आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झोपडपट्टीत ‘साईग्रुप’ने केली जलगणेशाची स्थापना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भुसावळ- शहरातील टेक्निकल हायस्कूलमागे तुलसीधननगरात 80 झोपडपट्टी धारकांचा रहिवास आहे. या भागातील तरुणाईने गेल्या सात वर्षांपासून ‘साईग्रुप’ यांच्या माध्यमातून गणेशोत्सवास सुरूवात केली. यंदा मंडळाने पर्यावरण संवर्धनाच्या संदेशासाठी जलगणेशाची स्थापना केली आहे.

मोजक्या जणांकडून ऐच्छिक वर्गणी जमवून झोपडपट्टीतील तरुणांनी उत्सवाचा र्शीगणेशा केला होता. यानंतर गेल्या पाच वर्षांपासून मंडळाच्या सदस्यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची संकल्पना रुजवली. केवळ 8 ते 10 इंचाच्या शाडूमातीच्या मूर्तीची स्थापना केली. यंदाच्या गणेशोत्सवात उपज संस्था, ग्रीन अर्थ फाउंडेशन आणि क्रिएटिव्ह आय ग्रुपच्या माध्यमातून मंडळाने जलगणेशाची स्थापना केली आहे. छोट्या स्टेजवर प्रथमदर्शनी हार्डबोर्डपासून तयार करण्यात आलेल्या गणपतीचे छायाचित्र आणि त्यावर ‘जल ही जीवन है’ असा संदेश देण्यात आला आहे. चारही बाजूंनी जलसंवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा, जलचक्र, रेन वॉटर हार्वेस्टिंग, भविष्यातील पाण्याचे महत्त्व, पाणी वाचवण्याच्या पद्धतींची माहिती चित्र स्वरुपात देण्यात आली आहे.

झोपडपट्टीतील गणेश मंडळाने केलेला हा उपक्रम ‘स्तुत्य’आणि इतर गणेश मंडळांच्या डोळयात अंजन घालणारा आहे. शहरातील रोटरी संस्थेने या मंडळाची दखल घेऊन गेल्या वर्षी पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरवले होते. साईग्रुपच्या मंडळाला शहर पोलिस ठाणे आणि अनेक संस्थांची पारितोषिके मिळाली आहेत.

पर्यावरणपूरक उत्सव
सलग पाच वर्षे पर्यावरणपूरक उत्सवातून साईग्रुप मंडळाने आदर्श निर्माण केला आहे. एका झोपडपट्टीतील मंडळाचे हे काम महान म्हणावे लागेल. इतरांनी यापासून आदर्श घ्यावा.

-सुरेंद्र चौधरी, सचिव, उपज संस्था, भुसावळ

जनप्रबोधनाचा मुख्य हेतू
पर्यावरणाविषयी जनप्रबोधन करण्याचा उदात्त हेतू आहे. यासाठी यंदा जलगणेशाची स्थापना केली. भविष्यात शहरात रेन वॉटर हार्वेस्टिंगची नितांत गरज भासेल. वॉटर हार्वेस्टिंगचे मॉडेल आरास म्हणून ठेवले आहे.
-भरत पाटील, अध्यक्ष, साईग्रुप मंडळ, भुसावळ

उपज संस्थेने केली मोलाची मदत
साईग्रुप गणेश मंडळाने पाच वर्षांपूर्वी उपज संस्थेची मदत घेऊन पर्यावरणीय संदेश देण्याचा उपक्रम राबवला. उपजचे सचिव सुरेंद्र चौधरी यांनी मंडळाचे अध्यक्ष भरत पाटील यांना मार्गदर्शन केले. छोटी शाडू मातीची गणेश मूर्ती स्थापन केली जाते. मात्र, या माध्यमातून दिला जाणारा पर्यावरणीय संदेश मोठा आहे.