आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस गळतीने महिलेचा मृत्यू ; चार दिवस दिलेली मृत्यूशी झुंज अखेर अपयशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - स्वयंपाक करताना गॅस सिलिंडर संपले म्हणून नवीन सिलिंडरला रेग्युलेटरची जोडणी करण्यासाठी हंडीची कॅप उघडली असता त्यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. या वेळी देवघरात सुरू असलेल्या दिव्यामुळे गॅसने क्षणात पेट घेत आगीचा भडका उडाला. यात अयोध्यानगरातील 34 वर्षीय मंगलाबाई रुले, तिचा मुलगा आणि भाऊ भाजले गेले. चार दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असताना मंगलाबाईची मंगळवारी सकाळी 7.30 वाजता प्राणज्योत मालवली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
अयोध्यानगर येथे भाड्याच्या घरात मंगलाबाई व भागवत रुले हे आपल्या शुभम व प्रथमेश या दोन मुलांसह राहतात. शुभम सातवी तर प्रथमेश नववीच्या वर्गात सिद्धिविनायक शाळेत शिक्षण घेत आहे. शुक्रवारी (26 जुलै) मंगलाबाई सायंकाळी 7.30 वाजता स्वयंपाक करत असताना सिलिंडर संपले म्हणून त्यांनी लागलीच नवीन सिलिंडर लावण्यासाठी घेतले. या वेळी त्यांच्याशेजारी लहानगा शुभम उभा होता. तर पुढच्या खोलीत त्यांचा भाऊ ज्ञानेश्वर सुतार हा बसलेला होता. रेग्युलेटर बसवण्यासाठी सिलिंडरची कॅप काढताच कारंजाप्रमाणे गॅस हवेत पसरू लागला. हे पाहून शुभमने हिमतीने सिलिंडरला कॅप लावून गळती बंद केली. पण घरभर गॅस पसरला होता. त्याच वेळी देवघरात पेटत असलेल्या दिव्याच्या ज्योतीमुळे गॅसने पेट घेत आगीचा भडका झाला. यात मंगलाबाई, शुभम आणि ज्ञानेश्वर हे तिघे जखमी झाले.


बापाने ठेवला छातीवर दगड
घरात सिलिंडरचा भडका झाल्याने पत्नी, मुलगा जखमी झाला, असा फोन येताच भागवत रुले यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. या वेळी पत्नी, मुलगा यांना जखमी अवस्थेत पाहून त्यांना मोठा धक्का बसला. पण पत्नी, मुलगा दोघेही बोलत असल्याने ते लवकरच बरे होतील, अशी त्यांना आशा होती. तीन दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही होत होती, असे असतानाच अचानक मंगळवारी पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या शेजारील कॉटवर मुलगा उपचार घेत आहे. त्याला हा धक्का पोहोचू नये म्हणून त्यांनी त्याला न सांगताच त्याच्या आईचा मृतदेह घरी नेला. दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार उरकून पुन्हा ते छातीवर दगड ठेऊन उपचार घेत असलेल्या मुलाजवळ बसून होते.


ते सिलिंडर
कुठेच नेऊ नका
या घटनेत शुभमचे दोन्ही हात, पाय भाजले गेले. तर मंगलाबाई यांच्या हातापायासह संपूर्ण चेहरा भाजला होता. तरी ही त्यांनी रुग्णालयात जाताना शेजारील महिलेला ‘ते सिलिंडर कुठेच नेऊ नका, आपण त्या कंपनीवाल्याची तक्रार करू’, असे बजावले होते. तसेच उपचारादरम्यानही त्यांनी पती भागवत रुले यांच्याशी घटनेसंदर्भात चर्चा केली होती. मंगळवारी त्यांना अधिकच त्रास जाणवू लागला आणि सकाळी 7.30 वाजता अचानक त्यांचा मृत्यू झाला.


गॅस वितरकाचा हलगर्जीपणा
अयोध्यानगरात घटना घडून चार दिवस उलटले. जखमी मंगलाबाई यांचा जीव गेला. मात्र, अद्याप सिलिंडरच्या वितरकांनी त्या सिलिंडरचा पंचनामा केला नाही. किंवा ते सिलिंंडर त्यांच्या घरातूनही नेलेले नाही, त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.

शुभमने दाखवले शौर्य
गॅस हवेत पसरत असताना शुभमने तातडीने सिलिंडरला कॅप लावली. जर शुभमने असे केले नसते तर कदाचित सिलिंडरचा स्फोट झाला असता. या स्फोटाचे हादरे घराशेजारील परिसरालाही बसले असते. मात्र, या चिमुरड्याच्या धाडसाने मोठी दुर्घटना टळली.नागरिकांनो, ही घ्या काळजी
सिलिंडर डिलिव्हरी करताना ते पूर्णपणे तपासून घ्या
सिलिंडरचे वॉशर, व्हॉल्व्ह केव्हाही तपासून खात्री करून घ्या
गॅस संपल्यानंतर सिलिंडर कधीही आडवे पाडू नका
गॅसची नळी दोन वर्षांपेक्षा अधिक वापरणे धोकेदायक आहे
गॅसचा वापर संपल्यानंतर शेगडीचे दोन्ही बटने बंद ठेवा
गळती झाल्यास इलेक्ट्रीक उपकरणे चालू, बंद करू नका
गॅसचा वास येत असल्यास घरातील दारे, खिडक्या उघडा
बाहेरगावी जाताना रेग्युलेटर बंद करूनच जाणे हिताचे ठरेल
गॅस शेगडीची सहा महिन्यातून एकदा तरी तपासणी करावी
आपत्कालीन स्थितीत वितरकांशी त्वरित संपर्क साधावा