आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गिरणा’ 9 वेळेस ‘भरले’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चाळीसगाव - उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जलक्षमता असलेले गिरणा धरण निम्म्या जिल्ह्याला वरदान ठरले आहे. धरण गेल्या 43 वर्षात फक्त 9 वेळाच पूर्ण क्षमतेने भरले असून यात एकदा हॅट्ट्रिक झाली आहे. 2007 पासून धरण 100 टक्के भरले नाही. सद्य:स्थितीत धरणात फक्त मृतसाठा शिल्लक असला तरी त्यात गेल्या आठवड्यात वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील ठेंगोडा लघु सिंचन प्रकल्प भरल्याने त्यातून गिरणा धरणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

नांदगाव तालुक्यातील पूर्वीच्या पांझण गावी असलेल्या महाकाय गिरणा धरणात नियोजित पाण्याचा वापर 13 हजार 215 द.ल.घ.फू.आहे. धरणाचे बुडीत क्षेत्र 5552 असून 43 वर्षात फक्त 9 वेळाच धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. तरीदेखील पाणी टंचाई फारशी भेडसावली नाही. किमान पावसाळय़ापर्यंत 10 ते 15 टक्के पाणीसाठा होता. गेल्या दोन वर्षांपासून भर पावसाळय़ात जुलै महिन्यात धरणात मृतसाठा शिल्लक आहे. विशेष म्हणजे 2004 ते 2007 या सलग चार वेळेस गिरणा धरण 100 टक्के भरले. सहा वर्षांपासून धरण पूर्ण क्षमतेने भरले नाही. मागील वर्षी आजच्या तारखेला गिरणा धरणात केवळ चार टक्के पाणीसाठा शिल्लक होता. भरपावसाळय़ात जुलै महिन्यात 42 वर्षात दुसर्‍यांदा मृतसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे पाणीटंचाईची भीषणता दिसून येते. गिरणा धरणामुळे 40 हजार हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होतो. एरंडोलसह चाळीसगाव, भडगाव व पाचोरा तालुक्यातील 224 गावे व या चारही शहरांसाठी गिरणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. गिरणावर अवलंबून असलेल्या गावांमध्ये भरपावसाळयात सलग दुसर्‍या वर्षात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

भरपावसाळयात सहा ते सात दिवसांनी पाणीपुरवठा करण्याची वेळ पालिकेवर गेल्या 10 वर्षात दुसर्‍यांदा आली आहे. शहरातील प्रत्येक नागरिकास दररोज साधारण फक्त 55 लिटर पाणी वितरण सद्य:स्थितीत होत आहे. चाळीसगाव तालुक्यात 38.8 मिलीमीटर पाऊस झालेला आहे.


या वर्षीएकही आवर्तन नाही
मागील वर्षी गिरणा धरणातून शेतीला फक्त एक आवर्तन देण्यात आले होते. मात्र या वर्षी तर एकही आवर्तन मिळाले नाही. मागील वर्षापेक्षा धरण कमी भरल्याने फटका शेतकर्‍यांना बसला.


पांझण कालवाही कोरडा
गिरणा धरणातून सुमारे 53 कि.मी.लांबीचा पांझण डावा कालवा काढण्यात आला आहे. त्याची एकूण सिंचन क्षमता 12.141 हेक्टर आहे. अपूर्ण पावसाअभावी पांझण कालवाही खळखळून वाहिला नाही. पाण्याची बारीक धारच दिसत आहे.


पाणीसाठय़ात वाढ
गिरणा धरणात 10 जुलैअखेर 1800 द.ल.घ.फू. पाणीसाठा शिल्लक होता. दहा दिवसात यात वाढ 200 द.ल.घ.फू.ने वाढ झाली. सोमवार सायंकाळअखेर धरणात 2189 द.ल.घ.फू.पाणीसाठा शिल्लक आहे. ठेंगोळा लघु सिंचन प्रकल्पातून 871 क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे.

सहा दिवसांनी पाणी
शहरात आजच्या तारखेला मागील वर्षी सात ते आठ दिवसांनी पाणी पुरवठा होत होता. त्यावेळी गिरणा धरणात पाणीसाठा शिल्लक होता. आजही मृतसाठा शिल्लक आहे. जून अखेरपर्यंत शहरात आठ दिवसांनी पाणी वितरण झाले. मात्र पाऊस झाल्याने मेहुणबारे पंपिंगवरील परिस्थिती सुधारली असल्याने नगरपालिका प्रशासनाला सहा दिवसांनी पाणीपुरवठा करणे शक्य होत आहे.

आजच्या तारखेची गिरणा धरणातील पाण्याची स्थिती
सन टक्केवारी
2007 46
2008 04
2009 11
2010 06
2011 4.30
2012 4.00
2013 00