आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाकोदजवळ ट्रकने विद्यार्थिनीस चिरडले; संतप्त जमावाने पेटवला ट्रक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामनेर- जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील वाकोदजवळ खराब रस्त्यावरील खड्डे चुकवताना बारावीतील सायकलस्वार विद्यार्थिनीचा ट्रकखाली चिरडून बळी गेला. संतप्त जमावाने पशुखाद्याने भरलेला ट्रक पेटवून दिला. खराब रस्त्याबाबतही रोष व्यक्त करून पोलिसांच्या वाहनासह जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाचीही तोडफोड केली. सुमारे अडीच तास वाहतूक ठप्प होती. दगडफेकीत तीन पोलिस जखमी झाले. ही घटना मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता घडली.

याबाबत कळताच घटनास्थळी पोहोचलेल्या आमदार गिरीश महाजन यांनी रस्ता दुरुस्ती होईपर्यंत या महामार्गावरील नेरीजवळ असलेला टोलनाका बंद ठेवण्याचा इशारा कंत्राटदारास दिला. सोयगाव तालुक्यातील पळासखेडा येथील शीतल रामदास खंडारकर (वय 18) ही बारावीतील विद्यार्र्थिनी वाकोद येथील राणीदाणजी विद्यालयात शिकत होती. सकाळी घरून सायकलवर विद्यालयात जात असताना वाकोद गावाजवळ ट्रक (क्रमांक एपी 16, टीवाय 7179) खाली आल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शीतलचा छिन्नविच्छिन्न मृतदेह पाहून संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून देत रस्ता बंद केला. अपघाताची माहिती देऊनही दोन तासाने पोलिस घटनास्थळी पोहोचल्याने संतप्त नागरिकांनी पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनीही लाठ्या उगारल्याने तणाव निर्माण झाला. पोलिसांची मुजोरी पहाता संतप्त नागरिकांनीही दगडफेक करीत पोलिसांच्या वाहनाची तोडफोड केली. तणाव वाढत गेला. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांची समजूत काढली.

आमदार महाजनांनाही धक्काबुक्की
आमदार गिरीश महाजन यांनी नागरिकांची समजूत काढून सकाळी सात वाजेपासून ठप्प असलेली वाहतूक मोकळी करण्याची विनंती केली. याचवेळी जामनेर नगरपालिकेचा अग्नीशमन बंब घटनास्थळी पोहोचला व जळत असलेला ट्रक विझवण्यास सुरुवात झाली. आधीच पोलिसांवरील रोष शिगेला पोहोचलेला असताना अग्निशमन बंबावरील कर्मचार्‍याने अपशब्द वापरताच नागरिकांनी त्यास बेदम मारहाण केली. या वेळी पुन्हा पोलिसांची वाहने निशाण्यावर आली. त्या कर्मचार्‍यास वाचविताना आमदार गिरीश महाजन यांनाही धक्काबुक्की सहन करावी लागली. पोलिसांवरील रोष व्यक्त करीत नागरिकांनी पोलिसांच्या दोन वाहनांवर जोरदार दगडफेक केली.

तीन वाहनांचीही तोडफोड, नेरी टोल नाका बंद करण्याचा आमदार गिरीश महाजन यांचा इशारा

रस्ता दुरुस्तीच्या सूचना
जळगाव-औरंगाबाद महामार्गावरील जिल्हा हद्दीतील रस्ता जेबीएल कंस्ट्रशन्स या कंपनीकडून बीओटी तत्त्वावर बांधून घेण्यात आला आहे. हा रस्ता खूप खराब झाल्याने दोन दिवसांपूर्वीच कंत्राटदाराला रस्ता दुरुस्तीची सूचना दिल्याची माहिती आमदार महाजन यांनी नागरिकांना दिली. हा अपघात खराब रस्त्यामुळेच झाल्याची ओरड नागरिकांनी करताच आमदार गिरीश महाजन यांनी कंत्राटदारास रस्ता दुरुस्ती होत नाही, तोपर्यंत टोलवसुली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या.

पोलिस घामाघूम
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहायक पोलिस अधीक्षक बसवराज तेली, जामनेर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वाय.के. शेवगण, पहूर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विष्णू आव्हाड आदी कर्मचारी घामाघूम झाले. पोलिसांना दंगा नियंत्रण पथकास पाचारण करावे लागले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल साहेबराव पंढरीनाथ पाटील यांनी फिर्याद दिली. त्यावरून ट्रक चालक पी.एन.या पोलीशेट्टी (रा.जुजर, ता.विकुलपांडू, जि.कृष्णा) याच्या विरूद्ध पोलिसात गुन्हा दाखल झाला.