आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वसतिगृहातील समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी पायी धुळ्याकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धुळे, साक्री - साक्री येथील मुलींच्या वसतिगृहात अनेक प्रश्न असून, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. दोंडाईचा येथील मुलांच्या वसतिगृहाचीही तीच गत आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी रात्री साक्री येेथील विद्यार्थिनी नाशिक येथील आयुक्त कार्यालयावर तर दोंडाईचा येथील विद्यार्थी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चाने निघाले होते.

साक्री शहरात असलेल्या आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे बांधकाम सन २०१३मध्ये पूर्ण झालेले आहे. मात्र, प्रकल्प कार्यालयाकडून अद्यापही मुलींना भाड्याच्या इमारतीत सुरू करण्यात आलेल्या वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. या ठिकाणी अनेक असुविधा आहेत. या विरोधात मुलींनी निदर्शने केली. तहसीलदारांना िनवेदन दिले. मात्र, अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. हीच गत दोंडाईचा येथेही आहे. या ठिकाणी असलेल्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाच्या इमारतीची दुरवस्था झाली आहे. दहा दिवसांपासून विद्यार्थिनींना खिचडीच देण्यात येत अाहे. त्यामुळे साक्री येथील विद्यार्थिनी शुक्रवारी सायंकाळी नाशिक येथील आदिवासी आयुक्त कार्यालयावर पायी मोर्चाने निघाल्या. या वेळी पोलिस प्रशासनासह आदिवासी प्रकल्प कार्यालयातील अधिकारीकर्मचाऱ्यांनी मुलींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश अाले नव्हते. दुसरीकडे दोंडाईचा येथून सायंकाळी पाच वाजता विद्यार्थी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर पायी मोर्चाने येण्यास निघाले. त्यातील दोन विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दोंडाईचा येथील रुग्णालयात हलवण्यात आले.

प्रशासनात खळबळ : साक्री येथून विद्यार्थिनी नाशिक येथे पायी जात असल्याची माहिती मिळाल्यावर प्रशासनात खळबळ उडाली. या विद्यार्थिनी पिंपळनेर येथे मुक्काम करून उद्या शनिवारी पुन्हा मोर्चास सुरुवात करतील. तत्पूर्वी त्यांनी तहसीलदार डॉ. विनोद भामरे पोलिस निरीक्षक डी. व्ही. वसावे यांना निवेदन दिले होते. या विषयी यापूर्वी आदिवासी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले होते. त्यानंतरही हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे आता थेट नाशिक येथे पायी माेर्चा काढण्याचा निर्णय झाला. तानाजी बहिरम, पुष्पा चौधरी, मांगीलाल गांगुर्डे, राजू कोकणी, सुनील पवार, अंजली कुवर, पूनम पवार, संगीता अहिरे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. हे विद्यार्थी पिंपळनेर, ताहराबाद सोग्रस फाटा, देवळा मार्गे नाशिकला जाणार आहेत.