आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gathering News In Marathi, Ex Student Gathering At Chopada College At Jalgaon, Divya Marathi

48 वर्षांनी भेटले जीवाभावाचे मित्र, शेरोशायरी, कवितांनी आजी-आजोबांनी केल्या आठवणी ताज्या,

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - अगं ती तूच का? माझ्यासोबत खेळणारी, गप्पा मारणारी माझी मैत्रीण, किती बदल झालाय तुझ्यात.. अशा भावना व्यक्त केल्या 48 वर्षांनंतर भेटलेल्या जीवाभावाच्या मैत्रिणींनी. तर मित्रांनी देखील त्यावेळच्या खोडकर आठवणींना उजाळा देत शेरोशायरी अन् कविता सादर केल्या. निमित्त होते ‘रियुनियन’ कार्यक्रमाचे.
चोपडा येथील प्रताप विद्यालयातील सन 1966मध्ये अकरावी उत्तीर्ण झालेल्या माजी विद्यार्थ्यांचा कार्यक्रम रविवारी खान्देश सेंट्रलमध्ये झाला. आजी-आजोबा झालेले माजी विद्यार्थी तब्बल 48 वर्षांनंतर पहिल्यांदाच एकमेकांना भेटले. यातील काही मित्रांचा एकमेकांशी संपर्क होता पण भेट नव्हती. या भेटीत सर्व एकमेकांची विचारपूस करताना अगदी भारावून गेले होते. त्यावेळच्या मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी आता वयोवृद्ध झालेले आजी-आजोबा जिल्ह्यासह पुणे, मुंबईतून आले होते. 50 विद्यार्थ्यांपैकी 40 जणांशी संपर्क करण्यात आला होता; त्यातील 30 जण कार्यक्रमात सहभागी झाले होते. सन 1966चे हे विद्यार्थी आज इंजिनिअर, प्राचार्य, शिक्षक म्हणून निवृत्त झालेले आहेत. माजी विद्यार्थी दीपक सराफ यांनी हा योग जुळवून आणला. स्वत:ची ओळख करून देताना आजपर्यंतचा प्रवासातील अनुभव एकमेकांना सांगितले; तर काहींनी शिक्षकांशी केलेल्या खोडकर आठवणी सांगितल्या.
शिक्षकांचे डोळे पाणावले
त्यावेळी या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक एस.डी.कुळकर्णी यांचा सत्कार या माजी विद्यार्थ्यांनी केला. आपले विद्यार्थ्यांना पाहून कुळकर्णी सरांचे डोळे भरून आले होते. यावेळी त्यांनीही काही कविता सादर केल्या. कविता आणि शेरोशायरीत वयोवृद्धही रंगून गेले.
आठवणींना दिला उजाळा
मी आणि दीपक वसतिगृहात राहायचो. आम्हाला सुभाषित करून आणायला सरांनी सांगितले होते. मी नेहमी मागे बसायचो; त्यामुळे शिक्षकांचे माझ्याकडे फारसे लक्ष नसायचे; परंतु मी चांगले सुभाषित तयार करून दिल्याने सरांनी मला शाबासकी दिल्याची आठवण असल्याचे जळगावचे नंदलाल लाड यांनी सांगितले.
रीयुनियन 1966मध्ये अकरावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी एकत्र; दीपक सराफ यांनी केले आयोजन
विठ्ठलाचे गाणे म्हणताच ‘विठ्ठल’ हजर
प्रभा गुजराथी, चोपडा : मोबाइलमुळे समोरासमोर भेटणे कमी झाले आहे. मोबाइलवर कितीही बोलले तरी भेटल्याचा आनंद काही औरच असतो. आम्ही शाळेत असताना दर शनिवारी सांस्कृतिक कार्यक्रमाचा तास व्हायचा. तेव्हा मुलीं विरुद्ध मुले अशा गाण्यांच्या भेंड्या आम्ही खेळायचो. त्या भेंड्या खेळत असताना माझ्यावर ‘व’ अक्षर आले. मी ‘विठ्ठल तो आला’ हे गाणे म्हणायला सुरुवात केली आणि आमच्या वर्गातील ‘विठ्ठल’ नावाचा मुलगा दारावर येऊन उभा राहिला. त्यावेळी सगळे जण खूप हसायला लागले होते.
नातेवाइकांकडून घेतले पत्ते
दीपक सराफ, कार्यक्रमाचे आयोजक : असे स्नेहमेळावे होतात, हे ऐकून होतो.त्यामुळे आपणही असा कार्यक्रम आयोजित करावा असे वाटले. वर्षभरापासून मी कार्यक्रमाचे नियोजन करतोय. शाळेतून त्यावेळच्या विद्यार्थ्यांचे पत्ते घेतले. 48 वर्षांचा कालावधी खूप मोठा होता. काहींचे पत्ते त्यांच्या नातेवाइकांकडून शोधून घेतले. फोन केल्यावर काहींनी ओळखले देखील नाही. आमच्यापेक्षा आमच्या सुना, नातवंडे यांनाच या कार्यक्रमाचा अधिक आनंद झाला.
भावासारखा मित्र
उमेश करोडपती, पारोळा शाळेपासून मी आणि माझा मित्र कृष्णकांत सोनवणे आम्ही सोबतच आहोत. पारोळा येथे तोही माझ्यासोबत अनेक वर्षांपासून आहे. माझ्या पत्नीचे ब्रेन ट्युमरचे ऑपरेशन झाले त्यावेळी तो भावासारखा सतत 15 दिवस माझ्यासोबत राहून त्याने मला मानसिक आधार दिला. नात्यांपेक्षाही मित्रत्वाचे हे नाते मोठे आहे.
सत्तराच्या दशकाचा भास
प्रा.उषा पाटील, धुळे आम्ही सर्व विद्यार्थी सत्तरच्या दशकातील आहोत; पण मला इथे सर्वांना भेटल्यावर सत्तराचे हे दशक असल्याचा भास होतोय. आजकाल वर्गात जसे मुले-मुली एकमेकांशी बोलतात तसे त्यावेळी मुले-मुली एकमेकांशी बोलत नसत. प्रशस्त मैदान असल्याने आम्ही मुली बॅडमिंटन, थ्रो बॉल सारखे खेळ मनमोकळेपणाने खेळायचो.
लग्नाचा वाढदिवस सोडून आले
सूर्यकांत मोदी, पुणे मला जेव्हा कळाले की आपण सगळे जण पुन्हा भेटणार आहेत; तेव्हा संपूर्ण शालेय जीवन डोळ्यासमोर उभे राहिले. 2 मार्च हा माझ्या लग्नाचा वाढदिवस असतो. दरवर्षी आम्ही सगळे एकत्र हा दिवस साजरा करतो. बायको व मुलीने यावेळी घरीच थांबण्यास सांगितले; पण मी मित्रांना भेटणे अधिक महत्त्वाचे मानले.
आठवणी दाटून आल्या..
48 वर्षांनी मी सगळ्यांना भेटत आहे. मैत्रिणींसोबत पूर्वीच्या खूप आठवणी आहेत. येथे येण्यासाठी घरच्यांनी लगेच होकार दिला. आम्ही चार मैत्रिणी नेहमी एकत्र असायचो. या सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या, असे सातार्‍याच्या हेमा गोखले म्हणाल्या.