आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विघ्नहर्त्याला महागाई निवारणाचे साकडे; शेवंतीच्या फुलांचे दर 300 रुपये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील 277 गणेश मंडळांनी ‘महागाईचे विघ्न टळू दे, सुख शांती नांदू दे’ असे साकडे घालून विघ्नहर्ता गणरायाची सोमवारी विधीवत स्थापना केली. आवक कमी असल्याने सर्वच फुलांचे भाव वधारले होते. शेवंती फुले 300 ते 350 रुपये किलो दराने विक्री झाले. ‘गणपती माझा नाचत आला’, ‘आज माझ्या लंबोधरा सांभाळून न्या रे’ या गीतांच्या चालीवर पारंपारिक वाद्य वाजवून गणरायाची स्थापना केली.

गणेशभक्तांनी सवाद्य गणेशमूर्ती घेऊन जाण्यावर भर दिला. पूजेचे साहित्य खरेदी करण्यासाठी शहरातील दुकानांवर गणेशभक्तांची गर्दी झाली होती. केळीचे खांब 10 रुपयाचे पाच, लहान आकारातील पुष्पहार 20 रुपयांपासून ते 80 रुपयांपर्यंत विक्री झाले. माव्याचे मोदक 70 रुपयाला 125 ग्रॅम, आंब्याच्या मोदकांचे 21 नगांचे पाकिट 45 रुपयांना स्वीटमार्टमधून घेण्यावर मंडळांच्या पदाधिकार्‍यांनी भर दिला. घरगुती गणरायाची स्थापना करणार्‍या भाविकांनी सजावटीसाठी यंदा थर्माकोलचे मखर खरेदीवर भर दिला असल्याचे दिसून आले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर, बाजारपेठ, तालुका पोलिस ठाण्यात वाढीव बंदोबस्त मागवण्यात आला होता. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत 102 तर बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत 175 गणेश मंडळांनी गणरायाची स्थापना केली आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहर व बाजारपेठ पोलिस ठाण्यातील डीबीचे पथक साध्या वेशात गस्त घालणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसह शांतता समितीच्या पदाधिकार्‍यांची सुद्धा पोलिस प्रशासनाने मदत घेतली आहे.

विद्यार्थ्याच्या हस्ते स्थापना
बर्‍हाटे माध्यमिक विद्यालयात संस्थाध्यक्ष परीक्षित बर्‍हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली गणरायाची स्थापना दहावीचा विद्यार्थी गणेश ठाकूर याच्या हस्ते करण्यात आली. प्लास्टिक, थर्माकोलचा वापर न करता पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होत आहे. कविता जावळे, अनिल बोरोले, पी. जे. चौधरी, लता चौधरी, आशा ठोंबरे, जयश्री चौधरी यांनी सहकार्य केले.

डीजेचा आवाज यंदाही शांतच
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गणेशोत्सवात डीजेचा आवाज कमी न ठेवल्यास डीजेचा संच जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. सार्वजनिक विसर्जन मिरवणुकीत तर डीजे वाजवण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. त्या अनुषंगाने डीवायएसपी विवेक पानसरे यांनी शहर, बाजारपेठ, तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या आहेत.

सुवर्णकार समाज मंडळ
नवअहिर सुवर्णकार समाज मंडळातर्फे ‘सुवर्णयोग’ वधू-वर परिचय मेळावा होणार आहे. यासाठी गणेश चतुर्थीला गणेशपूजन करून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. मेळावाप्रमुख सुधाकर सोनवणे, प्रा. सुनील सोनार, दिवाकर हिंगोणेकर, मोहन सोनवणे, आर. पी. सोनार, अशोक सोनवणे उपस्थित होते.

‘जय गणेश’तर्फे सांस्कृतिक मेजवानी
शहरातील जय गणेश फाउंडेशनच्या ‘नवसाचा गणपती’ सार्वजनिक गणेशोत्सवात यंदाही आठवडाभर सांस्कृतिक मेजवानीचा लाभ मिळणार आहे. मंडळाने यंदा 12 ज्योतिर्लिंगापैकी गुजरातमधील सोरटी सोमनाथ मंदिराची लक्ष्यवेधी प्रतिकृती साकारली आहे. यासाठी मंडळाची गेल्या महिन्यापासून जोरदार तयारी सुरू होती.

मंडळाकडून गणेशोत्सवादरम्यान सांस्कृतिक, सामाजिक, कलागुणदर्शन कार्यक्रमांचे आयोजन 9 ते 18 सप्टेंबर या कालावधीत करण्यात आले आहे. गणेशोत्सवात 10 सप्टेंबर रोजी देनानगरातील शिवमाउली भजनी मंडळ भजनसंध्या, 11 रोजी प्रा. सतीश कुलकर्णी यांचा तरुणाई, 12 रोजी प्रा. व. पु. होले यांचे कथाकथन, 13 रोजी प्रा. वा. ना. आंधळे यांचा एक जीवनपट हे कार्यक्रम होणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी 12 वर्षांआतील सोलो डान्स स्पर्धा 14 रोजी होणार आहे. चित्रकला व रांगोळी स्पर्धा 15 रोजी सकाळी 10 वाजता होईल. त्यानंतर त्याच दिवशी रात्री 8 वाजता 12 वर्षांच्यावरील वयोगटातील सोलो डान्स स्पर्धा होईल. खुल्यागटातील ग्रुप डान्स स्पर्धा 16 रोजी रात्री 8.30 वाजता, हसा व हसत राहा विनोदी कार्यक्रम व बक्षीस वितरण 17 रोजी रात्री 8 वाजता होईल. विसर्जन मिरवणूक 18 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. दररोज सकाळी 8 व रात्री 8 वाजता मान्यवरांच्या हस्ते आरती होईल. कार्यक्रम यशस्वितेसाठी पदाधिकारी पर्शिम घेत आहेत.