसाठी गणेश भक्तांनी महापालिका, वीज कंपनी व पोलिस अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. यासंदर्भात प्रशासनाकडून आश्वासने मिळाली. तसेच गणेशोत्सवाचे पावित्र्य जपून आचारसंहितेचे पालन करून जल्लोषात गणेशोत्सव साजरा करण्याचा ठराव करण्यात आला.
रस्ते, वीज दुरुस्ती हाती घेणार
पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी वाद्यवाजवण्यासह मिरवणुकीच्या वेळेबाबत सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करणे बंधनकारक राहील, यात कुठलीही सूट दिली जाणार नाही, असे सांगितले. मंडळांना बक्षिसे देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून त्यासाठी कार्यकर्त्यांनी नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत बच्छाव यांनी वर्गणी कामी कुणावरही सक्ती करू नये, वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये आदी सूचना केल्या. महापालिका उपायुक्त प्रदीप जगताप यांनी महापालिकेकडून रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यासह ‘एक खिडकी योजना’ रविवारपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले.

सुजीत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी सर्व पोलिस ठाण्याचे निरीक्षक व शहरातील शंभरावर गणपती मंडळाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
प्रशासनाकडून काय ठरले ?
- विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर डांबरीकरण शक्य नसल्याने खडी व कच्चे साहित्य टाकून खड्डे बुजणार
- रविवारपासून परवानगीच्या प्रक्रियेसाठी पोिलस मल्टीपर्पज हाॅलमध्ये एक खिडकी योजना सुरू करणार
- भारनियमन रद्द हाेण्यासाठी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी करणार
- लोंबकळणाऱ्या तारा, तुटलेल्या तारा फांद्या, झुडपे काढून वदि्युत पुरवठ्यातील अडथळे काढणार
- विसर्जन मिरवणुकीत निर्माल्य रथासाठी महापालिकेकडून अधिक ट्रॅक्टर उपलब्ध करून देणार
- विसर्जन ठिकाणावर विटंबनेचा प्रकार टाळण्यासाठी क्रेनचा उपयोग करणार
- धार्मिक एकतेसाठी गणेशोत्सवादरम्यान कव्वालीचा उपक्रम सुरू करणार
- उत्कृष्ट आरास व मिरवणुकीसाठी पोलिसांकडून दिली जाणार बक्षिसे
महामंडळाने मांडलेल्या सूचना
गणेश मंडळांनी क्लोज सर्किट टीव्ही लावावेत
प्रत्येक मंड‌ळाने गणेशोत्सवादरम्यान दोन गण सेवक नेमावे
रात्री चार कार्यकर्त्यांची गस्त कायम ठेवावी
रात्री आठ वाजता महाआरतीची वेळ चुकवू नये
सिनेगीत न वाजवता धार्मिक गीतेच लावावीत
विसर्जन मिरवणुकीत महिलांचा सहभाग वाढवावा.
मंगळवारी सायंकाळी सातला गायत्री मंदिरात होणार बैठक
कार्यकर्त्यांनी मांडलेले मुद्दे
विसर्जन मिरवणुकीतील रस्ते डांबरीकरण करावे
प्रात्यक्षिकांमध्ये अडथळे आणणाऱ्या पोलिसांना अडवावे
क्रॉम्प्टन कंपनीकडून कार्यकर्त्यांची होणारी टोलवा-टोलवी थांबवावी
गणेशोत्सवादरम्यान रात्री भारनियमन थांबवावे.
धार्मिक एकता जोपासणार
क्रॉम्प्टनचे शहर अभियंता मुकेश चौधरी यांनी वीजपुरवठ्याबाबत दुरुस्तीचे काम हाती घेतले असल्याचे सांगितले. महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नारळे यांनी कार्यर्त्यांच्या उत्साहाला प्रशासनाची साथ असणे अपेक्षित असल्याचे सांगितले. मुकुंद मेटकर यांनी शहरातील गणेशोत्सवाचा इतिहास सांगून तो टिकवण्याचे आवाहन केले. अभियंता सचिन पाटील यांनी वीजमीटरची तत्काळ जोडणी देण्यात येईल, असे सांगितले. अमित भाटिया, मोहन तिवारी, जमील देशपांडे, ईश्वर मोरे, अयाज अली यांनी गणेशोत्सवादरम्यान येणाऱ्या विविध समस्या मांडल्या.