आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छता अभियान: जळगावात 70 टक्के विद्यार्थिनी मूत्रविकारांनी ग्रस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- सार्वजनिक ठिकाणी, बाजारपेठांत, व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये, प्रवासात तसेच शासकीय व खासगी कार्यालयांमध्ये स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याने प्रत्येक महिलेला कधी ना कधी मूत्रविकार हमखास भोगावा लागतो. फार कमी ठिकाणी स्वच्छतागृह असले तरी त्यांची अवस्था अतिशय वाईट असते. अशा ठिकाणी पाणी, कडी-कोंडा किंवा किमान स्वच्छतेच्या सुविधाही नसतात. अशा एकंदर परिस्थितीमुळेच सुमारे 70 टक्के भारतीय महिलांना विविध मूत्रविकार होतात, असे आढळून आले आहे.

पुरुषांसाठी लघुशंकेसाठी स्वतंत्र जागा नसणे, ही समस्याच नाही. ‘सब भूमी गोपाल की’ असा म्हणत ते कुठल्याही जागेचा वापर करतात. मात्र, महिलांच्या या गरजेबाबत आपला समाज अतिशय बेफिकीर आहे. नोकरी, प्रवास, बाजारपेठ अशा सर्वच ठिकाणी या नैसर्गिक ‘शंके’च्या तत्काळ निवारणाचा मार्ग महिलांसाठी अत्यंत कठीण आहे. त्यामुळे पुरुषांना कल्पनाही करता येणार नाही अशा आजारांना महिला बळी पडतात.

काय होतात परिणाम
>मूत्राशय प्रसरण पावते : सार्वजनिक स्वच्छतागृह नसल्याने सकाळी बाहेर पडल्यानंतर संध्याकाळी-रात्री परतल्यावरच मूत्रविसर्जनासाठी जाऊ शकते. मूत्राशयात (युरिनरी ब्लॅडर) लघवी तासन्तास साचून राहते आणि त्यामुळे मूत्राशय प्रसरण पावते.

>पोटदुखीचा त्रास : अनेक तास दाबून ठेवण्याने नंतर लघवी पूर्ण होत नाही व पोटदुखीचा त्रास सुरू होतो. वर्षानुवर्षे असे चालल्यास लघवीवरचा ताबा सुटतो. 60 ते 70 टक्के महिलांना रजोनिवृत्तीनंतर (मेनोपॉझ) हा त्रास होतो.

>एकाग्रता भंग पावते : वयस्क महिलांना जास्त वेळा लघवीला जावे लागते व न सांगता येणार्‍या अडचणी निर्माण होतात.

उपचार होऊ शकतात पण
विशेष म्हणजे हे आजार टाळता येऊ शकतात किंवा आजार झाल्यावर उपचारही होऊ शकतात, याविषयीची पुरेशी माहितीदेखील महिलांना नसते. अज्ञानामुळेच बहुतांश महिला लघवीचे आजार चक्क अंगावर काढतात. त्यामुळेच सौम्य स्वरूपातीत आजार सतत दुर्लक्ष केल्यास गंभीर वळण घेतात, असे निरीक्षण वैद्यकतज्ज्ञांनी नोंदवले आहे.

स्वच्छतागृहाचे निकष
दोन हजारांपेक्षा अधिक स्त्री-पुरुषांचा वावर तीन तासांपेक्षा अधिक असणार्‍या ठिकाणी स्वच्छतागृह बांधणे गरजेचे आहे. त्यातील दहा युनिट्स महिला व दहा युनिट्स पुरुषांसाठी असावीत, असा निकष आहे.
-एम. डी. सोनवणे, शहर अभियंता

विषाणू संसर्गाचा धोका
वारंवार लघवी थांबल्यामुळे मूत्राशयाचा आजार बळावतो. विषाणूंचा संसर्ग होऊन गर्भाशय पिशवीलाही संसर्गाचा धोका निर्माण होतो. मासिक पाळीच्या दृष्टीने मुलींमध्ये विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे त्यांनी याची काळजी घेऊन सतत सतर्क राहिले पाहिजे. शाळांमध्ये मुलींचा स्वच्छतागृहातील समस्यांबाबत वेळीच पुढाकार घेऊन परिस्थिती संस्थेच्या निदर्शनास आणून दिली पाहिजे.
-डॉ. सीमा पाटील, प्रसूती तज्ज्ञ