आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

१८ तास चालली विसर्जन मिरवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: मेहरूण तलावावर मोठ्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी महापालिकेतर्फे क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.
जळगाव - ‘गणपतीबाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात रविवारी बाप्पाला जल्लोषात निरोप देण्यात आला. ढोल-ताशांच्या निनादाने संपूर्ण जळगाव शहर दणाणले होते. अतिवृष्टीमुळे गेल्यावर्षी काही अंशी घटलेली गर्दी प्रचंड होती. रस्त्यावर पाय ठेवायला सुद्धा जागा नव्हती. दुपारी १२.०५ वाजता महापालिकेच्या मानाच्या गणपतीचे पूजन झाल्यानंतर सुरू झालेली विसर्जन मिरवणूक तब्बल १८ तास चालली. मेहरूण तलावात रात्री ९.२० वाजता पहिल्या वेळी मानाच्या गणपतीचे तर सोमवारी सकाळी ६.१५ वाजता शेवटच्या पोलन पेठेतील गणेश मंडळातर्फे विसर्जन झाले. सुमारे ५२७ सार्वजनिक गणेश मंडळांचे तलावात विसर्जन करण्यात आले. दरम्यान, नियम मोडणाऱ्या तीन मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

आठवडाभरापूर्वी घराघरात दाखल झालेल्या गणरायाने सर्वत्र सकारात्मकतेची ऊर्जा निर्माण झाली होती. १० दिवस विविध उपक्रम कार्यक्रमांनी समाजातील वेगवेगळ्या घटकांना जोडणाऱ्या गणेशोत्सवाची तेवढ्याच मंगलमय भावनिक वातावरणात सांगता झाली. रविवारी सकाळपासूनच घराघरातील गणरायाचे आपापल्या सोयीने विसर्जन सुरू झाले होते. अनेकांनी रात्री उशिरापर्यंत विसर्जनास जाणे पसंत केले. शहरातील प्रमुख ४८ मंडळांनी सकाळपासून जी.एस.ग्राउंडवर नंबर लावण्यास सुरुवात केली होती. मानाचा गणपतीची दुपारी १२.०५ वाजता पूजा झाल्यानंतर खऱ्या अर्थाने शहरातील मिरवणुकीला प्रारंभ झाला. यंदाही गुलाल विरहित मिरवणुकीचा पायंडा टिकवून ठेवण्यात आला.

सामाजिक संस्था, राजकीय पक्ष पोलिस प्रशासनाच्या वतीने ठिकठिकाणी व्यासपीठ उभारून मंडळांचे स्वागत करत त्यांच्या उत्साहात आणखी भर घातली. नियम मोडणाऱ्या तीन मंडळांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी दिली.

सेवेच्या नावाखाली मेव्याच्या अपेक्षा
मनपातर्फेविसर्जनासाठी तलावावर तराफ्यांची व्यवस्था केली होती. येथील स्वयंसेवक विसर्जनासाठी गणपती घेताना प्रत्येकाकडून स्वच्छेने जे काही द्यायचे ते द्या, अशी मागणी करत होते. लहान मूर्तीसाठी १० रूपये तर मोठ्या मूर्तीं करिता १०१ रुपयांची मागणी या ठिकाणी करण्यात येत होती.

पोलिसांमुळेच झाला मिरवणुकीस विलंब
मागीलवर्षापेक्षा यंदा तीन तास उशीर झाला. याला पोलिसांचा ढिसाळपणाच जबाबदार आहे. मिरवणुकीत सहभागी झालेल्या दोन मंडळांतील अंतर किमान दीडशे ते दोनशे फूट होते. हे अंतर पोलिसांना मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना हाताशी घेऊन कमी करता आले असते. यापूर्वी अनेकदा असे प्रयोग झाले आहेत.

उंच मूर्तींची अडचण
शहरातयंदा १५ ते २० फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्ती होत्या. मिरवणुकीदरम्यान उत्साह आनंदाचे वातावरण असताना मात्र पहाटे मेहरूण तलावाच्या काठावर पोहोचल्यावर मूर्ती विसर्जनाला प्रशासन कार्यकर्त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. क्रेनच्या सहाय्याने मूर्ती उचलावी लागत असताना मात्र बऱ्याच मूर्ती उचलताना क्रेनची ताकदही कमी पडत होती.