आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळा सुनावणी : ही तर सरकार पक्षाची ‘मीडिया ट्रायल’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - घरकुल घोटाळ्याच्या खटल्यात आरोपींच्या जामीन अर्जाच्या सुनावणीत सरकार पक्ष प्रसिद्धीसाठी वाटेल ते करीत आहे. आमदार सुरेश जैन यांच्या जामीन अर्जावर त्यांनी दाखल केलेला 56 पानांचा खुलासा अवास्तव असा आहे.या खुलाशात त्यांनी काय मांडलेय ते लागलीच सर्वच वृत्तपत्रात प्रसिद्ध केले जातेय. त्या माध्यमातून सरकार पक्ष या खटल्याची मीडिया ट्रायल चालवित आहे, असा आरोप जैन यांचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ राजा ठाकरे यांनी गुरुवारी न्यायालयात केला.

सुरेश जैन यांच्यासह माजी महापौर प्रदीप रायसोनी, खान्देश बिल्डर्सचे संचालक नाना वाणी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावरील सुनावणीला गुरुवारी दुपारी साडेतीन वाजता सुरुवात झाली. या वेळी जैन यांचे वकील ठाकरे यांनी युक्तिवाद करताना त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला जामीन अर्ज खालच्या न्यायालयात दाखल करण्यासाठी मुभा दिली असल्याने आम्ही हा अर्ज केला आहे. केसमध्ये पोलिसांनी काय पुरावा जमा केला आहे. या विषयी आम्हाला काही म्हणायचे नाही. कलम 409 खाली जन्मठेपेची शिक्षा असली तरी, आम्हाला जामीन मागता येत नाही असे नाही. कलम 409 खाली खटला न्यायदंडाधिकार्‍यांना चालविण्याचा अधिकार आहे. गुन्ह्याचे स्वरूप गंभीरच आहे असे नाही.

जैन यांना न्यायालयाने अंतरिम जामिनावर सोडले होते. त्यावेळी आम्ही कोणावर दडपण आणल्याची एकही तक्रार नाही. याच गुन्ह्यातील आरोपी तथा या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे पालकमंत्री असताना त्यांना जामीन दिला जातो. ते मंत्री असल्याने आमदारापेक्षा नक्कीच दबदबा असलेले व्यक्ती आहेत. मग जैन हे तर साधे आमदार आहेत. न्यायालयाने कोणत्याही अटीवर जैन यांना जामीन मंजूर करावा न्यायालय सांगेल तर ते जळगावात काय? पण महाराष्ट्राबाहेरदेखील राहण्यास तयार आहेत. या गुन्ह्यात आहेत ते पुरावे तर बदलता येणार नाहीत.

सरकार पक्षाने जैन यांच्या दवाखान्यात राहण्याबाबत घेतलेल्या आक्षेपाला विरोध करीत ठाकरे यांनी सांगितले की, 6 नोब्हेंबर 2012 रोजी सर्वोच्च न्यायालयाने शासनाला जैन यांना चांगल्या शासकीय रुग्णालयात उपचार घेण्याबाबत आदेश केलेले आहे. कारागृहात न जाणे ही काही मॅनेज बाब होऊ शकत नाही. सध्या ते दवाखान्यात असतानाही कोठडीतच आहेत. आरोप निश्चितीच्या वेळी न्यायालयाचेदेखील मत होते की, जैन आजारी आहेत. त्यामुळेच तर त्यांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगव्दारे सुनावणी घेण्यात आली आहे.

नाना वाणी हे फक्त बिल्डर
नाना वाणी हे फक्त बिल्डर आहेत. घरकुलाच्या संपूर्ण प्रक्रियेत वाणी हे टेंडर भरल्यानंतर पुढे आले आहेत. आम्ही या कोणत्याही कटात कधीही सहभागी नव्हतो, असे वाणी यांचे वकील अँड.एस.के. शिरोळे यांनी युक्तिवादात सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याखाली वाणींवर आरोप नाहीत. त्यांची प्रकृती सुरुवातीपासून बरी नसते. त्यांच्या मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी आहेत. त्यामुळे आरोग्याच्या कारणासाठी तरी त्यांना जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी अँड. शिरोळे यांनी केली.

जैन यांना जामीन का नाही?
आर्थिक घोटाळ्याच्या गुन्ह्यांमध्ये ए. राजा, सुरेश कलमाडी, हर्षद मेहता यांचे घोटाळे कोट्यवधी रुपयांचे असतानादेखील त्यांना वर्षभराच्या आत न्यायालयाने जामीन दिलेले आहेत. मग जैन यांना वर्ष उलटूनही जामीन का मिळत नाही, असा प्रश्न ठाकरे यांनी केला.

आमच्या अर्जावर सुनावणी घ्या
सुरेश जैन यांच्यावर उपचार करणारे जेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व आर्थररोड कारागृहाचे अधीक्षकांचे जैन यांच्या आजाराबाबतचे प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याबाबत सरकार पक्षाने केलेल्या अर्जाबाबत आधी न्यायालयात सुनावणी घेण्यात यावी, अशी मागणी विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी यांनी केली. न्यायालयाने त्या अर्जावर सुनावणी व जामीन अर्जावरील अपूर्ण युक्तिवाद शनिवारी घेण्याचे आदेश दिले.

जन्मठेपेचे कलम रायसोनींना नाही
409 हे जन्मठेपेचे कलम रायसोनींना लावलेले नाही. रायसोनींवरील कलमात 7 वर्षे इतकी शिक्षा आहे. रायसोनींवरील आरोप हे जैन यांच्यावरील आरोपांपेक्षा वेगळे आहेत. रायसोनी ही एक मेव व्यक्ती आहे की जे अटकेपासून कारागृहात असल्याचे त्यांचे वकील अँड. अ. वा. अत्रे यांनी सांगितले. रायसोनी यांना आर्थिक लाभ झाला आहे, असे सरकारी वकील व तपासाधिकार्‍यांनी कोठेही म्हटलेले नाही. त्यांच्यावर फक्त जैन यांचा विश्वासू म्हणून आरोप आहे.