आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंधू कोल्हे यांच्या ‘माफी’वर न्यायालयाचे शिक्कामोर्तब

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल योजनेत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोपी असलेल्या माजी नगराध्यक्षा सिंधू कोल्हे यांच्या माफीच्या साक्षीदार अर्जावर न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले.
न्यायाधीश व्ही.एस. दीक्षित यांनी कोल्हे यांनी दाखल केला अर्ज मंजूर करुन त्यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केले आहे. घरकुल घोटाळ्याच्या काळात जळगाव नगरपालिकेच्या सिंधू कोल्हे या नगराध्यक्षा होत्या. त्यामुळे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांनी दिलेल्या फिर्यादीत त्यांनाही आरोपी केले होते. त्यानंतर या घोटाळ्याचा तपास सुरू झाल्यावर कोल्हे यांनी पोलिसांना आमदार सुरेश जैन यांच्याविरुद्ध जबाब दिला होता. त्यांनी न्यायालयात कलम 164 अन्वये जबाब नोंदविला होता. चार दिवसांपूर्वी सिंधू कोल्हे यांनी न्यायालयात माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज दिला होता. त्यांच्या अर्जावर न्यायाधीश दीक्षित यांनी तपासाधिकार्‍यांचे म्हणणे मागितले होते. सरकार पक्षाने कोल्हे यांच्या अर्जावर कोल्हे यांना माफीचा साक्षीदार करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. शुक्रवारी न्यायाधीश दीक्षित यांच्यासमोर कोल्हे यांना हजर करण्यात आले. कोल्हे यांना न्यायाधीशांनी काही प्रश्न विचारले. विचारलेल्या प्रश्नावर सिंधू यांनी दिलेल्या उत्तरामुळे न्यायाधीशांचे समाधान झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हे यांना माफीचा साक्षीदार म्हणून घोषित केले आहे. आता या खटल्याला वेगळेच वळण मिळणार आहे. कोल्हे यांनी न्यायाधीशांकडे नोंदविलेल्या लेखी जबाबानंतर न्यायाधीशांनी हा आदेश दिला आहे.
पुढे काय होणार? - कोणत्याही गुन्ह्याचा तपास करताना पोलिस फक्त परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तपास करीत असतात. त्याच पुराव्यांच्या आधारे न्यायालयात खटला चालतो. मात्र, माफीचा साक्षीदार ही व्यक्ती त्या गुन्ह्याची प्रत्यक्ष हकिगत सांगू शकणार असते. माफीचा साक्षीदार झालेली व्यक्ती त्या गुन्ह्यात आरोपी राहत नाही. ती फक्त साक्षीदार राहते. त्यामुळे त्याला या गुन्ह्यात शिक्षा होत नाही. माफीच्या साक्षीदारास गुन्ह्याची इत्यंभूत माहिती असते. ही व्यक्ती न्यायालयासमोर ही माहिती उघड करणार असल्याने इतर आरोपींना अधिक शिक्षा होऊ शकते.
माफीचा साक्षीदार होणे म्हणजे काय? - आरोपीला माफी देऊन तो आरोपी गुन्ह्याची कबुली देण्यास तयार असेल तर काही अटीच्या अधिन राहून त्याला माफीचा साक्षीदार करता येते. सीआरपीसी 306 व 307 नुसार त्याला माफीचा साक्षीदार करता येते. आरोपीची त्या गुन्ह्यातील भूमिका दुय्यम आहे. मात्र, त्याला गुन्ह्यातील इतर बारकाव्यांची माहिती आहे, त्याने त्या गुन्ह्यात घेतलेला फायदा किरकोळ असेल त्या व्यक्तीला माफीचा साक्षीदार करता येते.