आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्ड्यांमुळे विसरवाडीजवळ गॅस टँकर कलंडला; वाहतूक ठप्प

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : विसरवाडीजवळील नंदुरबार चौफुलीवर गॅस टँकर उलटला. यामुळे टँकरमधील गॅसची गळती झाली. दोन्ही बाजूंनी २५ किमीपर्यंत वाहतूक ठप्प झाली होती.
नवापूर - टँकर आणि ट्रकमधील जोड तुटल्यामुळे गॅस टँकर कलंडल्याची घटना बुधवारी सकाळी विसरवाडी गावाजवळील नंदुरबार चौफुलीवर घडली. यात गॅस टँकरमधून सुमारे एक क्विंटल गॅसची गळती झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील दोन्ही बाजूला २५ किलोमीटपर्यंत रांगा लागल्या होत्या.

टँकर (जी जे ०६ वाय ६६००) हा हाजिरा येथून १७ हजार किलो गॅस भरून धनज नागपूर येथे जात होता; परंतु राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात टँकर आणि ट्रकमधील जोड तुटल्यामुळे गॅस टँकर सकाळी ७.३० वाजता कलंडला. यातून टँकरचा रूटगेज तुटल्याने गॅस गळती सुरू झाली. घटना घडली त्या वेळी सुदैवाने महामार्गावर वाहनांची फारशी वर्दळ नव्हती. अन्यथा मोठा अपघात घडण्याची शक्यता होती. गॅस टँकर उलटल्यामुळे या टँकरमधून गॅसगळती होत असल्याची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. इंडियन ऑइल कंपनीचे अधिकारी दुपारी साडेतीनला घटनास्थळावर पोहोचले. गॅसगळतीमुळे दुर्घटना घडू नये, यासाठी नवापूर नंदुरबार नगरपालिका अग्निशमन विभागाचे बंब आणि अग्निशामक यंत्र उपलब्ध करण्यात आले होते. टँकर उलटल्याने नंदुरबारहून येणारी वाहतूक खांडबारा मार्गे विसरवाडीहून बालआमराईमार्गे वळवण्यात आली. नवापूरकडे जाणाऱ्या एसटी बसेस, लक्झरी, खासगी वाहने, टॅक्सी इतर वाहने येत असल्याने या मार्गावर वाहनांची गर्दी झाली होती.

नऊ तास चक्का जाम
गॅस टँकर उलटल्यामुळे खबरदारी म्हणून महामार्ग पोलिस विसरवाडी पोलिसांनी साक्री नवापूर पोलिसांची मदत घेऊन चरणमाळ मार्गे धुळे सुरतकडे जाणाऱ्या वाहनांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. या महामार्गावर तब्बल नऊ, दहा तास चक्का जाम झाला. नंदुरबार चौफुलीपर्यंत वाहतूक बंद केली तर दुसरीकडे शिरीषकुमार नाईक पेट्रोल पंपापर्यंत या दोन्ही बाजूंची वाहतूक थांबवून ठेवली. सायंकाळी वाजेपर्यंत महामार्गावरील धुळ्याकडील कोंडाईबारी घाटापर्यंत २० आणि सुरतकडील नवापूरपर्यंत २२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातस्थळी पोलिस बंदेबस्त ठेवण्यात आला होता. बॅरिकेट‌्सही लावण्यात आली होती.
इमर्जन्सी रेस्क्यू व्हेइकलला पाचारण
अपघातग्रस्त टँकरमध्ये १७ हजार किलो गॅस होता. यामुळे चालक अलकार राजपूत सहचालक शिवनारायण बोडाना यांनी एमसील लावून गळती थांबवण्याचा प्रयत्न केला; परंतु तो अयशस्वी ठरला. त्यानंतर सकाळी मागून येणारा एचपी टँकरचा चालक संदीप जगताप याने गूळ चुन्याचे मिश्रण करून गळती थांबवण्याचे प्राथमिक प्रयत्न केले. तरीही गॅस गळती बंद करणे त्रासदायक ठरत असल्याने इंडियन ऑइल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मनमाड येथून सायंकाळी ला इमर्जन्सी रेस्क्यू व्हेइकलला पाचारण केले आहे. या इमर्जन्सी रेस्क्यू व्हेइकलच्या माध्यमातून अपघातग्रस्त टँकरमधील गॅसगळती थांबवण्यात आली.
टँकरमधील गॅस ज्वलनशील असून, त्याची गळती होत असल्याने महामार्गावरील दोन्हीकडील वाहतूक बंद करण्याच्या पोलिसांना सूचना केल्या. अपघातात टँकरचा रूटगेज तुटल्याने गॅसगळती सुरू झाल्याने गळती थांबवण्यात आली. व्ही.एस. बसुतकर, व्यवस्थापक (सुरक्षा) इंडियन ऑइल, मनमाड
तत्काळउपाययोजना केली
सकाळी साडेसात वाजता टँकर उलटल्याने टँकरमधील गॅसगळती सुरू झाली. त्यामुळे पोलिस अग्निशमन विभागाला सूचना दिली. अग्निशमन यंत्र आणि पाण्याचे दोन बंब तैनात ठेवण्यात आले. संदीप भोसले, तहसीलदार नवापूर
वीजपुरवठा खंडित; मोबाइलही केले बंद
विसरवाडीचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी पोलिसांना सूचना देऊन घटनास्थळावरून दुचाकी वाहने चालवण्यास प्रतिबंध केला . विसरवाडी परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला. घटनास्थळापासून ५०० मीटर अंतरावरच पोलिस दुचाकी वाहने अडवून वाहनचालकांना दुचाकी पायी चालवत नेण्यास सांगत होते. इतकेच नाही तर खिशातील मोबाइलसुद्धा बंद करण्यास सांगण्यात आले. मोबाइल बंद केल्यानंतरच पोलिस दुचाकी वाहन सोडत होते.