आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा : ‘वजीर’ वर्षभरापासून कारागृहातच ‘हाजिर’!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - राज्यभर गाजलेल्या जळगाव नगरपालिकेच्या घरकुल घोटाळ्यातील अटकसत्राला 28 जानेवारी रोजी एक वर्ष पूर्ण झाले. या प्रकरणात सर्वात प्रथम अटक झालेल्या प्रदीप रायसोनी यांनी वर्षभरात एकदाही दवाखान्यातील उपचारांसाठी धडपड केली नाही, ही बाब जळगावकरांच्या मनात विशेषत्वे नोंदवली गेली आहे.

या प्रकरणात अटकेला सामोरे जावे लागलेल्या अनेक महारथींची प्रकृती अनेकदा बिघडली. न्यायालयाच्या परवानगीने कोणाला वातानुकूलित खासगी दवाखान्यात ठेवले गेले, तर काहींना काही दिवसांसाठी का असेना, सरकारी दवाखान्यात ठेवण्यात आले. मात्र, आमदार सुरेश जैन यांच्या दरबारातील ‘वजीर’ असलेल्या प्रदीप रायसोनींनी एकदाही सरकारी अथवा खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी अर्ज केला नाही वा न्यायालयाकडूनदेखील कोणतीही सवलत मिळवल्याची नोंद समोर आली नाही.

ज्यांच्या इशार्‍याशिवाय पालिकेतील एकही निर्णय व बदल होत नव्हते, ज्यांच्या आदेशाने कामांची यादी तयार होत असे ते महापालिकेतील सत्ताधारी गटाचे ‘भाऊ’ प्रदीप रायसोनी यांच्या साम्राज्याला 28 जानेवारी 2012 रोजी सुरुंग लागला. त्या दिवशी दुपारी सर्वप्रथम त्यांनाच अटक करण्यात आली. तत्पूर्वी महिनाभरापासून तत्कालीन अप्पर पोलिस अधीक्षक इशू सिंधू यांनी घरकुल घोटाळ्याच्या गुन्ह्यातील कागदपत्रांचा अभ्यास सुरू केला होता.

या प्रकरणात काहीतरी हालचाली सुरू असल्याचे कळताच रायसोनी यांनी स्थायी समिती सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. घोटाळय़ाच्या तपासात रायसोनी यांच्या नियोजनातूनच घरकुल योजना अवलंबली गेल्याचे पुरावे हाती लागले. त्यामुळे 28 जानेवारीला दुपारी त्यांना आणि आमदार सुरेश जैन यांचे जिवलग मित्र जगन्नाथ वाणी व राजेंद्र मयूर यांना सायंकाळी राहत्या घरी अटक करण्यात आली. तेव्हापासून या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी असलेले प्रदीप रायसोनी जळगाव कारागृहातच आहेत. त्याआधी काही दिवस त्यांना पोलिस कोठडीचीही हवा खावी लागली आहे. शनिवारच्या अटकेनंतर पोलिस कोठडी संपताच न्यायालयीन कोठडीत जाण्यापूर्वी वाणी व मयूर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर ते सतत सरकारी व खासगी रुग्णालयात उपचार घेत राहिले; परंतु रायसोनी कधीच तिकडे गेले नाहीत.

रायसोनींमुळेच मिळाली तपासाची दिशा
चौकशीदरम्यान रायसोनींकडून काढून घेतलेली माहिती पुढच्या तपासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरली, असे तपासाधिकारी सिंधू यांनी आरोपपत्रात अप्रत्यक्षपणे नमूद केले आहे. 25 एप्रिल रोजी प्रमुख तिघा आरोपींविरुद्ध मूळ आरोपपत्र दाखल करण्यात आले. मधल्या काळात रायसोनींनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता; मात्र, न्यायालयाने तो फेटाळून लावला. त्यामुळेच वर्षभरापासून रायसोनी न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरुंगात आहेत.

उच्च, सर्वोच्च न्यायालयाने फेटाळले जामीन अर्ज
कारागृहात रवानगी झाल्यानंतर रायसोनी, वाणी व मयूर यांच्यावतीने जिल्हा न्यायालयासह उच्च् न्यायालय व सर्वोच्च् न्यायालयात दाखल करण्यात आलेले जामीन अर्ज सतत तीन वेळा फेटाळण्यात आले. त्यामुळे या सर्वांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. त्यानंतर मात्र, रायसोनी यांनी अर्ज केल्याची नोंद नाही.

तपासातून सिंधूंची एक्झिट
घरकुल घोटाळ्याचा तपास वेगवेगळय़ा सहा वरिष्ठ अधिकार्‍यांकडे देण्यात आला होता. मात्र, जबाब नोंदविण्या पलिकडे तपासाची चक्रे हलली नव्हती. इशू सिंधू यांना अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून जळगावला नियुक्ती मिळाल्याने हा तपास त्यांच्याकडे देण्यात आला आणि तपासाला गती आली होती. त्यांनीच 28 जानेवारी 2012 रोजी या प्रकरणी प्रदीप रायसोनींसह तिघांना अटक केली होती. पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनाही अन्य आरोपींसह पोलिस ठाण्यातून न्यायालयात आणण्यात आले होते. मात्र, कार्यकाळ संपल्यानंतर सिंधू यांची औरंगाबादला बदली झाली आणि तपासातून एक्झिटही.

रायसोनींनी खिळवून ठेवल्या नजरा
या प्रकरणाचे तपासाधिकारी इशू सिंधू व सहायक पोलिस निरीक्षक नितीन नेहूल यांच्या कारागृहातील वाढत्या चकरा व तपासातील मुद्यांमुळे गुन्ह्याचे गांभीर्य वाढतच चालले होते. त्यातच ‘रायसोनी कलम 164अन्वये कबुलीजबाब देणार’ या वृत्ताने चांगल्या-चांगल्यांच्या मनात धडकी भरवली. त्यामुळे जबाबात रायसोनी काय सांगतात, यावर खल सुरू होता. न्यायालयात त्याबाबत तासभर प्रक्रियाही चालली; परंतु तब्बल दोन महिन्यांनी रायसोनींनी जबाब दिलाच नसल्याचे उघड झाले. तोपर्यंत रायसोनींच्या जबाबात काय? याबाबत मात्र प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याने सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे लागल्या होत्या.