आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात पोलिस पुत्राने काढली तरुणीची छेड!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका हवालदाराच्या मुलाने डिप्लोमाला शिक्षण घेत असलेल्या तरुणीची छेड काढल्याची घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. या प्रकरणी तरुणीच्या पालकांनी थेट शहर पोलिस ठाणे गाठत त्याच्याविरुद्ध तक्रार केली. त्यांच्या मागोमाग पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या हवालदाराने मात्र उलट तक्रारदारांनाच शिवीगाळ केली. या प्रकरणी पोलिस पुत्राविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

जिल्हा पोलिस दलाच्या मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस हवालदार अशोक कोल्हे राधाकृष्णनगर भागातील रहिवासी आहेत. त्यांचा मुलगा निखिल नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तो काही दिवसांपासून याच भागात राहणारे मोतिलाल पाटील यांच्या 21 वर्षीय मुलीची छेड काढत होता. ही बाब त्या तरुणीने घरी सांगितल्यानंतर तिच्या वडिलांनी ही बाब हवालदार कोल्हे यांच्या कानावर घातली व मुलाला समज देण्याबाबत सांगितले. मात्र तरीदेखील त्याच्याकडून छेडखानी सुरूच होती. रविवारी रात्री त्याने त्या तरुणीला मोबाइलवरून गुडनाइट असा एसएमएस केला. एवढेच नव्हे, तर सोमवारी दुपारी त्याने त्या तरुणीला, ‘तू माझ्याशी बोल, नाही तर तुझ्या अंगावर अँसिड फेकेन’ अशी धमकीही दिली. त्यामुळे संतापलेल्या तिच्या पालकांनी शहर पोलिस ठाणे गाठून पोलिस निरीक्षक कुबेर चवरे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली. ही बाब पोलिस हवालदार कोल्हे यांना समजल्यानंतर त्यांनी मुलाला शहर पोलिस ठाण्यात सोबत आणले. शहर पोलिस ठाण्याचे कर्मचारी त्या तरुणाला विचारपूस करीत असतानाच हवालदार कोल्हे याने तक्रारदारांनाच धमकी देत शिवीगाळ करीत, ‘कोणाकडेही माझ्याविरुद्ध तक्रार करा, मला काहीही फरक पडत नाही; माझ्या मुलाने कोणाचेही नाव घेतलेले नाही’ असे म्हणत माफी मागण्यास साफ नकार दिला. त्यामुळे शहर पोलिस ठाण्यात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दक्षता समितीचे मध्यस्थीचे प्रयत्न निष्फळ
काही वेळातच महिला दक्षता समितीच्या सदस्या निवेदिता ताठे, भारती म्हस्के यादेखील तेथे दाखल झाल्या. त्यांनी घटना समजून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तक्रारदार व हवालदार कोल्हे दोघेही ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्यामुळे शहर पोलिसांनी निखिल या तरुणाविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून त्याला ताब्यात घेतले. यामुळे रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गर्दी जमली होती.