आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचर्‍याची प्रक्रियाविनाच विल्हेवाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - दररोज निघणार्‍या कचर्‍यावर प्रक्रिया न करताच खदानीत टाकून दिला जात असल्याची स्थिती आहे. कुजणार्‍या कचर्‍यामुळे दुर्गंधी होऊ नये म्हणून त्याला आग लावून देण्यात येत असल्याची स्थिती आहे. ‘दिव्य मराठी’च्या पथकाने केलेल्या पाहणीत प्रकल्प बंद आढळून आला. रात्रीच्या वेळी प्रकल्प सुरू करत असल्याचा दावा मक्तेदाराच्या यंत्रणेने केला आहे.

महापालिकेतर्फे राज्य शासनाच्या नियमांचे पालन करत ‘बांधा वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावर सन 2010 मध्ये निमखेडी शिवारात घनकचरा प्रकल्प उभारला होता. हंजीर बायोटेक एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड, जळगाव या एजन्सीच्या माध्यमातून हा प्रकल्प साकारला गेला आहे. शहरातून दररोज 100 ते 125 टन कचरा बाहेर पडतो.

एवढय़ा मोठय़ा प्रमाणात बाहेर निघणार्‍या कचर्‍याला फेकून देणे शक्य नसल्याने त्यावर प्रक्रिया करून खत निर्मिती केली जात होती. जून-जुलै महिन्यापासून या प्रकल्पात कचर्‍यावर प्रक्रिया करणे बंद होते. सप्टेंबर महिन्यात प्रशासनातर्फे फौजदारी कारवाईच्या हालचाली सुरू केल्या होत्या. यानंतर मक्तेदारातर्फे थकित वीज बिल भरून काही प्रमाणात प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मक्तेदाराला 200 टन खतांची ऑर्डर आल्याने ऑक्टोबरमध्ये काही दिवस प्रकल्प सुरू होता. सद्या शहरातून 100 ते 125 टन कचरा याठिकाणी येत असला तरी त्यावर प्रक्रिया होत नसून हा कचरा लगतच्या खदानीत डंपिंग केला जात आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने कचरा पेटवून देण्यात येत आहे.

बुलडोझर, जेसीबीचा मक्तेदाराच्या सेवेत
घनकचरा प्रकल्पाच्या आवारात चार-पाच महिन्यात प्रक्रियेविना प्रचंड कचरा साचला आहे. नगरसेवकांनी मागणी केल्यावर जेसीबी दिले जात नाही. मात्र खत प्रकल्पाच्या मक्तेदारास वाहने पुरविण्यासंदर्भात करारात कोणतीही अट नसताना त्यांना पालिकेचे जेसीबी आणि बुलडोझरचालक इंधनासह पुरवण्यात आले आहेत. कागदोपत्री कोणतीही मागणी न करताच पालिकेतील एका अधिकार्‍यांने मक्तेदाराच्या सोयीसाठी दोन्ही वाहने पुरवली आहेत.

आता कारवाईची वेळ
घनकचर्‍यावर प्रक्रिया करणारा पालिकेचा प्रकल्प तीन महिन्यांपासून बंद आहे. प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात संबंधित मक्तेदारास वारंवार नोटीस बजावून झाली आहे. प्रकल्प सुरू करण्याची चिन्हे नसल्याने आता फौजदारी कारवाईची वेळ आली आहे. विकास पाटील, आरोग्य अधिकारी

आरोग्य अधिकार्‍यास माहित आहे
आमच्याकडे येत असलेल्या कचर्‍यावर दिवसा नव्हे तर रात्री प्रक्रिया करण्यात येत आहे. दिवसा भारनियमनची समस्या असते. या संदर्भात पालिकेचे आरोग्य अधिकारी विकास पाटील यांना सर्व माहिती आहे. त्यांच्याशिवाय इतर कुणालाही आम्ही प्रकल्पात येऊ देत नाही. जुनेद पंजे, व्यवस्थापक, घनकचरा प्रकल्प

कचर्‍यातून खतनिर्मिती सहा महिन्यापासून बंदच
शहरातून दररोज गोळा होणार्‍या कचर्‍यावर या प्रकल्पात वर्गीकरण करण्यात येत होते. माती व अविघटक पदार्थ बाजूला काढण्यात येऊन उरलेल्या कचर्‍यातून यापासून खतनिर्मिती करण्यात येत होती. मात्र, पाच ते सहा महिन्यांपासून कचर्‍यावरील प्रक्रिया बंद पडली आहे.