आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिचडी शिजवताना पेटले सिलिंडर, बालमोहन शाळेतील प्रकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव- गिरिजाबाई नथ्थूशेठ चांदसरकर बालमोहन मराठी शाळेत मंगळवारी दुपारी 1.30 वाजता शालेय पोषण आहाराची खिचडी तयार करताना सिलिंडरने अचानक पेट घेतला. त्यात पोषण आहाराच्या वस्तू जळून खाक झाल्या. सुदैवाने या वेळी कुणीही जखमी झाले नाही; मात्र या घटनेमुळे शाळा प्रशासनाची बेपर्वाई उघड झाली.
बालमोहन शाळेत मंगळवारी दुपारी मक्तेदार खिचडी तयार करीत होता. या वेळी सिलिंडरची जोडणी चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे सिलिंडरने अचानक पेट घेतला. त्यामुळे 8 बाय 10 आकारातील स्वयंपाकगृहात ठेवण्यात आलेला सहा पोती (50 किलो प्रतिपोते) तांदूळ, डाळ, वाटाणे, मसाले, मिरची आदी वस्तू जळून खाक झाल्या. या वेळी शिक्षक व शिपाई यांनी काही वस्तू बाहेर काढल्याने बचावल्या. तसेच अग्निशामक दलाच्या मदतीने तत्काळ आग विझवण्यात आल्यामुळे अनर्थ टळला. घटनेवेळी इयत्ता पाचवी ते सातवीचे 250 व आठवी ते दहावीचे 166 विद्यार्थी शाळेत होते.
विद्यार्थी घाबरले : आगीमुळे विद्यार्थी प्रचंड घाबरले होते. तसेच अनेकांनी रडायला सुरुवात केली होती. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून मोकळय़ा मैदानावर एकत्र केले.
आग विझल्यानंतर खरी कसरत
आग विझल्यानंतर अग्निशामक दलाच्या पथकाला आगीच्या नुकसानीची नोंद करायची होती, तर मुख्याध्यापिका जैन यांना नुकसान झालेच नसल्याचे दाखवायचे होते.
अग्निशामक पथकाच्या कर्मचार्‍याने 7 हजार रुपयांच्या नुकसानीची नोंद केली. त्यानंतर जैन यांनी त्यावर खाडाखोड करीत केवळ 2 हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आकडा टाकला. एकंदरीत, अनेक चुका केल्यानंतर माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर कोणतेही भान न ठेवता अग्निशामक आणि शाळा प्रशासनाच्या कर्मचार्‍यांनी खात्री न करता खोट्या माहितीची नोंद केली व घडलेली घटना किरकोळ असल्याचे स्वत:च ठरवले.
या घटनेत किरकोळ नुकसान झाले असून, शाळेत असलेल्या फायर एक्स्टिंग्युशरने आग विझवली आहे. तसेच विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. -वनमाला जैन, मुख्याध्यापिका
आगीच्या घटनेबाबतची टिपणी माझ्यापर्यंत प्राप्त झाली आहे. आगीच्या नोंदीत काही खाडाखोड झाली असल्यास याप्रकरणी संबंधित कर्मचार्‍याकडून माहिती घेण्यात येईल. काही आक्षेपार्हबाबी निदर्शनास आल्यास चौकशी करण्यात येईल.
-वसंत कोळी, प्रभारी अग्निशमन अधिकारी

शाळेने बचत गटांना मक्ता दिला नसेल, तर याबाबत चौकशी करून कारवाई करण्यात येईल. कारण शासन नियमानुसार महिला बचत गटांना पोषण आहार तयार करण्याचा मक्ता द्यावा लागतो.
-तेजराव गाडेकर, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
शाळा प्रशासनाची बेपर्वाई अशी...
>शासन नियमानुसार खिचडी तयार करण्याचा मक्ता महिला बचतगट किंवा विधवा, परित्यक्तांना दिला जातो; मात्र संबंधित शाळेने खासगी पुरुष मक्तेदाराला ठेका दिला आहे.
>शाळेत असलेल्या फायर एक्स्टिंग्युशरची 28 डिसेंबर 2012 रोजी अखेरची टेस्ट घेतली गेली आहे. त्यानंतर त्याची निगा राखल्याची नोंद नाही.
>मक्तेदार घरगुती वापराच्या सिलिंडरवर खिचडी तयार करण्याचे काम करीत असतानाही त्याला रोखले का नाही? या प्रश्नावर मुख्याध्यापिका निरुत्तर झाल्या.
>घटनेनंतर स्वयंपाकी पळून गेल्याचा कांगावा केला. माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटू दिले नाही.