आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रस्त्यातील गॅरेजेस ठरताय धोकेदायक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - शहरातील रस्त्यांवर वाढणाऱ्या हॉकर्सची समस्या सोडवणे कठीण झालेले असताना आता अनधिकृतपणे वाढणाऱ्या गॅरेजेसनी रस्त्यांना विळखा घातला आहे. ऐन वर्दळीच्या रस्त्यांवर या गॅरेजेस वाढल्या आहेत. या ठिकाणी कारागीर रस्त्यावरच वाहनांची दुरुस्ती करतात. परिणामी वाहतूक खोळंबते. त्याचबरोबर नेहमी अपघाताला निमंत्रण मिळते. रस्त्यावरील पुढील उभ्या वाहनाला ठोकण्याच्या कारणावरून दररोज वाद होतात. शहरात येण्यासाठी जाण्यासाठी मोजकेच रस्ते आहेत. त्याच रस्त्यांना या अतिक्रमित गॅरेजेसचा विळखा पडताना दिसतो. ‘दिव्य मराठी’च्या चमूने केलेल्या पाहणीतून ही बाब समोर आली.

शहरातील अत्यंत वर्दळीच्या असलेल्या जुन्या आग्रा रोडसह ऐंशी फुटी रोड, बारापत्थर, साक्री रोड या परिसरात वाहन दुरुस्तीसाठी गॅरेज, भंगार विक्रेते, फेरीवाल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. शहरात मुख्य पोस्ट ऑफिसपासून गॅरेजेस टाकण्यात आलेली आहेत. तहसील कार्यालयाजवळच्या परिसरात गॅरेजेसची संख्या अधिक आहे. त्यातच या परिसरात खासगी वाहनेही रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेली असतात. रस्त्याशेजारी दुरुस्तीचे काम होत असल्यामुळे वाहनधारकांना वाहन कुठे लावावी हा प्रश्न सतावत असतो. पुढे बारापत्थर चौकात तर गॅरेजसह खासगी वाहनतळ आकारास आलेले आहे. परिणामी नेहमीच या ठिकाणी वर्दळ असते. हीच स्थितीत ऐंशी फुटी रस्ता, चाळीसगाव रोड, मालेगाव रोड परिसरातही आहे. आता तर नेहरू चौकापासून पंचायत समितीपर्यंतच्या परिसरात तसेच सुभाष पुतळयापासून पारोळा रोड चौफुलीपर्यंत गॅरेजेसची संख्या वाढीस लागत आहेत. विशेष बाब म्हणजे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असलेल्या या गॅरेजेसकडे पोलिस प्रशासनासह महापालिका प्रशासनानेही दुर्लक्ष केलेले आहे. याचा त्रास मात्र सामान्यांना होत आहे.
आरोग्याला धोका
वाहनांची दुरुस्ती अन्य कामासाठी दररोज नागरिक दाखल होत असतात. त्यामुळे परिसरात प्लास्टिक पिशव्या, स्पेअर्स पार्टचे रिकामे खोके, कागद, पुठ्ठे, निकामी पार्टस‌्चा कचरा रस्त्यावर टाकण्यात येतो. काही दुकानदारांकडून रस्त्याच्या कडेला हा कचरा जाळला जात असल्याने नागरिक, वाहनधारकांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे प्रदूषणात भर पडते. तसेच परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असतो.
महामार्गावरील सर्व्हिसरोड नावालाच
शहराबाहेरून साधारण १५ ते १६ किलोमीटरचा रस्ता गेला आहे. त्यालगत सर्व्हिस रोड स्थानिक वाहनधारकांसाठी आहे. मात्र, महामार्गालगत असलेल्या व्यावसायिकांनी चक्क सर्व्हिस रोडवरच आपली दुकाने थाटलेली आहेत. ट्रक, लहान चारचाकी वाहनांच्या दुरुस्तीसह काच फिटिंग, वेल्डिंगसह वाहनांशी निगडित व्यवसायाचे केंद्र सर्व्हिस रोडवर आहे. परिणामी सर्व्हिस रोड शिल्लकच नाही. अभय महाविद्यालयापासून सरळ हॉटेल रेसिडेन्सी पार्कपर्यंत ही स्थिती कायम आहे.
बोळींमध्ये अॅक्सेसरीजची दुकाने
शहरातील गल्ली नंबर चार ते आग्रा रोडदरम्यान अॅक्सेसरीजची दुकाने आहेत. आधीच लहान अडचणीच्या असलेल्या या बोळीत अॅक्सेसरीजच्या दुकानामुळे सामान्य वाहनधारकांना अडचणी येतात. परिणामी वाहन लावण्यावरून किंवा काढण्यावरून दररोज लहानमोठे वाद होत असतात. त्यासाठी पार्किंगची योग्यरीत्या व्यवस्था व्हायला हवी.
विद्रूपीकरणाला मिळते चालना
शहराची वाटचाल स्मार्ट सिटीकडे होत असताना शहरात प्रवेश करण्यासाठी असलेल्या प्रमुख रस्त्यांवर दोन्ही बाजूला भंगार वाहनांची गर्दी झालेली दिसते. त्यात चाळीसगाव रोड परिसरात रस्त्याच्याच कडेला ही भंगार वाहने लावण्यात येत असल्यामुळे अनेकदा वाहतुकीचा खोळंबा होतो.
विशेष मोहीम गरजेची
शहरातील रहदारीचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत चालला आहे. त्याचा विचार करता शहरात सुसंस्कृतपणा यावा यासाठी गॅरेजच्या नावाखाली रस्ता गिळंकृत करणाऱ्यांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवण्याची गरज आहे. त्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाने संयुक्त मोहीम आयोजित करण्याची गरज नागरिकांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली आहे.
... तर होऊ शकते कारवाई
रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कलम २८३ कलम २८८ नुसार दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच वारंवार एकाच प्रकारचा गुन्हा करणाऱ्यास शिक्षेची तरतूद आहे.
शहरातील महत्त्वाच्या बारापत्थर परिसरात रस्त्यावर थाटलेल्या गॅरेजेसमुळे वाहतूकही अडते. रस्त्यातच वाहने दुरुस्ती केली जातात. या वाहनांचा नेहमी अडसर असतो. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होते.
कारवाई करणार
शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध गेल्या दोन महिन्यांत अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच वाहतूक पोलिसांकडून हॉकर्सप्रमाणे इतर व्यावसायिकांवर सातत्याने कारवाई सुरूच असते. महामार्गावरील गॅरेज आपल्या कार्यकक्षेत येत नाही. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून इतरही उपाय योजना करण्यात येत आहेत. सुधाकर देवरे, पोलिस निरीक्षक,वाहतूक शाखा