आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयातील वरिष्ठांचेही ‘घरकुल’च्या तपासाकडे लक्ष

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगावच्या तत्कालीन नगरपालिकेत घरकुल योजनेंतर्गत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या तपासाने वेग घेतल्यानंतर शहरवासीयांसह मंत्रालयातील काही वरिष्ठ मंत्री व सात अधिकारीदेखील या प्रकरणाकडे लक्ष ठेवून आहेत. तसेच या प्रकरणातील काही नगरसेवक फरार झाले आहेत तर काही फरार होण्याच्या तयारीत आहेत.
तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून शहरातील 90 आजी-माजी नगरसेवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास गुन्हा दाखल झाल्यापासून फारसा झालेला नव्हता; परंतु 11वे तपासाधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक इशू संधू यांनी फाइल उघडल्यानंतर सुरुवातीचे चार महिने या प्रकरणाचा अभ्यास करण्यात घालवले. त्यानंतर या प्रकरणाच्या मूळ तपासाला सुरुवात झाली. संधू यांनी याबाबत महत्त्वाच्या कागदपत्रांची जुळवाजुळव केल्यानंतर जळगावकरांचे लक्ष या प्रकरणाकडे वेधले गेले. जसजसा या प्रकरणाच्या तपासाने वेग घेतला तसे जळगावकरांचे लक्ष याकडे वेधले गेले आहे. त्यातच तपासाधिकारी संधू यांनी मंत्रालय व हुडकोच्या कार्यालयातून काही महत्त्वाची गोपनीय कागदपत्रे आपल्या ताब्यात घेतल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले. याच काळात संधू यांनी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसह काही वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. तसेच संधू यांची मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांशीदेखील काही काळ चर्चा झाली असल्याचे समजते.
दरम्यान, संधू यांच्या तपासाला मुख्यमंत्री व काही मंत्र्यांकडूनही पाठिंबा मिळत आहे. त्याचाच परिणाम म्हणून की काय, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड.प्रवीण चव्हाण यांची नेमणूक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास चोख होत असतानाच, मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडून तपासाधिकारींना मिळणारा पाठिंबा यामुळे दोषी नगरसेवकांमध्ये याबाबत प्रचंड घबराट निर्माण झाली आहे.
नगरसेवक फरार होण्याच्या तयारीत - या प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या दोषी नगरसेवकांमध्ये घबराट असतानाच, जिल्हा न्यायालयाने तीन तत्कालीन नगराध्यक्षांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. त्यामुळे पोलिसांकडून अटक होईल या भीतीने काही नगरसेवक बाहेरगावी जाण्याची तयारी करीत आहेत तर शहरातील पाच नगरसेवक घाबरून अन्यत्र रवानादेखील झाले आहेत. त्यातील दोन नगरसेवक गोवा येथे तर तीन पुणे येथे गेले आहेत. तसेच आणखी एका माजी महापौर फरार होण्याच्या तयारीत आहे. घरकूल घोटाळ्याच्या संदर्भात सुरु असलेल्या तपासातील हालचालींची शहरात होणारी चर्चा बघून अटकेच्या भीतीपोटी काही नगरसेवक फरार होण्याच्या तयारीत आहेत. तर काही वेगवेगळ्या कायदेतज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत आहेत.
हा गुन्हा खुनापेक्षाही मोठा - आर्थिक स्वरूपाचा कोणताही गुन्हा हा खुनापेक्षाही मोठा असतो, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी दिले आहेत. आर्थिक स्वरूपाच्या गुन्ह्याचे परिणाम कित्येक वर्षे त्या परिसरावर होत असतात आणि त्याचीच किंमत आज जळगावकर मोजत आहेत. हा गुन्हा एकूण 300 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिकावर 40 ते 50 हजार रुपयांचे कर्ज आहे. हा एक प्रकारे सर्वसामान्य माणसाच्या खिशावर दरोडाच आहे. या प्रकरणातील फिर्यादी प्रवीण गेडाम, तपासाधिकारी इशू संधू व विशेष सरकारी वकील म्हणून मी असे आम्ही तिघेही तरुण आहोत. तरुणांनी ठरविले तर या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यामुळे या प्रकरणातही मी जबरदस्त काम करणार आहे. - अ‍ॅड.प्रवीण चव्हाण, विशेष सरकारी वकील