आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा : तत्कालीन 49 नगरसेवकांवर आरोपनिश्चितीचे आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे - घरकुल घोटाळाप्रकरणी जळगाव पालिकेचे तत्कालीन 49 नगरसेवक व इतरांविरुद्ध कलम 409 नुसार आरोपनिश्चिती करण्याचे आदेश धुळय़ाच्या विशेष न्यायालयाने सोमवारी दिले. याशिवाय आमदार सुरेश जैन यांच्या तपासणीचा वैद्यकीय अहवाल सादर न करणार्‍या डॉक्टरांना व वैद्यकीय मंडळाला कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी संशयितांवर कलम 409 नुसार आरोप निश्चित करावे, असा अर्ज काही महिन्यांपूर्वी दिला होता. या अर्जावर सोमवारी कामकाज झाले. नगरसेवक हे लोकसेवक असतात. त्यामुळे कट कारस्थानाने झालेल्या आर्थिक गैरव्यवहारात नगरसेवकांवरही कलम 120-ब,409 नुसार आरोप निश्चित करावे, असे विशेष न्यायाधीश आर. आर. कदम यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गेल्या महिन्यात जैन यांची वैद्यकीय तपासणी करणार्‍या वैद्यकीय मंडळाने अद्यापही अहवाल सादर केलेला नाही. याबाबत नाराजी व्यक्त करत न्यायालयाने डॉक्टर व वैद्यकीय मंडळाला नोटीस बजावली आहे.

प्रदीप रायसोनी यांना 27 दिवसांची रजा
या प्रकरणातील संशयित प्रदीप रायसोनी यांच्या मुलीचे 12 जूनला लग्न आहे. त्यामुळे न्यायालयाने त्यांना 22 मे ते 18 जूनपर्यंत रजा मंजूर केली आहे. तसेच राजेंद्र मयूर यांना खासगी रुग्णालयात एमआरआय तपासणी करण्याची परवानगी दिली आहे.

जैन वगळता सर्व हजर
प्रकृतीच्या कारणास्तव जिल्हा रुग्णालयात दाखल असलेले सुरेश जैन आजच्या सुनावणीस उपस्थित राहू शकले नाही. सकाळी 11 वाजून 40 मिनिटांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर, जगन्नाथ वाणी, प्रदीप रायसोनी व राजेंद्र मयूर मात्र न्यायालयात हजर झाले होते.