आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माथेफिरूच्या कचाट्यातून वाचवला विद्यार्थिनीचा जीव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जळगाव - महापालिकेच्या चौबे शाळेत इयत्ता पाचवीत शिकणा-या विद्यार्थिनीच्या गळ्यावर माथेफिरू तरुण ब्लेडने वार करण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार पाहून विद्यार्थ्यांनी आरडाओरड केल्यामुळे त्याने पळ काढला. त्यामुळे विद्यार्थिनीचा जीव वाचला. हा धक्कादायक प्रकार बुधवारी दुपारी 2.30 ते 3 वाजेदरम्यान चौबे शाळेच्या गच्चीवर घडला. संतप्त पालकांनी गुरुवारी शाळेत जाऊन शिक्षकांना याविषयी जाब विचारला. या घटनेमुळे शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

शनिपेठ परिसरातील कोमल विकास सांळुखे ही विद्यार्थिनी बुधवारी दुपारी ती जेवणाच्या सुटीत डबा खाऊन खेळतखेळत गच्चीवर गेली. याच वेळी हा माथेफिरू तरुण गच्चीवर आला. त्याने कोमलला जमिनीवर पाडून तिच्या गळ्यावर ब्लेडने वार करणे सुरू केले. तितक्यात गच्चीवर उपस्थित इतर मुलींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. त्यामुळे माथेफिरूने तेथून पळ काढल्याने कोमलचा जीव वाचला. या घटनेची माहिती मुलींनी शिक्षिकांना दिल्यानंतरही त्यांनी कारवाई केली नाही. एवढेच नव्हे तर पालक किंवा वरिष्ठांनाही ही बाब कळवली नाही. सायंकाळी घरी गेल्यानंतर घाबरलेल्या कोमलनी शाळेत दुपारी घडलेला प्रकार पालकांना सांगितला. त्यामुळे संतापलेल्या पालकांनी गुरुवारी दुपारी शाळेत येऊन या घटनेविषयी जाब विचारला. यावेळी पालिकेचे प्रशासन अधिकारी व्ही.एस. महाजन यांनी शिक्षकांना सूचना देत पालकांची समजूत काढली.

मुख्याध्यापिका, वर्गशिक्षिकेला कल्पना देऊनही केले दुर्लक्ष
बुधवारी घडलेला हा प्रकार कोमलसह तिच्या मैत्रिणींनी त्यांच्या वर्गशिक्षिका सपना प्रकाश सपकाळे यांना सांगितला. त्यांनी शाळा सुटल्यानंतर प्रभारी मुख्याध्यापिका वंदना पवार यांना सांगितले. मात्र, पालकांना कळविले नाही. मुलींनी घरी गेल्यानंतर पालकांना सांगितले. त्याचा परिणाम म्हणून गुरुवारी अनेक पालकांनी मुलींना शाळेत पाठवले नाही. शिक्षकांनी बुधवारी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असते तर संबंधित माथेफिरूला पोलिसांना ताब्यात घेता आले असते. घडलेल्या प्रकारानंतर शाळेतील सर्वच मुली घाबरलेल्या अवस्थेत आहेत. हा माथेफिरू चौघुले प्लॉट येथील रहिवासी असल्याची माहिती काही पालकांनी दिली.
मुख्याध्यापकांचा कारभार प्रभारी
30 जून रोजी शाळेचे मुख्याध्यापक चंद्रकांत वाघ हे सेवानिवृत्त झाले. सध्या प्रभारी म्हणून वंदना पवार ह्या काम पाहत आहेत. या शिवाय शाळेत दोन शिक्षकांच्या जागाही रिक्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीसह प्रशासकीय कामांमध्येही अडचणी निर्माण झाल्या आहेत.

काय झाले पालकांच्या संतापानंतर?
पालकांचा संताप वाढत असताना पालिकेचे प्रशासन अधिकारी महाजन हे शाळेत आले. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी शाळेच्या शिक्षिकांना चांगलेच झापले. या प्रकारची चौकशी करून दोषींना निलंबित करण्याचा दमही त्यांनी भरला आहे. तसेच यापुढे काळजी म्हणून शाळा भरल्यानंतर गेट कुलूप लावून बंद करण्यात येईल. सोमवारपर्यंत रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा भरण्यात येतील, असे आश्वासन महाजन यांनी दिले आहे.

पालकांचा संताप
घाणेकर चौकातील बाजाराला लागून चौबे शाळा आहे. या ठिकाणी दिवसभर गर्दी असते. शाळेचे गेट कायम उघडे असल्यामुळे कुणीही शाळेत प्रवेश करते. शाळेचे शौचालय, बाथरुम इतर सामान्य नागरिकही वापरतात. परिणामी शाळेत प्रचंड दुर्गंधी आणि अस्वच्छता पसरली आहे. मुलांना देण्यात येणारी खिचडी निकृष्ट दर्जाची असते, ह्या बाबी मुलांनी पालकांच्या लक्षात आणून दिलेल्या असतानाही प्रशासन त्यावर काहीच कार्यवाही करीत नाही. याचा तीव्र संताप या घटनेनिमित्त पालकांनी व्यक्त केला. शिक्षकांना विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे शिक्षक देऊ शकले नाहीत.