आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळ्याची वीण उलगडणार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - जळगाव पालिका काळातील घरकुल घोटाळ्याच्या खटल्याचे कामकाज चालविण्यासाठी राज्य सरकारतर्फे औरंगाबाद येथील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. सोमवारी सकाळी मुख्यमंत्री कार्यालयातून याबाबतचे आदेश जारी करण्यात आले.
जळगाव नगरपालिका अस्तित्वात असताना शहरात उभारण्यात आलेल्या घरकुल योजनेत झालेल्या कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपर पोलिस अधीक्षक इशू संधू यांनी या प्रकरणाची फाईल पुन्हा उघडून तपास वेगात करण्यासाठी स्वत: पालिकेत जावून महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली होती. संधू महत्त्वाच्या कामासाठी मुंबईत गेल्यानंतर त्यांच्या बदलीची अफवाही पसरली होती. संधूंनी मंत्रालयातून या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेतली असून दोन फाइल्सही जप्त केल्या आहेत. सत्तेच्या गैरवापरातून घडलेल्या घरकुल घोटाळ्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने या खटल्यासाठी विशेष वकील नेमल्याने आता पोलिसांना अधिक प्रभावीपणे बाजू मांडता येईल.
जामीन पुन्हा लटकले - अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतलेल्या तत्कालीन तिघा नगराध्यक्षांच्या अर्जावर आता 24 जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे. तत्कालीन नगराध्यक्ष लक्ष्मीकांत चौधरी, चत्रभुज सोनवणे व पुष्पा पाटील यांचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने फेटाळल्याने तिघांनी खंडपीठात धाव घेतली होती. त्यांच्या अर्जावर सोमवारी सुनावणी होणार होती. मात्र, याबाबतची नोटीस पोलिसांना शनिवारी मिळाल्याने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून पोलिसांनी न्यायालयाकडे वेळ मिळण्याची मागणी केली. त्यावरून न्यायालयाने पोलिसांना एका आठवड्याची मुदत दिली.
जळगावशी संबंध - प्रवीण चव्हाण यांनी या पूर्वी अप्पर पोलिस अधीक्षक मनोज लोहार प्रकरणात डॉ. उत्तम महाजन यांच्या वतीने तर संतोष चौधरी, सानिया काद्री प्रकरणात काद्रीतर्फे बाजू मांडली आहे.