आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेपर्वाईची हद्द: सिलिंडर पेटल्याच्या घटनेची चौकशी थंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- शालेय पोषण आहाराची खिचडी तयार करीत असताना मंगळवारी दुपारी 1.30 वाजेच्या सुमारास गिरिजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर बालमोहन मराठी शाळेत सिलिंडरने पेट घेतला. या घटनेमागे शाळेची बेपर्वाई समोर आली आहे. तथापि, या गंभीर घटनेला 24 तास उलटून गेल्यानंतरही जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे कोणत्याही प्रकारची चौकशी न करता दोषींला पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचे प्रथमदर्शनी दिसते.
मंगळवारी घटना घडल्यापासून जिल्हा परिषदेच्या तीन अधिकार्‍यांनी यासंदर्भात चौकशीचे काम सुरू असल्याचे सांगितले; परंतु प्रत्यक्षात बुधवारी चौकशीच झाली नाही. या गंभीर घटनेची प्राथमिक चौकशी होऊन वस्तुस्थिती समजून घेण्याचा ‘दिव्य मराठी’ने अधिकार्‍यांशी संपर्क साधून प्रयत्न केला. मात्र, ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ हा अनुभव आला. विद्यार्थ्यांच्या जिवावर बेतलेल्या या घटनेबाबत शाळा आणि जिल्हा परिषद प्रशासनाने टोलवा-टोलवी केली. मंगळवारी शाळा प्रशासनाने अग्निशमन दलात खोटी माहिती नोंदवली. अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनीही चौकशी न करताच मुख्याध्यापिका वनमाला जैन यांच्या सांगण्यावरून नुकसान झाल्याच्या आकड्याची खाडाखोड केल्याचा प्रकार समोर आला होता. माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर हा प्रकार सुरु होता.

अधिकार्‍यांना थेट प्रश्न : तेजराव गाडेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी
प्रश्न : बालमोहन शाळेत सिलिंडर पेटले होते, या प्रकरणाची चौकशी झाली का? उत्तर : होय, घटना माहीत पडताच प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले.
प्रश्न : चौकशीत काय आढळून आले? उत्तर : गटशिक्षणाधिकारी मनीष पवार यांना शाळेत पाठवले होते, ते चौकशी करून सायंकाळी अहवाल देणार आहेत. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला.
या गंभीर आणि संवेदनशीलप्रकरणी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी तेजराव गाडेकर, गट शिक्षणाधिकारी मनीष पवार आणि शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगर यांनी दिलेली उत्तरे थक्ककरणारी आहेत.

सचिन मगर, शालेय पोषण आहार अधीक्षक
प्रश्न : मगरसाहेब, बालमोहन शाळेतील सिलिंडर पेटल्याच्या प्रकरणाचा चौकशी अहवाल तयार झाला का? उत्तर : नाही
प्रश्न : तुम्ही शाळेत जाऊन चौकशी केली आहे. आता 10 मिनिटांत तुम्ही अहवाल सादर करणार आहात अशी माहिती मिळाली, म्हणून विचारलं; काय झालंय? उत्तर : अहो, चौकशी करण्याची माहिती मला काल सायंकाळी उशिरा मिळाली.
प्रश्न : मग आज केली का चौकशी? उत्तर : नाही. मी काल (मंगळवारी) 6.00 वाजता शाळेत गेलो. तेव्हा अंधार पडला होता काहीच स्पष्ट दिसले नाही. केवळ दरवाजा जळाल्याचे दिसत होते.
प्रश्न : मग आता काय? उत्तर : आज मी काही शाळेत गेलेलो नाही. मात्र, उद्या मी सकाळीच साहेबांकडे अहवाल सादर करणार आहे. तुम्हाला पण उद्याच अहवाल देतो. आता मी घरी आलोय, बाहेर जाण्याची तयारी आहे.

मनीष पवार, गटशिक्षणाधिकारी
प्रश्न : बालमोहन शाळेतील प्रकरणाची चौकशी झाली का? उत्तर : हो, माहिती मिळताच तत्काळ शालेय पोषण आहार अधीक्षक सचिन मगर यांना पाठवले होते. त्यांनी दुपारीच शाळेला भेट देऊन चौकशी केली.
प्रश्न : चौकशीत काय समोर आले? उत्तर : आज (बुधवारी) सायंकाळी 6.00 वाजता ते (मगर) माझ्याकडे चौकशीचा अहवाल सादर करणार आहेत. या शिवाय आम्ही काळजी घेण्यासाठी सर्व शाळांना एक परिपत्रक पाठवत आहोत.
प्रश्न : अहवालासंदर्भात आपण, मगर यांच्याशी काही बोलला आहात काय? उत्तर : 10 मिनिटांत ते माझ्याकडे अहवाल आणणार आहेत; त्यानंतरच काय ते सांगता येईल, आताच फोनवरून बोलणे झाले आहे.
प्रश्न : आम्हाला चौकशी अहवालाची कॉपी मिळेल काय? उत्तर : हो, देतो ना. तुम्ही मगर यांना फोन करा आणि कॉपी मागून घ्या.