आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जळगावात विद्यार्थिनी घेताहेत कराटेचे धडे; इनरव्हील क्लबचा उपक्रम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- मुलींच्या छेडखानीचे प्रकार दिवसेंदिवस मोठय़ा प्रमाणात वाढत असून, विपरीत घटनाही घडत आहेत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता विद्यार्थिनींना स्वरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यात त्यांना स्वत:चा बचाव करण्यासाठी काय करावे, याबाबतचे बारकावे शिकवले जात आहेत.

इनरव्हील क्लब ऑफ जळगाव व डॉ.वर्षा पाटील फॅशन इन्स्टिट्यूटतर्फे फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थिनींसाठी 21 दिवसांचे कराटे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. मंगळवारी या शिबिराचे उद्घाटन अप्पर पोलिस अधीक्षक एन.अंबिका यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी इनरव्हील क्लबच्या नूतन कक्कड, अध्यक्षा दीप्ती अग्रवाल, संध्या महाजन, आबिदा काझी, इन्स्टिट्यूटच्या प्राचार्या उज्ज्वला मावळे, प्रशिक्षक राहुल मणियार यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वरक्षणासाठी सरसावल्या मुली
कायद्याचे ज्ञान हवे
विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना एन.अंबिका यांनी विविध महत्त्वाच्या बाबी सांगितल्या. मुलींना कायद्याचे ज्ञान असावे; जेणेकरून अन्याय झाल्यावर त्या ज्ञानाच्या आधारे लढू शकतील. एवढेच नव्हे, तर कोणत्या कलमान्वये दोषीला काय शिक्षा होऊ शकते, तो गुन्हा किती गंभीर स्वरूपाचा आहे याचेही त्यांना ज्ञान मिळू शकेल, असे सांगून त्यांनी विविध कलमांची माहिती दिली.

21 दिवस शिबिर
इनरव्हीलचा हा उपक्रम 21 दिवस चालणार आहे. या शिबिरात कराटेतील सेल्फ डिफेन्स प्रकारात जेव्हा एखादी व्यक्ती वा मुलाने मुलीची छेड काढल्यास किंवा हात पकडल्यास त्याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देत त्याचे हात लॉक करावे, आपल्याशी समोरची व्यक्ती कोणत्या भावनेने बोलते, त्या व्यक्तीचा बोलण्यामागे उद्देश काय, समोरच्या व्यक्तीशी बोलताना किती अंतर असावे आदी बाबींची माहिती दिली जाणार आहे.

जपानी आर्ट प्रकार शिकवले जाणार
शिबिरात ‘शितोरियो कराटे’ हा जपानी आर्ट प्रकार शिकवण्यात येणार आहे. त्यात आपल्यातील कमजोरी काय? हल्ला झाल्यास हल्लेखाराच्या शरीराच्याकोणत्या भागावर मारावे? त्या ठिकाणी मारल्यास तो भाग कसा निकामी होईल, शरीरातील नसा कुठे ब्रेक केल्या म्हणजे हल्लेखोराला त्रास होईल आदीबाबत ज्ञान देण्यात येणार आहे. तसेच फिटनेस ट्रेनिंगसह स्टॅमिना कसा वाढवावा यावरही लक्ष केंद्रित केले जाणार आहे.