आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुल घोटाळ्यातील बडे आरोपी फिरकलेच नाहीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरकुल घोटाळ्यात आरोपींच्या अटकेनंतर पहिल्यांदाच सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती, परंतु आरोपी आमदार सुरेश जैन व पालक मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासारखे बडे आरोपी फिरकलेच नाहीत त्यांनी वकिलांमार्फत खुलासा सादर करून हजेरी टाळली. त्यामुळे 53 पैकी केवळ 21 आरोपींची हजेरी होती. अशा परिस्थितीतही न्यायालयात प्रचंड गर्दी झाली होती.

घरकुल घोटाळ्याचे कामकाज सुरू असलेल्या विशेष न्यायाधीश व्ही. एस. दीक्षित यांच्यावर अविश्वास दाखवत त्यांच्यासमोर सुनावणी सुरू ठेवण्यास अँड. एन.डी.सूर्यवंशी यांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी मुख्य न्यायाधीश जैन यांच्याकडे अर्ज दाखल करत हा खटला दुसर्‍या न्यायालयात वर्ग करण्याची मागणी केली होती. त्यासंदर्भात गुरूवारी कामकाज झाले. या वेळी आरोपींना हजर राहण्याच्या नोटिस बजावल्या होत्या. त्यानुसार दुपारी 3 वाजता न्यायाधीश जैन यांच्यासमोर सुनावणी सुरू झाली. या वेळी माजी नगरसेविका प्रमीला माळी वगळता सर्वच आरोपींचे वकीलांनी खुलासे सादर केले.

जैन यांचा खुलासा स्वीकारण्यास नकार
सुरेश जैन हे सुनावणीवेळी गैरहजर असल्याने त्यांचे वकील अँड.अकिल इस्माईल यांनी लेखी खुलासा सादर केला; मात्र यापुर्वीचा अनुभव पाहता जैन यांनी दिलेल्या खुलाशाची नक्कल स्वीकारण्यास सरकारी वकील सूर्यवंशी यांनी हरकत घेतली. त्यावर अँड. अकिल इस्माईल यांनी हा खुलासा जैन यांना विचारूनच दिल्याचे लेखी निवेदन दिले. त्यामुळे अँड. सूर्यवंशी यांनी आपली हरकत मागे घेत खुलासा स्वीकारला. तसेच विशेष न्यायालयात यापुढे घरकुल प्रकरणाचा खटला चालवू नये, अशी विनंतीही केली; मात्र जैन यांच्या जामीन अर्जावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीवर जामिनाचा अंतिम निर्णय होईपर्यंत विशेष न्यायालयाने आदेश करू नयेत, असा आदेश जिल्हा सत्र न्यायाधीश इंदिरा जैन यांनी दिला.तसेच अँड. सुर्यवंशी यांनी जैन यांच्या नव्या प्रतिज्ञापत्रासंदर्भात घेतलेल्या हरकतीवर सुध्दा 2 फेब्रुवारी रोजी घेण्याचे आदेशदेखील न्यायालयाने दिले. सुनावणी दरम्यान वकीलपत्र दाखल नसल्याने चंद्रकांत सोनवणे यांची धावपळ उडाली.

हे आरोपी न्यायालयात राहिले हजर
गुरुवारी न्यायालयात सुनावणीला कारागृहातील आरोपी माजी महापौर अशोक सपकाळे व सदाशिव ढेकळे यांना पोलिस बंदोबस्तात आणण्यात आले. त्याचबरोबर माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे, आबा कापसे, चंद्रकांत सोनवणे, पुष्पा पाटील, सिंधू कोल्हे, अरुण शिरसाळे, लक्ष्मीकांत चौधरी, सुभद्रा नाईक, शांताराम सपकाळे, कैलास सोनवणे, शालिक सोनवणे, रेखा सोनवणे, बंडू काळे, पी. डी. काळे, पिंटू जाधव, अशोक परदेशी, मंजुळा कदम, सरस्वतीबाई कोळी, भागीरथी सोनवणे हेदेखील हजर होते.