आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Girana's Water Released To Dapora : Demanding Of Jalgaon Corporation

‘गिरणा’चे पाणी दापोर्‍यापर्यंत सोडा : जळगाव महापालिकेची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - गिरणा प्रकल्पातून सोमवारी आवर्तन सोडण्यात येणार आहे. तथापि, गिरणा नदीतून सोडण्यात येणारे हे आवर्तन दापोरा प्रकल्पापर्यंत सोडावे, अशी मागणी महापालिकेतर्फे करण्यात आली आहे. दापोरा प्रकल्पापर्यंत पाणी आल्यास या पाण्यावर शहराला दोन महिने पाणीपुरवठा करणे शक्य असल्याचा दावा महापालिकेतर्फे करण्यात आला आहे.

चाळीसगाव, पाचोरा आणि भडगाव या शहरांसह तालुक्यातील अनेक गावांना गिरणा प्रकल्पाचा आधार आहे. गिरणा नदीत आवर्तन सोडल्यास टंचाईग्रस्त गावांना दीड महिन्यासाठी पाणी उपलब्ध होणार आहे. सोमवारी गिरणा धरणातून 650 दलघफू पाणी सोडण्यात येणार आहे. गेल्या 15 जानेवारीला पहिले आवर्तन सोडण्यात आले होते. त्या वेळी 850 दलघफू पाणी सोडण्यात आले होते; मात्र ते दहिगाव बंधार्‍यापर्यंतच येऊ शकले. हे आवर्तन आणखी खाली येण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी अनेक गावातील लोकांनी केली होती.

महापौरांनी केली मागणी

दापोरा प्रकल्पापर्यंत पाणी सोडण्याची मागणी महापौर किशोर पाटील यांनी जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर राजूरकर यांच्याकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी पालकमंत्री गुलाबराव देवकर व विभागीय आयुक्त रवींद्र जाधव यांच्याकडेही मागणी केली आहे. आवर्तन सोडण्यात येत असल्याने नदीपात्रातील ओलाव्यामुळे कमी पाणी लागणार असून, याच आवर्तनात वाढ करावी, अशी मागणी केली आहे. सोमवारी पुन्हा जिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करणार आहे, असे महापौरांनी सांगितले.


निम्मे पाणी वाया जाण्याची भीती
जानेवारीत सोडलेल्या आवर्तनानंतर नदीचे पात्र कोरडे पडले आहे. तसेच नदीपात्रात वाळूच्या प्रचंड उपशामुळे खड्डेही पडले आहेत. सध्या तापमान 40 अंशांपुढे असल्याने बाष्पीभवनाचा वेगही अधिक आहे. त्यामुळे नदीपात्रात सोडलेल्या पाण्यातून बहुतांश पाणी जमिनीत मुरेल. त्याचा काही विहिरींना फायदा होईल; मात्र प्रशासनाचा उद्देश असलेल्या पिण्यासाठी निम्म्यापेक्षाही कमी पाणी उपयोगात येऊ शकते.


1200 दलघफू पाण्याची गरज
जळगाव शहराची पर्यायी पाणीपुरवठा योजना असलेल्या दापोरा प्रकल्पापर्यंत पाणी पोहोचण्यासाठी गिरणा प्रकल्पातून 1200 दलघफू पाणी सोडण्याची आवश्यकता आहे. कारण नदीपात्रातील अडथळे पाहता एवढे पाणी सोडले तरच दापोर्‍यापर्यंत बर्‍यापैकी पाणी पोहोचू शकेल.