आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gardion Minister Sanjay Sawakare Comment On Santosh Chaudhary At Bhusawal

‘एनओसी’ त्यांच्या बापालाही द्यावी लागेल; पालकमंत्री सावकारेंनी हाणला टोला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भुसावळ- पालिकेत विकासकामांसाठी कोण किती टक्केवारी घेतो, हे जनतेला कळून चुकले आहे. रस्त्यांचा निधी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग केल्याने आता काही लोकांनी खुट्या घालण्याचे उद्योग सुरू केले आहेत. मात्र, रस्त्यांच्या कामासाठी ‘एनओसी’ त्यांच्या बापालाही द्यावी लागेल, असा टोला पालकमंत्री संजय सावकारे यांनी नामोल्लेख टाळून नगराध्यक्ष उमेश नेमाडे व माजी आमदार संतोष चौधरी यांना हाणला आहे.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष युवराज लोणारी यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवारी येथील लोणारी समाज मंगल कार्यालयात गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात पालकमंत्री बोलत होते. ते म्हणाले की, पालिकेची कामे घेणार्‍या ठेकेदारांच्या रोलरवर ‘नो चिंता’ असे लिहिलेले असते. त्यामुळे ते बिनधास्त, तर जनता चिंताग्रस्त अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. वाईट प्रवृत्तींचा बिमोड करण्यासाठी पदाधिकार्‍यांनी चांगली कामे करून उत्तर द्यावे. दोन वर्षांचा कालावधी लोटला गेला तरी अजूनही बहाद्दराकडून ‘प्लॅनिंग सुरू आहे, तांत्रिक अडचणी आहेत.’ अशीच उत्तरे एकायला मिळतात. घरी बसण्याची वेळ येईल तेव्हा हे प्लॅनिंग पूर्ण करतील की काय? अशी खोपरखळीही पालकमंत्र्यांनी नगराध्यक्षांना मारली. आम्ही ज्यांना मित्र समजायचो तीच मंडळी आम्हाला जर गुलाम समजत असतील, तर त्यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल. मित्रत्वाची परिभाषा जर त्यांना कळली असती तर त्यांनी अशी भाषा वापरली नसती.
सत्ताधार्‍यांसह विरोधी पक्षांच्या सर्वच नगरसेवकांनी सह्या दक्ष राहून केल्या पाहिजे. म्हणजे भविष्यात अडचण येणार नाही, असा सल्लाही सावकारेंनी दिला.
पालकमंत्र्यांची फटकेबाजी
>रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागच दर्जेदारपणे करू शकते. म्हणूनच आपण मंजूर केलेला निधी या विभागाकडे वर्ग केला आहे. राजकारणात चांगल्या लोकांनी यावे.
>सामान्य माणूस पेटून उठला तर चांगल्या चांगल्यांची दाणादाण उडते. ज्यांनी आमच्या सोबत चड्डय़ा घातल्या, त्यांनी आम्हाला शिकवू नये. जनता आता दुधखुळी राहिलेली नाही.
>आमच्याकडे अनेक गुपितांचे भांडार दडलेले आहे. अजून ते उघडे करण्याची वेळ आली नाही. गुपित उघडले तर काय होते ते बघाच.
सर्वपक्षीय उपस्थिती
शहरातील रस्त्यांचा प्रश्न पेटलेला असताना छत्रपती ग्रुपने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला कोण-कोण उपस्थिती देतो? याकडे लक्ष लागून होते. व्यासपीठावर माजी आमदार नीळकंठ फालक, चंद्रशेखर अत्तरदे, नगरसेवक राजेंद्र आवटे, उदयसिंग काके, नंदा निकम, हाजी मुन्ना तेली, किरण कोलते, भाजपचे शहराध्यक्ष रमण भोळे, निर्मल कोठारी, ज्ञानेश्वर आमले, अनुप खोब्रागडे यांच्यासह शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी कॉँग्रेस अशा विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.