आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेंग्यूसदृश अाजाराने तरुणीचा मृत्यू; अाराेग्याधिकाऱ्यांना नोटीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे- शहरातील नाटेश्वर कॉलनीत राहणाऱ्या गौरी कापडणेकर या तरुणीचा डेंग्यूने मृत्यू झाला. गेल्या तीन ते चार दिवसांपासून खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. डेंग्यूमुळे मृत्यू होण्याची या वर्षातील ही पहिलीच घटना आहे. गाैरी ही अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. तथापि महापालिका प्रशासनाने मात्र शहरात कोठेही डेंग्यूचे डास नसल्याचा दावा केला आहे. शिवाय आरोग्याधिकारी डॉ. बी.बी. माळी जीवशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

शहरातील नाटेश्वर कॉलनीत राहणाऱ्या गौरी किशोर कापडणेकर (२१) हिची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बिघडली होती. एका खासगी रुग्णालयात तिने उपचारही घेतले. अखेर तीन ते चार दिवसांपूर्वी गौरी हिला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु तोवर बराच उशीर झाला होता. चाचणीदरम्यान गौरीला डेंग्यूची लागण झाल्याचे निदान डॉक्टरांनी केले. दुर्दैवाने तिची प्रकृती अधिकच बिघडली. अखेर उपचार घेत असताना शुक्रवारी दुपारी तिचा मृत्यू झाला. घटनेनंतर महापालिका प्रशासन सजग झाले आहे. या प्रकरणी पुरेशी दक्षता तसेच परिस्थितीनुरूप उपाययोजना राबविल्याबद्दल अारोग्याधिकारी डॉ. बी. बी. माळी तसेच जीवशास्त्रज्ञ डॉ. अपर्णा पाटील यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. या डाॅक्टरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती प्रशासनातर्फे देण्यात आली. दरम्यान, मृत गौरी ही शहरातील एका महाविद्यालयात अभियांत्रिकी शाखेत तिसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत होती. तिच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ असा परिवार आहे. या घटनेनंतर महापालिकेच्या पथकाने गौरीच्या घरी जाऊन पाहणी केली. या वेळी घरातील फ्रिजमधून निघणाऱ्या निरुपयोगी पाण्यात डेंग्यूचे डास अाढळून आले. याशिवाय जवळील एका घरातील कुलरच्या पाण्यातही डेंग्यूचे डास आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

काय सांगतात नागरिक
गौरीचेवडील किशोर कापडणेकर हे धान्य विक्रेते आहेत. ते प्रवासात असताना गौरीची प्रकृती बिघडली. एका डॉक्टरांकडून तिने उपचार घेतले. यानंतर तिचे वडील घरी परत आल्यानंतर त्यांनी कुटुंबीयांना खासगी रुग्णालयात तिला दाखल केले. पहिल्या डॉक्टरांकडून त्यावेळीच चाचणी झाली असती तर कदाचित गौरी वाचली असती, असे बोलले जात आहे. तर पुढील महिन्यात २३ सप्टेंबर रोजी तिचा वाढदिवस होता, अशी माहिती तिच्या निकटवर्तीयांनी दिली.

बांधकाम साहित्य, कुलर्समध्ये डास
माजी महापौर अहिरराव मनपा कर्मचारी यांनी प्रभागात जाऊन पाहणी केली. या वेळी एका ठेकेदाराच्या घराच्या छतावरही डेंग्यूचे डास आढळून आले आहे. बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये साचलेल्या पाण्यात डास वाढले होते. शिवाय काही घरांच्या कुलरच्या पाण्यातही डास आढळून आले. त्यामुळे केवळ नाटेश्वर कॉलनीच नव्हे तर इतर प्रभागातील नागरिकांनीही दक्षता घेणे गरजेचे आहे.
शहरात कोठेही डेंग्यूचा रुग्ण नाही, असा दावा आयुक्त संगीता धायगुडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केला. मग गौरीचा मृत्यू कसा झाला आणि दोघा डॉक्टरांना नोटीस का देण्यात आली, असा प्रश्न विचारल्यावर तिच्या मृत्यूचे वेगळे कारण आहे. तसेच डॉ. माळी डॉ. पाटील यांनी माझ्यापावेतो दररोज माहिती पुरविली नाही. त्यामुळे नोटीस दिल्याचे नमूद केले.

माजी महापौरांचे पत्र
माजीमहापौर जयश्री अहिरराव यांचा हा प्रभाग आहे. डेंग्यूचे रुग्ण आढळून आल्यामुळे त्यांनी प्रशासनाला सावध केले होते. त्यानंतर परिसरात धुरळणी, फवारणी अॅबेटिंगचे कामही केले जात होते; परंतु मनुष्यबळाच्या अभावामुळे अपूर्ण साहित्यामुळे काम रखडले. त्यामुळे श्रीमती अहिरराव यांनी दोन दिवसांपूर्वी आयुक्त संगीता धायगुडे यांना पत्र देऊन आवश्यक उपाययोजना करण्याची मागणीही केली होती. मात्र दोन दिवसानंतरही फवारणी करण्यात आली नाही.
बातम्या आणखी आहेत...