आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकशाही की मोगलाई: जळगावात महिनाभरात छेडछाडीच्या 40 तक्रारी; एकही गुन्हा दाखल नाही

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- शहरातील पाचही पोलिस ठाण्यात यावर्षी जानेवारी महिन्यातच छेडछाडीच्या 40 तक्रारी आल्या. आश्चर्य म्हणजे पोलिसांनी एकाही प्रकरणात गुन्हा दाखल करून घेतला नाही. केवळ थातूरमातूर कारवाईचा देखावा पोलिसांनी केला. तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयांनी वारंवार निवाडे दिले असताना पोलिस चौकशांचा फार्स करीत राहिले. ‘समज’, ‘समजूत’ असा वेळकाढूपणा करीत पोलिसांनी प्रकरणे ‘मिटविली’. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व 40 प्रकरणात एकही तक्रारदार तरुणी-महिला स्कार्फ वापरणारी नव्हती, त्यांना छेडणारेही स्कार्फधारक नव्हते. स्कार्फ न घालूनही छेडछाड, छळ होत असल्याने वैतागलेल्या 40 तरुणी-महिला पोलिसांपर्यंत पोहोचल्या. प्रत्यक्षात छेडछाड निमूटपणे सहन करीत राहिलेल्या व पोलिसांपर्यंत न पोहोचलेल्यांची संख्या कितीतरी अधिक असू शकेल.

जिल्हापेठ पोलिस ठाणे
> महिनाभरात एकूण 15 तक्रारी > 11 प्रतिबंधात्मक कारवाई > चार तक्रारी मध्यस्थीने निकाली

शहर पोलिस ठाणे
> पाच तक्रारी > 3 तक्रारींत छेडणार्‍यांना समज > 2 प्रकरणांमध्ये प्रतिबंधात्मक कारवाई

एमआयडीसी पोलिस ठाणे
> 6 तक्रारी > केवळ प्रतिबंधात्मक कारवाई

शनिपेठ पोलिस ठाणे
> चार तक्रारी > तरुणांकडून विद्यार्थिनींची छेड > केवळ जबाब नोंदवून घेऊन समज

तालुका पोलिस ठाणे
> 10 तक्रारी > प्रामुख्याने ग्रामीण भागातील तक्रारी > त्रास देणार्‍यांना फक्त समज

केस नं. 1
24 जानेवारी 2013 : स्टेडियम कॉम्प्लेक्स परिसर
खासगी शिकवणी क्लासला येणार्‍या पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील विद्यार्थिनींची सतत आठवडाभर एक तरुण छेड काढीत होता. या विद्यार्थिनीही स्कार्फ घालीत नव्हत्या की छेडणारा तरुणही! अखेर या छेडछाडीला कंटाळून छेड काढणार्‍या तरुणाला त्या विद्यार्थिनींनी पकडले अन बदडून काढले. परिसरातील नागरिकांनी त्याला जिल्हापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले. पुढे पोलिसांनी काय केले?

केस नं. 2
6 फेब्रुवारी 2013 : औरंगाबाद राज्यमार्ग, कुसुंबा
रिक्षात गॅस भरण्यासाठी जात असलेल्या रिक्षाचालकाने त्याच्या साथीदारासह परिसरातील तरुणींना छेडले. परिसरातील लोक धावून आले; त्या रोडरोमिओला बदडले. नंतर या रिक्षाचालकास एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. रिक्षाचालकाला पोलिसांनी सोडून दिले; त्याचा साथीदारही मोकाट फिरत आहे. या प्रकरणात दोन्ही तरुणींनी तोंडाला स्कार्फ बांधलेला नव्हता की त्या बिनधास्त रोडरोमिओंनीही!

केस नं. 3
4 फेब्रुवारी 2013 : पोलिस कर्मचारी वसाहत

एका पोलिस कर्मचार्‍याच्या मुलाने त्याच्या भागातील तरुणीची छेडखानी केली. अनेक दिवस त्या तरुणीला छेडले जात होते. ती तरुणी महाविद्यालयात जात असताना पोलीसबॉय तिचा पाठलाग करून सतवायचा, अश्लील शेरेबाजी, एसएमएस करायचा. शेवटी तक्रार घेऊन ती थेट शहर पोलिस ठाण्यात गेली. ही तरुणी कधी स्कार्फ घालत नव्हती की तिला छेडणारा पोलिस बॉय! शहर पोलिसांनी पुढे केले काय?

कायदेबाह्य कृती
मुलींनी चेहर्‍यावर स्कार्फ घालू नये अशी बंदी घालणारी कायद्यात कोणतीही तरतूद नाही. मुंबई पोलिस कायद्यांतर्गत पोलिसांना असलेल्या विशेष अधिकारातही पोलीस अशी बंदी लादू शकत नाही. त्यामुळे पोलिस जर अशी कायदेबाह्य अपेक्षा राखून पत्रव्यवहार करीत असतील, हुकूम वगैरे काढत असतील तर ते गैर ठरेल. सुज्ञपणाने मुलींनी अथवा त्यांच्या पालकांनी काय करावे, हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मुळात शरीर झाकल्याने छेडछाड होत नसते तर उलट शरीर न झाकता प्रदर्शन केल्याने त्रास होत असतो. त्यामुळे अशा प्रकारची बंदी आणणे चुकीचे ठरेल.
-अँड.अ.वा.अत्रे, ज्येष्ठ विधिज्ञ.

छेडखानी-स्कार्फ संबंध नाही
मुली स्कार्फ घालतात म्हणजे चुकीचे करतात असे म्हणणे चुकीचे ठरेल. छेडखानी करणे व स्कार्फ बांधण्याचा काही संबंध नाही. उलट स्कार्फमुळे चेहरा दिसत नाही त्याचा फायदा म्हणजे रस्त्याने येता जाताना टारगटांकडून टीका टिप्पणी होत नाही. मला वाटते या निर्णयाबाबत स्वत: पोलिस अधीक्षकच संभ्रमात असावेत. त्यांचा हेतू नेमका काय हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. स्कार्फमुळे मुलींकडून कोणते गुन्हे घडले हे दाखवून द्यावे उलट मुलांकडूनच महिलांच्या गळ्यातील पोत चोरण्याच्या घटना घडतात. पोलिसांनी त्याला आळा घातला पाहिजे. पोलिसांनी अगोदर यासंदर्भात महिला संघटनांशी चर्चा करून नेमक्या काय अडचणी आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. धुळ्यात स्कार्फबंदीच्या निर्णयानंतर रस्त्याने चालणार्‍या मुलींना त्रास देण्याचे प्रकार घडले होते. त्यामुळे कंटाळून मुलींनी पोलिसांना निवेदन देऊन बंदी झुगारून लावली होती.
-वासंती दिघे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या

हे घ्या तुमचे अमळनेर मॉडेल
ज्या अमळनेर मॉडेलचा आधार घेऊन पोलीस अधीक्षक महाशय जळगावात स्कार्फबंदी लादू इच्छितात त्या अमळनेरातील स्कार्फ बंदीनंतरची स्थिती पाहा. तिथे स्कार्फ बंदी आहे; मुली स्कार्फ घालीत नाहीत, मात्र छेडछाड सुरूच आहे. मग त्याला कोण जबबादार? मुली की निष्क्रिय पोलिस यंत्रणा?