आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छंदवेड्याने पेन्सिलीच्या सूक्ष्म टोकावर साकारला ‘नॅनो गणेश’

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- पेन्सिलीच्या टोकावर दीड मिलीमीटर आकाराचा गणराय साकारण्याची किमया वरणगावच्या राकेश गोसावी या छंदवेड्याने केली आहे. आपण साकारलेला ‘नॅनो गणेश’ जगातील सर्वात सूक्ष्म गणपती असल्याचा दावा त्याने केला आहे.

कलेच्या प्रांतात रममाण झालेल्या राकेशचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्यानंतर त्याने दोन वर्ष आयटीआयचे शिक्षण घेतले आहे. हे शिक्षण घेत असताना पेन्सिलीशी अतिशय जवळचे नाते निर्माण झाले. आपली ओळख ‘पेन्सिलवाला आदर्श कलाकार’ अशी व्हावी म्हणून पेन्सिलीच्या सूक्ष्म टोकावर दिलखेचक कलाकृती साकारण्याचा ध्यास त्याने घेतला आहे. ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ला कर्नाटकातील संजय दयानंद या कलाकाराने पेन्सिलीवर साकारलेला 2 मिलीमीटर उंच, 1.55 मिलीमीटर रुंद आणि 1 मिलीमीटर जाडीच्या नॅनो गणेशाची नोंद आहे. मात्र, आपण हा रेकॉर्ड मोडला असल्याचा दावा राकेश गोसावीने केला आहे.

भिंगातून अष्टविनायकाचे दर्शन
वरणगावच्या राकेश गोसावीने पेन्सिलीच्या लिडवर नॅनो गणेश साकारला आहे. त्याची उंची दीड मिलीमीटर, रुंदीही दीड मिलीमीटर व जाडी 1 मिलीमीटर आहे. दुसºया पेन्सिलीवर त्याने 2 मिलीमीटर उंच, 2.4 मिलीमीटर रुंद आणि 2 मिलीमीटर जाड आकारात अष्टविनायकाची आकर्षक रुपे साकारली आहेत.

कलाप्रदर्शन भरवणार
पेन्सिलीच्या सूक्ष्म टोकावर साकारलेले नॅनो गणेश, अष्टविनायक, राजहंस, निरागस महिलेचा बोलका चेहरा, इंग्रजी वर्णाक्षरे, दिल या सर्व कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्याचा मनोदयही राकेश गोसावीने बोलून दाखवला आहे. स्त्रीभ्रूणहत्या, व्यसनमुक्ती, निसर्गभ्रमंती या विषयांवर रेखाटलेली व्यंगचित्रे या प्रदर्शनात ठेवण्याचा त्याचा संकल्प आहे.

दिवस-रात्र जागलो
पेन्सिलीच्या टोकावर 2 मिलीमीटर उंचीचा गणराय साकारल्याचा रेकॉर्ड गिनीस बुकात असल्याचे इंटरनेटवर वाचले होते. तो आपण मोडण्याचाप्रयत्न केला. रात्र जागून काढल्यावर त्यात यश आले आहे. भविष्यात गिनीज बुकात नोंद करू.
- राकेश गोसावी, कलाकार, वरणगाव