आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहवाल म्हणतो, ‘ते’ धमकावतात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यातील आरोपी सुरेश जैन, प्रदीप रायसोनी यांना कायद्याचा कोणताही धाक नसल्याबाबत 1993 साली तत्कालीन जिल्हाधिकारी अजयभूषण पांडे यांनी आपल्या अहवालात म्हटले होते. त्याचबरोबर हे दोन्हीही आरोपी, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांना वारंवार धमकावत होते. त्यांच्या नगरपालिकेतील कृत्यांचा समाचारदेखील पांडे यांनी आपल्या अहवालात घेतल्याची बाब विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी शनिवारी आपल्या युक्तिवादात न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.

जैन, रायसोनी, मयूर यांच्या जामीन अर्जावरील अपूर्ण राहिलेला युक्तिवाद शनिवारी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन.आर. क्षीरसागर यांच्या न्यायालयात झाला. युक्तिवादात अँड.चव्हाण यांनी आरोपी कसे प्रभावशाली आहेत. त्यांना जामीन मंजूर केल्यानंतर ते साक्षीदारांना कसे दबावात आणू शकतात. याबाबतचे मुद्दे कथन केले. हे कामकाज संध्याकाळपर्यंत चालल्याने त्रयस्त अर्जदारांचे वकील अँड.प्रमोद पाटील यांचा युक्तिवाद अपूर्ण राहिला. त्यामुळे मंगळवारी पुन्हा सुनावणी होईल.

जेलरकडून पदाचा दुरुपयोग
आमदार सुरेश जैन यांना कारागृहात न पाठवता हॉस्पिटलमध्ये ठेवण्याच्या प्रक्रियेत आर्थररोड कारागृहाचे अधीक्षक व वैद्यकिय अधिकार्‍यांकडून पदाचा दुरुपयोग केला जात असून त्यांची चौकशी करण्याची मागणी अँड.निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी न्यायालयात केली. डॉक्टरांच्या प्रमाणपत्रात जैन यांची तब्येत गंभीर अथवा नाजूक असल्याबाबत कोणताही उल्लेख नाही. जैन यांनी जेलरला मॅनेज केले आहे व कारागृह नियमावलीतील 3, 6 व 11 या नियमाचे उल्लंघन केल्याचे देखील त्यांनी सांगितले.

काय केला सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी युक्तिवाद
० आरोपींचे भूतकाळातील व वर्तमानकाळातील वर्तन गंभीर असल्याबाबत 1993 मध्ये जिल्हाधिका-यांनी दिलेल्या अहवालाच्या प्रती व या अहवालातील मुद्दे लक्षात घेऊन जामिनावरील अर्जाचे कामकाज व्हावे.
० 3 फेब्रुवारी 2006 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याबाबतची स्टेशन डायरीची नोंद, शहर पोलिस ठाण्यावर काढण्यात आलेला मोर्चा व अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असल्यामुळे आम्ही आरोपींना अटक करणार नाहीत, असे पोलिस अधीक्षकांचे वक्तव्य यावरून आरोपी किती प्रभावशाली आहेत हे दिसते.
० फिर्यादी तत्कालीन महापालिका आयुक्त प्रवीण गेडाम यांच्यावर जैन यांचे भाऊ रमेश जैन यांनी लॅपटॉप चोरीचा गुन्हा दाखल केला होता. तो तपासाअंती गुन्हाच घडला नसल्याचे सिद्ध झाले.
० जैन यांनी 11 मार्च 2012 रोजी न्यायालयात तपासाधिकारी इशू सिंधू यांना गंभीर परिणाम होण्याची धमकी दिली होती. त्यानंतरही नऊ दिवस पोलिस कोठडीत असताना वारंवार धमकी दिली होती.
० वाणी यांनी तपासात दिशाभूल करणारी माहिती तपासाधिका-यांना दिली होती. तसेच खंडपीठात 16 ऑगस्ट 2012 ला न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खंडपीठाने वाणी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी हे प्रकरण मुख्य न्यायमूर्ती मुंबई यांच्याकडे वर्ग करण्याचे आदेश दिले होते.


० रायसोनी यांनी वेळोवेळी तपासाधिकाºयांना पत्र लिहून तपास केल्यास न्यायालयाचा अवमान होईल व आम्ही याबाबत याचिका दाखल करू, अशी धमकी दिलेली आहे.
० आरोपी रायसोनी यांना अटक झाल्यानंतर ते कलम 164 चा जबाब देणार असल्याचे वृत्त 8 फेब्रुवारी 2012 रोजी प्रसिद्ध झाल्याबरोबर जैन यांनी आपले जवळचे हस्तक माजी महापौर ढेकळे व सपकाळे यांच्यामार्फत जेलरवर दबाव आणला. जैन यांनी स्वत: जेलरला फोन केला. जेलरला स्वत: दोन पत्रे लिहिली. 9 फे ब्रुवारी 2012 रोजी आरोपी रायसोनी यांच्या जीविताला धोका असल्याची कल्पना आल्यावर जेलर यांनी वरिष्ठांशी चर्चा व संपर्क साधून अतिरिक्त पोलिस दल मागविले होते. जैन यांना 19 मार्च 2012 रोजी न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांना मारहाण करण्यात आली होती. याबाबत गुन्हाही दाखल आहे.

० तिघाही आरोपींनी इतर आरोपींमार्फत खंडपीठात गेडाम व सिंधू यांच्यावर दबावासाठी याचिका क्रमांक 82 /12 दाखल केली होती. ती खंडपीठाने फेटाळून लावली आहे.
० वाणी यांनी आपल्या नातीच्या लग्नासाठी 15 जानेवारी 2013 रोजी तात्पुरता जामीन मागितला होता. जामीन न देता केवळ काही तास लग्नात हजेरी लावण्याची परवानगी त्यांना देण्यात आली होती. ही परवानगी वाणी गणपती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल असताना त्यांच्याकडे पोलिस बंदोबस्ताचे बाकी असलेले 49 लाख रुपये भरतो याचे प्रतिज्ञापत्र घेऊन देण्यात आली होती. ते पैसे एक महिन्यात भरतो, असे सांगूनही त्यांनी अद्यापपर्यंत ते पैसे भरलेले नाहीत.
० रायसोनी जळगाव महापालिकेत महापौर असताना 2010 मध्ये घरकुलचा गुन्हा काढून टाकण्याबाबत त्यांनी ठराव पास केला होता. तसेच अधिका-यांना याबाबत पत्रव्यवहारदेखील केला होता. हा तपासात अडथळाच होता.